जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:36 PM2018-12-15T22:36:20+5:302018-12-15T22:36:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नगरपालिका, नगरपंचायतीमधील संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी आणि अनुकंपधारकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण ...

Demolition movement of the municipal employees of the district | जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देसमस्या सोडवा : अन्यथा काम बंद आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नगरपालिका, नगरपंचायतीमधील संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, रोजंदारी कर्मचारी आणि अनुकंपधारकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. यासंदर्भात कर्मचारी-कामगार संघटना संघर्ष समितीमार्फत अनेकदा आंदोलने केली. निवेदने दिली. परंतु मागण्या अजूनपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील सर्व न.प. कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपालिका, नगरपंचायतीसमोर शनिवारी धरणे आंदोलन करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
चिमूर नगर परिषदेमधील सर्व ८० कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेसमोर धरणे दिले. शासनाने विविध मागन्या मान्य न केल्यास २९, ३०, ३१ डिसेंबरला नगर परिषदेमधील सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. याही तीन दिवसात मागण्या मंजूर न झाल्यास १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याची माहिती नगर परिषद कर्मचारी संघचे अध्यक्ष मिनाज शेख, उपाध्यक्ष हरिचंद्र डांगे यांनी दिली आहे.
गोंडपिपरी नगर पंचायतसमोर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी धरणा दिल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी राऊत यांना दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात गोंडपिपरी नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद वनकर, सचिव विनोद वाघाडे, उपाध्यक्ष बंडू झाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी नगराध्यक्ष सपना साकलवार यांनादेखील निवेदनाची प्रत देण्यात आली. नागभीड येथे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना जिल्हा सचिव मोरेश्वर येरणे, नागभीड नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष परसराम वंजारी, सचिव रितेश येरणे, नंदा गोडे, मीनाक्षी खापर्डे, गजानन समर्थ, गुलाब ठाकरे, उमाकांत बोरकर, विनायक चौधरी, बाळकृष्ण राऊत व इतर कर्मचारी उपस्थित होते.
धरणे आंदोलन
भद्रावती येथेही एस. एम. पाटील यांच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी न. प. भद्रावतीचे कर्मचारी च. तु. शेडमाके, गुप्ता, गड्डमवार, आशिष घोडे, भुपेश कांबळे, सचिन गाढवे, सुरेंद्र चोचमकर, पि. के. वाणी, एम. जी. धात्रक, पि. एम. उंबरकर, नंदकिशोर केवटे, दीपक मेश्राम, गोविंदा पतरंगे आदी उपस्थित होते.
गडचांदुरातही धरणे
गडचांदूर : नगर परिषद,नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्या वतीने येथील नगर परिषद कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी १ जानेवारी २०१९ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा सरकारला इशारा देण्यात आला. यावेळी गडचांदूर नगर परिषद व जिवती नगर पंचायत सर्व कर्मचारी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
नगरपंचायतीमधील सर्व कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून विना अटीने सातवा वेतन आयोग लागू करावा, नगरपंचायतीमधील उदघोषणापूर्वीचे सफाई कामगार व कर्मचारी आणि नंतरचे संगणक चालक, पाणीपुरवठा, सफाई विभागातील कर्मचारी कायम करण्यात यावे, समावेशनपूर्वी मयत झालेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबियांना सेवा निवृत्तीचा लाभ द्यावा, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राम सेवा ग्राह्य धरण्यात यावी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार वर्ग ३ च्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी, २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, विधानसभा पटलावर मांडलेल्या सफाई आयोगाच्या अहवालाची तात्काळ अमलबजावणी करावी आदी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

Web Title: Demolition movement of the municipal employees of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.