समृद्ध किसान योजनेसाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 10:21 PM2019-01-18T22:21:11+5:302019-01-18T22:22:19+5:30

शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.

Agreement for Prosperous Farmer Scheme | समृद्ध किसान योजनेसाठी करार

समृद्ध किसान योजनेसाठी करार

Next
ठळक मुद्देविकासकामांचा आढावा : पालकमंत्र्यांनी घेतली १२ तासांची मॅराथॉन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
समृद्ध किसान कार्यक्रम हा पथदर्शी कार्यक्रम सन २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या कालावधीत दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर हे तीन तालुके, दुसºया टप्प्यात नागभीड, गोंडपिपरी, जिवती तालुक्यात राबविला जाईल. सदर कार्यक्रमामुळे शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आजच्या बैठकीमध्ये आमदार नाना श्यामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपा सभापती राहुल पावडे उपस्थित होते. या योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन, पॉली हाऊस नर्सरी, भाजीपाला लागवड, कृषी यांत्रिकीकरण, समूह सिंचन, सिंचन विहिरीची दुरुस्ती, उपसा सिंचन योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, आदी नावीन्यपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहे.
आज आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेतकरी कर्जमाफी, पाणीटंचाई, जयपूर येथील प्रस्तावित शेतकरी वेल्फेअर ट्रस्टमार्फत राबविण्यात येणारी कामे, जिल्ह्यातील ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची सद्यस्थिती, विविध योजनांची माहिती, समृद्ध किसान योजना, लोहारा येथील गोरक्षण जागा बाबतची चर्चा, जिल्ह्यातील जिल्हा सैनिक शाळा, बाबूपेठ, राजुरा येथील उड्डाणपूल, मूल, पोंभूर्णा, बल्लारशहा या ठिकाणची क्रीडा संकुल, वन अकादमी इमारतीचे बांधकाम, पोलीस प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व महानगरपालिकांच्या वैशिष्टयपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय महाकाली मंदिर परिसराचा विकास, महानगरपालिका मार्फत तयार होत असलेल्या बाबुराव शेडमाके स्टेडियम व ज्युबिली हायस्कूलसाठी देण्यात आलेल्या विशेष निधीचा आढावादेखील घेण्यात आला.
या सर्व योजनांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करण्याबाबतचे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. त्याबाबतचा अहवाल सातत्याने कळवा, असेही सांगितले.
असे आहेत योजनेचे उद्देश
समृद्ध किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करणे, उत्पन्न वाढ होण्यास मदत करून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय शेतकºयांचे समूहगट निर्मिती करणे, बाजाराला जोडलेल्या प्रोडक्शन क्लस्टरची निर्मिती करणे, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीत यांत्रिकीकरण आणि पिकांचे मूल्य वाढविणे, उत्पादित मालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळून देणे, पूरक व्यवसायांची व्हॅल्यू चेन तयार करणे आदी उद्देश या योजनेचे ठेवण्यात आले आहेत.

Web Title: Agreement for Prosperous Farmer Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.