Sting Operation : गरज ८२ हजार लिटरची मिळते ४८ हजार लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:33 PM2019-05-13T13:33:50+5:302019-05-13T13:38:25+5:30

काही गावांना गरजेपेक्षा निम्माच पाणीपुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनदरम्यान समोर आले.

Sting Operation: Need 82 thousand liters get 48 thousand liters | Sting Operation : गरज ८२ हजार लिटरची मिळते ४८ हजार लिटर

Sting Operation : गरज ८२ हजार लिटरची मिळते ४८ हजार लिटर

Next
ठळक मुद्दे८२ हजार लिटर पाण्याची गरज असताना येथे प्रत्यक्षात ४८ हजार लिटरच पाणी ग्रामस्थांना मिळत असल्याचे या पाहणीत समोर आले.रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथेही तब्बल एक हजार लिटर पाणी कमी येत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात एकही शासकीय टँकरद्वारे हा पाणीपुरवठा होत नाही.


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या दीड दशकातील दुष्काळाची तीव्र दाहकात असलेल्या बुलडाणा जिल्ह्याची टँकरवाड्याकडे वाटचाल सुरू असतानाच टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार्या काही गावांना गरजेपेक्षा निम्माच पाणीपुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने १२ मे रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनदरम्यान समोर आले. एकट्या मेहकर तालुक्यातील वरवंड, उटी, बोथा या गावांमध्ये प्रामुख्याने ही समस्या समोर आली. वरवंड येथे ८२ हजार लिटर पाण्याची गरज असताना येथे प्रत्यक्षात ४८ हजार लिटरच पाणी ग्रामस्थांना मिळत असल्याचे या पाहणीत समोर आले.
देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड येथेही एक हजार लिटर पाणी कमी येत असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले.
रविवारी १२ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील २८ गावांमध्ये ‘टँकर गेले कुण्या गावा’ हे शिर्षक घेऊन हे स्टींग आॅपरेशन करण्यात आले. त्यावेळी हे वास्तव समोर आले. बुलडाणा तालुक्यातील पिंपरखेड, सिंदखेड राजा तालुक्यातील सावंगी भगत, उमणगाव, जनुना, तांडा, नागझरी, दरेगाव, किनगाव राजा, देऊळगाव राजा तालुक्यात उंबरखेड, लोणार तालुक्यात किनगाव जट्टू, वसंतनगर, देवानगर, पिंपळखूटा, मातमळ या गावांसह घाटाखालील शेगाव तालुक्यातील चिंचोली, नांदुरा तालुक्यातील सिरसोडी, खामगाव तालुक्यातील पारखेड, लांजूळ, संग्रामपूर तालुक्यातील इटखेड व पैसोडा यासह अन्य गावात हे स्टींग करण्यात आले.
लोणार तालुक्यातील गावांमध्ये टँकर नियमित येत नसल्याची नागरिकांची ओरड होती. तर पिंपळखुटा गावात रस्त्यात मुरूम टाकण्यात आल्याने टँकर येण्यास समस्या आहे. टँकर अनियमित येते असे ग्रामस्थांनी सांगितले.
एकट्या मेहकर तालुक्यात वरवंड, बोथा आणि उटी या गावांना त्यांच्या गरजेपेक्षा कमी पाणी मिळत आहे. वरवंडला ८२ हजार लिटर पाण्याची गरज असताना येथे प्रत्यक्षात ४८ हजार लिटरच पाणी ग्रामस्थांना टँकरद्वारे पोहोचविण्यात येत आहे. घाट रस्ता असल्याने टँकर रस्ता चढत नसल्याचे कारण चालकाने दिले. पंचायत समितीला टँकर वाढविण्यासाठी पत्र दिले असले तरी अद्याप त्यावर अंमलबजावणी झाली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. बोथा गावाला ४१ हजार लिटर पाण्याची गरज असताना येथे २४ हजार लिटरच पाणी मिळत आहे. कमी पाणी टँकरद्वारे आणण्याबाबत विचारणा केली असता महामार्गाचे काम सुर आहे. त्यामुळे टँकरमध्ये कमी पाणी आणतो असे अजब उत्तर देण्यात आले. उटी गावातही हीच समस्या दिसून आली. ७२ हजार लिटर पाण्याची गरज असताना येथे प्रत्यक्षात ३६ हजार लिटरच पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
सिंदखेड राजा तालुक्यात तर टायर अभावी टँकर उभे असल्याचे निदर्शनास आले. या तालुक्यात अधिग्रहीत केलेल्या विहीरींनी तळ गाठल्याने टंचाईग्रस्त गावांना अनियमित स्वरुपात पाणीपुरवठा होत आहे. देऊळगाव राजा तालुक्याततील उंबरखेड येथे जीपीएस यंत्रणा टँकरवर सुरळीत सुरू असून लॉग बुकही नियमित भरल्या जात असून नोंदीही सुस्थितीत आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथेही तब्बल एक हजार लिटर पाणी कमी येत असल्याचे सांगण्यात आले. कमी अधिक फरकाने सर्वच ठिकाणी अशी स्थिती पाहणीदरम्यान आढळून आली. याबाबत कंत्राटदार मोतीलाल काबरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
 
एकही शासकीय टँकर नाही
 बुलडाणा जिल्ह्यात २१० गावात २२० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असले तरी जिल्ह्यात एकही शासकीय टँकरद्वारे हा पाणीपुरवठा होत नाही. त्यासाठी मोतिलाल काबरा नामक व्यक्तींच्या फर्मला कंत्राट दिलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्याकडील टँकरद्वारेच पाणीपुरवठा केल्या जात असल्याचे यासंदर्भात प्रशासकीयस्तरावर विचार केली असता सुत्रांनी सांगितले.


कुठल्याच टँकरवर नव्हते बॅनर

कोणत्या गावासाठी टँकर मंजूर आहे, कोठे भरते, कोठे खाली होते, कधी पासून सुरू आहे याची सर्वंकष माहिती असलेले बॅनर स्टींग दरम्यान एकाही टँकरवर दिसून आले नाही. त्यामुळे टँकर नेमके कुठले आणि कोणत्या गावाला जाणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. सोबतच अशा प्रकारामुळे प्रसंगी पाण्याची चोरी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संग्रामपूर तालुक्यातील पेसोडा येते तर कागदाचे बॅनर असल्यामुळे ते खराब झाल्याचे चालकाने सांगितले.


टायर पंक्चर झाल्याने उशिरा पाणी
 शेगाव तालुक्यातील चिंचोली गावाला जाणारे पाण्याचे टँकर वेळेवर पंक्चर झाल्याने या गावात ते निर्धारित वेळेपेक्षा उशिरा पोहोचले. साखरखेर्डा परिसरातील काही गावांमध्येही अशीच काहीसी समस्या स्टींग दरम्यान समोर आली.


निमखेडीतही पाण्याचा पुरवठा कमी
 मलकापूर तालुक्यातील निमखेडी येथेही टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा हा कमी होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील पाण्याची टाकी ५० हजार लिटरची असताना टँकरच्या तीन फेर्या झाल्यानंतर ही टाकी भरते. त्यामुळे प्रती टँकर २४ हजार लिटर पाणी येत नसल्याचा संशयच ग्रामस्थांनी व्यक्त केला. वास्तविक या गावाची ६२ हजार लिटर पाण्याची गरज आहे.


प्रकरणी तपासणी करून प्राप्त अहवालाच्या आधारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. सोबतच वरवंटसाठी नुकतेच आणखी एका टँकर फेरीला मान्यता देण्यात आली आहे.
- राजेश पारनाईक, निवासी उपजिल्हाधिकारी बुलडाणा

Web Title: Sting Operation: Need 82 thousand liters get 48 thousand liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.