दीक्षाभूमीवर भीमसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:14 PM2018-10-15T23:14:13+5:302018-10-15T23:15:46+5:30

येथील दीक्षाभूमीवर ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने भीमसागर पाहायला मिळणार आहे.

Bhimasagar on Dikshitboomar | दीक्षाभूमीवर भीमसागर

दीक्षाभूमीवर भीमसागर

Next
ठळक मुद्दे६२ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा : आज दिवसभर विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे चंद्रपूर दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने भीमसागर पाहायला मिळणार आहे.
१६ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चंद्रपूर दीक्षाभूमीवर लाखो बौद्ध बांधवाना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळच्या सुमारास काढण्यात आलेल्या रॅलीत शेकडो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते. त्यानंतर उद्घटनीय कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी अनेक मान्यवर व भिक्खु संघ उपस्थित होते.
दीक्षाभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. दीक्षाभूमी परिसरात बुक स्टॉल, कॅसेट्स स्टॉल, लहान मुलांच्या खेळण्यांचे दुकान, महामानवाचे फोटो स्टॉल, बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतव बुद्ध यांच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल, सिध्दार्थ गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे बॅच व लॉकेटचे स्टॉल, भोजनदानाचे स्टॉल लावण्यात आले आहे. दीक्षाभूमीवर येऊन वंदन केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांमध्ये उर्जा निर्माण होत असते. त्यामुळे आम्ही दरवर्षीच या दीक्षाभूमीवर येत असल्याची प्रतिक्रीया अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. तदनंतर योगिता पुणेकर यांच्या संचाने डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संगित नाट्य सादर केले.
५०० पोलीस कर्मचारी तैनात
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी लावण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, १० पोलीस निरिक्षक, ४६ पोलीस उपनिरिक्षक ३८७ पुरुष शिपाई, १३४ महिला पोलीस शिपाई, होमगॉर्ड, आरसीबीचे दोन पथके तैनात आहेत. तसेच पोलीस चौकीतून लाऊंडस्पिकरच्या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी नागरिकांना सुचना देण्यात येत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चौफेर नजर
दीक्षाभूमी परिसरात येणाऱ्या बौद्ध अनुयायांची संख्या मोठी असल्याने कोणतीही प्रकारची दुर्घटना होऊ नये, यासाठी दीक्षाभूमी परिसरात चौफर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यातून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच दीक्षाभूमीला जाणाऱ्या सर्व मार्गावरील चौका-चौकात पोलिसांचे पथक तैनात आहेत. त्यासोबतच समता सैनिक दल, पोलीस मित्र, स्वयंसेवकही दीक्षाभूमी परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
धार्मिक ग्रंथांसह विविध पुस्तके विक्रीला
दीक्षाभूमी येथे जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांनी नवनविन ग्रंथ व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. जवळपास २५ ते ३० पुस्तकांचे स्टॉल दीक्षाभूमी परिसरात लागले असून अनेक पुस्तकविक्रेते आपले स्टॉल थाटण्याची तयारी करीत आहेत. यामध्ये वैचारिक, धार्मिक, बौद्धिक, कादब्ांरी, कथा पुस्तके, स्पर्धात्मक परीक्षाची पुरस्के आदी पुस्तकासाठी विक्रीला ठेवण्यात आला असून पुस्तके व ग्रंथ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यामध्ये ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, ‘शुद्र पूर्वी कोण होते’, ‘डॉ. बाबासाहेब यांच्या भाषणांचे संपूर्ण खंड’, ‘भारतीय संविधान’, ‘जनमाहिती कायदा’ या पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती एका पुस्तक विक्रेत्यांनी दिली. यासोबतच आरक्षण भीक नाही, प्रतिनिधीत्व, ईव्हिएम घोटाळा एक षडयंत्र, यांच्या विविध ग्रंथ व पुस्तके विक्रील ठेवण्यात आली आहे.
भारतीय बौद्ध महासभेची नोंदणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा सदस्यांची नोंदणी दीक्षाभूमी परिसरात स्टॉल लावून करण्यात येत आहे. तसेच चळवळीची माहितीसुद्धा देण्यात येत आहे. दिवसभरामध्ये अनेकांनी सदस्यांची नोंदणी केल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी दिली.
सामाजिक संस्थेतर्फे पाणपोई
दीक्षाभूमीवर येणाऱ्या बौद्ध अनुयांयासाठी विविध सामाजिक संस्थेतर्फे पाणपोईची व्यवस्था दीक्षाभूमी परिसरात करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसर ते वरोरा नाका ते रामनगर चौकापर्यंत १२ ते १५ पाण्याचे स्टॉल लावण्यात आले आहे.
आरोग्याबाबत जनजागृती
दीक्षाभूमी परिसरात जनजागृतीपर विविध फलक लावण्यात आले आहेत. मात्र चंद्रपुरातील मेंदूरोग व मानसोपचार रोग तज्ज्ञ डॉ. विवेक बांबोळे यांनी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारे स्टॉल लावले असून त्यातून ते नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. दिवसभरात या स्टॉलला अनेकांनी भेट देऊन नोंदणी केली. त्यासोबतच विविध थोर नेते, कलावंत, राजकीय नेते यांनी दिलेल्या संदेशाचे फलकही याठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच रुग्णांच्या समस्या जाणून डॉ. बांबोळे मार्गदर्शन करीत आहेत.
भिक्खू संघाची मोठ्या संख्येने उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे १६ आॅक्टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळे या प्रवित्र दिनी वंदन करण्यासाठी विदर्भातील भिक्खुसंघ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी भिक्खु संघानी बुद्ध, धम्म, संघ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच दीक्षाभूमी येथील विहारात उपस्थित बौद्ध बांधवांना धम्म प्रवचन दिले. यावेळी महाथेरो महास्थवीर ज्ञानज्योती, भदंत चेती, भदंत सोन, भदंत आर्यसुत, भदंत बुद्धज्योती यांच्यासह संघारामगिरी येथील भिक्खु संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच श्रामनेर भंते यांचीसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी
दीक्षाभूमी परिसरात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळेच्या व अष्टधातूच्या विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १५० ते लाखो रुपयेपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. या मूर्ती खरेदीसाठी बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
‘त्या’ मूर्तीने वेधले सर्वांचे लक्ष
चंद्रपूर दीक्षाभूमीवर मूर्ती विक्रेत्याकडे एक फुटांपासून मूर्ती उपलब्ध आहे. एका विक्रेत्यांकडे सात फुटांची डॉ. बाबासाहेबांची मूर्ती विक्रीला ठेवण्यात आली असून ती मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे या मूतीसोबत अनेकांनी सेल्फीसुद्धा घेतली.
लॉकेट खरेदीला युवकांची पसंती
दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात युवक व युवती येत असतात. दीक्षाभूमीवर विविध प्रकारचे लॉकेट्स, निळा दुप्पटा, गाडीचे किचैन, हातात लावायचे बॅण्ड, निळी टोपी, डॉ. आंबेडकर व गौतम बुद्ध यांची प्रतिकृती असलेली दीक्षाभूमीच्या आकारातील लॉकेट, पंचशील रंगाचा दुप्पटा अशा वस्तूची विविध दुकाने दीक्षाभूमी परिसरात लागली आहे. या वस्तूची खरेदीसाठी युवावर्ग मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. १५ ते २० रुपयांपासून २०० ते २५० रुपयांपर्यंत किंमतीचे लॉकेट येथील स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.

Web Title: Bhimasagar on Dikshitboomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.