महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 05:11 PM2019-05-05T17:11:41+5:302019-05-05T17:12:13+5:30

रथयात्रा ५ मे रोजी बुलडाणा मार्गे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर येथे दाखल झाली.

Maharashtra Heritage Conservation- Enhancement Rath Yatra in Lonar | महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल

महाराष्ट्र वारसा जतन- संवर्धन रथयात्रा लोणारात दाखल

Next

लोणार: चंद्रपूरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याची सलग ७०० दिवस स्वच्छता केल्यानंतर इको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी ‘आपला वारसा, आपणच जपूया’ असा नारा देत संपूर्ण राज्यात ऐतिहासिक वारसा आणि वन्यजीवासह निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महाराष्ट्र वारसा जतन व संवर्धन परिक्रमा १ मे पासून सुरू केली आहे. ही रथयात्रा ५ मे रोजी बुलडाणा मार्गे जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर येथे दाखल झाली.
इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात सुमारे २५ कार्यकर्ते दुचाकी आणि रथासह महाराष्ट्रभर २० मे पर्यंत भ्रमंती करत आहेत. चंद्रपूरला ऐतिहासिक गड-किल्यांच्या, स्मारकांचा समृध्द वारसा आहे. याशिवाय ताडोबाच्या निमित्ताने वन्यजीव आणि निसर्गाची समृध्दीही चंद्रपूरला लाभलेली आहे. त्यांच्या संवर्धनासाठी इको-प्रो संस्था एक दशकाहून अधिक काळापासून कार्यरत आहेत. राज्यातील अनेक ठिकाणचा ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित असून, त्याचे जतन आणि संवर्धन गरजेचे आहे. नैसर्गिक वारसा असलेले अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, वन-वन्यजीव यांचा अधिवास अनेक कारणामुळे प्रभावित होत आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे वन्यप्राणी संवर्धनाची चळवळ संकटात आलेली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी सर्व पातळीवर जागृती गरजेची आहे. या दोन्ही प्रकारच्या वारसा संवर्धन जनजागृतीच्या दृष्टीने ही परिक्रमा मैलाचा दगड ठरणार आहे. परिक्रमेत इको-प्रो संस्थेचे २५ युवक आपल्या दुचाकीसह स्वंयप्रेरणेने सहभागी झाले असून, सुमारे पाच हजार किमीचे राज्यभ्रमण करत आहेत. दरम्यान, ही रथयात्रा जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर येथे ५ मे रोजी सकाळी १० वाजता दाखली झाली. रथयात्रेचे मी लोणारकर टीम तसेच काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष नितिन शिंदे यांनी स्वागत केले. त्यानंतर शहरातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर  भारतीय पुरातत्व सर्वेक्षण लोणार उपमंडळ कार्यालयात ऐतिहासिक वारसा चित्र प्रदर्शन व संवर्धन पर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी भारतातील जागतिक वारसा स्थळे ते लोणार व बुलडाणा जिल्ह्यातील स्मारकांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली. स्मारके ही सार्वजनिक व स्मारकांच्या आजूबाजूस राहणाºया नागरिकांचीच संपत्ती असल्यामुळे स्मारकांना होणारे नुकसान टाळावे तसेच स्मारकांच्या आजूबाजूला स्वच्छता राखावी, असे आवाहन करण्यात आले. स्मारकांचे जतन करण्याच्या दृष्टीने मी लोणारकर टीम, स्थानिक नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महिला,विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन लोणार येथील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण लोणार उपमंडळ कार्यालयाचे कर्मचारी व वरिष्ठ सरंक्षण सहाय्यक एच. बी. हुकरे यांच्यातर्फे करण्यात आले. 
 
राज्याभरातील ऐतिहासीक वारसा संदर्भातील समस्या सुटणार 

१ मे रोजी चंद्रपूर येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर ही परिक्रमा सुरु झालेली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संबंधित जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा व वन-वन्यजीव नैसर्गिक वारसा संदर्भातील समस्यांचा आढावा घेत त्याच्या निवारणासाठी उचित आराखडा बनविण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक तसेच विशेषज्ज्ञ यांच्या बैठकाही घेण्यात येतील. या माध्यमातून राज्यभर विणलेल्या जाळ्यातून संपूर्ण राज्यातील या क्षेत्राच्या समस्या निवारणासाठी उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती विश्वास बंडू धोतरे यांनी दिली.
 

Web Title: Maharashtra Heritage Conservation- Enhancement Rath Yatra in Lonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.