मैत्रेय घोटाळा; बुलडाणा जिल्ह्यातील व्याप्ती ९८ कोटींच्या घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:18 PM2019-06-08T15:18:44+5:302019-06-08T15:18:50+5:30

आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांची यामध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

Maitreya scam; Buldhana district orbit 98 crore house! | मैत्रेय घोटाळा; बुलडाणा जिल्ह्यातील व्याप्ती ९८ कोटींच्या घरात!

मैत्रेय घोटाळा; बुलडाणा जिल्ह्यातील व्याप्ती ९८ कोटींच्या घरात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाच वर्षांत दामदुपटीसह विविध स्वरूपाच्या स्किम आणून ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात सक्तवसुली संचालनालयाच्या निर्देशानुसार आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. दरम्यान, आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांची यामध्ये फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. जवळपास ९८ कोटी रुपयांपर्यंत ही फसवणूक झाल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सन २०१६ पासून बुलडाणा पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत असून, राज्यात या प्रकरणी जवळपास ३२ ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील ठेवीदारांची ९८ कोटी रुपयांनी यात फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ६९ कोटी ४५ लाख ७४ हजार २८६ रुपये ठेवीदारांनी यात गुंतवले असल्याचा लेखाजोखा आर्थिक गुन्हे शाखेने मिळविला आहे. यामध्ये आणखी काही ठेवीदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यापैकी २३ हजार ठेवीदारांची माहिती ही आतापर्यंत संगणकीकृत करण्यात आली आहे. मैत्रेय घोटाळ््याची व्याप्ती मोठी असून, त्या दृष्टीने आर्थिक गुन्हे शाखा ईडीच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करत आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकरणात २२ जुलै २०१५ पूर्वी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात कंपनीची मालमत्ता कोठे कोठे आहे, याचा शोध घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते. त्यानुषंगाने राज्यातील विविध युनिट त्याचा शोध घेत आहेत. यामध्ये बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील मालमत्तेचा शोध घेतला असून, त्याचा अहवालही या प्रकरणामध्ये व्हिजिलिंग करणाऱ्या मुंबई येथील अप्पर पोलीस महासंचालकांकडे मध्यंतरी सादर केला आहे. दुसरीकडे या कंपनीची मध्य प्रदेशासोबतच महाराष्ट्र, गोवा, गुजरात राज्यातही मालमत्ता असण्याची शक्यता आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीेने सध्या यंत्रणा कार्यरत आहे. या प्रकरणात वर्षा मधुसूदन सत्पाळकर सह अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. आता वरिष्ठस्तरावर या प्रकरणी काय निर्णय घेतला जातो तथा न्यायालय काय सूचना देते, त्यावर पुढील बाबी अवलंबून राहतील; मात्र ढोबळमानाने कंपनीच्या मिळालेल्या मालमत्तेचा लिलाव करून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्याचा प्रयत्न होईल, असे संकेत अधिकाऱ्यांनी दिले.
 
एमपीआयडीचेही कलम समाविष्ट
या प्रकरणात अलीकडील काळात तपासादरम्यान एमपीआयडी २०१२ (महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण कायदा) मधील काही कलमांचाही अंतर्भाव केला आहे. त्या दृष्टीने कायदेशीर कार्यवाही येत्या काळात केली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
छिंदवाड्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्ता
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात मैत्रेय कंपनीची मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असल्याचे तपासात समोर आले आहे. या जिल्ह्यात १,२०० एकर शेती असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रत्यक्ष तेथे जाऊन मिळविलेल्या माहितीच्या आधारावर स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या कंपनीची एकंदरीत १९ हजार एकर शेती असून, प्लॉटिंग व्यवसायासाठी तिचा वापर केला जाणार होता, असे समोर येत आहे. या पैकी छिंदवाडा येथील १,२०० एकर जमिनीची कागदपत्रेही बुलडाणा आर्थिक गुन्हे शाखेने मिळवली असून, ती अप्पर पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली असल्याचे सूत्र सांगत आहेत. राज्यातील वेगवेगळ््या युनिटला या कंपनीची मालमत्ता कोठे कोठे आहे, याचा शोध घेण्याचे मध्यंतरी निर्देश देण्यात आले होते. त्यानुषंगाने ही माहिती संकलित केल्या जात आहे.
 
बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख १० हजार १६८ ठेवीदारांनी या कंपनीत ६९ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये गुंतवले असल्याचे आमच्या तपासात समोर आले आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या निर्देशानुसार तथा सूचनेनुसार या प्रकरणात आम्ही तपास करत आहोत.
- एम.एम. बोडके, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलडाणा.

Web Title: Maitreya scam; Buldhana district orbit 98 crore house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.