शेतमालाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:52 PM2018-02-25T23:52:55+5:302018-02-25T23:52:55+5:30

शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली.

Farmers' resentment for the increase in the cost of the land | शेतमालाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

शेतमालाच्या दरवाढीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश

googlenewsNext
ठळक मुद्देकापसाचे भाव पडले : सोयाबीन, हरभरा तुरीला मंदी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसवेना

प्रकाश काळे।
आॅनलाईन लोकमत
गोवरी : शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला. आज-उद्या शेतमालाचे दर वाढेल, अशी आस असतानाच शेतकऱ्यांच्या पदरी कायम निराशाच आली. शेतमालाचे वाढलेले भाव पूर्णत: घसरल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू लागले आहे. त्यामुळे शेतकरीराजा मनाने मोडून पडला आहे.
शेतकºयांचे दु:ख आज सर्वांनाच माहीत आहे. जगाचा पोशिंदाच कोलमडून पडला आहे. शेतकºयांची सारी शोभा शेतमालाच्या दरवाढीवर अवलंबून असते. त्यासाठी शेतकरी दिवसरात्र काबाडकष्ट करून उत्पादन वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु सर्व परिस्थितीच शेतकऱ्यांना मारक झाली आहे. कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्हा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो. यावर्षी कापसाचे भाव पाच हजार रुपयांच्या वर गेले होते. परंतू बोंडअळीचे कारण पुढे करीत खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव चार हजार रुपयांपर्यंत पाडल्याने शेतकऱ्यांना कापूस विकायला परवडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकीकडे कापसाचे उत्पादन कमी तर दुसरीकडे दर पूर्णत: कोलमडल्याने शेतकरी पार हताश झाला आहे.
आजघडीला कापसाचा सर्वाधिक पेरा असताना त्याच पांढऱ्या सोन्याचे दर एक हजार रुपयांपर्यंत खाली गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांनी माल घरीच भरून ठेवला आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांना शेतमालाच्या दरवाढीची आस होती. परंतु यावर्षी अधिवेशनाने शेतकºयांना काहीच दिले नाही. हरभरा, तुरीचे भाव यावर्षी वाढले नाही. शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च जास्त झाला, त्या तुलनेत शेतमालाचे दर वाढणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता उलट दर कमी झाल्याने ‘शंभराचे साठ अन् गळ्याला फास’ अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
यावर्षी निसर्ग कोपला. पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी वादळी पाऊस व गारपीटीने रब्बी पीक पूर्णत: भूईसपाट केले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून नेला. शेतकºयांवर आभाळ कोसळले. सरकार शेतकºयांच्या पाठीशी उभे राहायला तयार नाही. निसर्ग साथ देत नाही. सारी यंत्रणाच शेतकऱ्यांविरूद्ध उभी ठाकली असताना शेतकरी तग धरणार कसा, असा प्रश्न आता सर्वांनाच अस्वस्थ करून सोडत आहे.
शेतमालाच्या दरवाढीवर शेतकऱ्यांचा वर्षभराचा आर्थिक बजेट अवलंबून असतो. परंतु शेतमालाचे दर पूर्णत: कोसळल्याने शेतकऱ्यांना यावर्षी बँकांकडून घेतलेले कर्ज भरणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांचा संघर्ष संपणार कधी?
शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. असे छातीठोकपणे अभिमानाने सांगितले जाते. ते खरेही आहे. परंतु आज शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून दरवाढीसाठी संघर्ष करतो. मात्र शेतकºयांचा हा टाहो कुणीही ऐकून घ्यायला तयार नाही.
शेतमालाला भाव द्या, दुसरे काहीही नको...
शेतकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे. दिवस-रात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी असलेला हा नरकयातनांचा संघर्ष थांबायलाही तयार नाही. आम्हाला फक्त भाव द्या. दुसरे काहीही नको, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

सरकारने शेतकऱ्यांना ‘अच्छे दिना’चे गाजर दाखविले. शेतकऱ्यांचे चांगले दिवस येईल, असा विश्वास देऊन सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतमाल दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी होरपळला असताना सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव दिला नाही.
- बाबाराव पिंपळशेंडे,
शेतकरी, वनोजा.

Web Title: Farmers' resentment for the increase in the cost of the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.