पांडुरंगाच्या उत्सवातील कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:09 AM2018-01-29T00:09:17+5:302018-01-29T00:12:17+5:30

बुलडाणा : संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणार्‍या गंगाजीबुवा मवाळ यांनी ३७१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची परंपरा त्यांचे वंशज आजही जपत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या उत्सवातील माघ शुद्ध एकादशीच्या मुख्य कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला मिळाला आहे. 

Kirtankar of Buldhana district celebrates Kirtan in Panduranga festival! | पांडुरंगाच्या उत्सवातील कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला!

पांडुरंगाच्या उत्सवातील कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला!

Next
ठळक मुद्दे३७१ वर्षांपासून होतो उत्सव तुकोबारायांच्या टाळकर्‍यांचे वंशज जपताहेत परंपरा 

ब्रह्मनंद जाधव। 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणार्‍या गंगाजीबुवा मवाळ यांनी ३७१ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची परंपरा त्यांचे वंशज आजही जपत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पांडुरंगाच्या उत्सवातील माघ शुद्ध एकादशीच्या मुख्य कीर्तनाचा मान बुलडाणा जिल्ह्याच्या कीर्तनकाराला मिळाला आहे. 
संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन भजन करणारे एकूण चौदा टाळकरी इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यातील एक होते कडूस ता. राजगुरुनगर जि. पुणे येथील गंगाजीबुवा मवाळ! या चौदाही टाळकर्‍यांचे नावासह पुतळे देहू संस्थानाने भव्य स्वागत कमानीवर कोरलेले आहेत. 
माघ शुद्ध दशमी हा तुकोबांचा अनुग्रह दिन! याचदिवशी ओतूरच्या बाबाजी चैतन्य या सद्गुरूंनी तुकाराम महाराजांना ‘रामकृष्णहरी’ या उघड्या गुरुमंत्राचा स्वप्नामध्ये उपदेश केला होता,  हे स्वत: तुकोबारायांनी आपल्या ‘सत्यगुरुराये कृपा मज केली’ या प्रसिद्ध अभंगात सांगितलेले आहे. 
एकेवर्षी याचदिवशी तुकोबांनी त्यांचे टाळकरी गंगाजीबुवा मवाळ यांना विठ्ठलाची मूर्ती दिली. तसेच दरवर्षी सहा दिवस पंढरीच्या विठ्ठलाचे वास्तव्य कडूसला राहील, असे सांगितले. 
तेव्हापासून पांडुरंगाचे आगमन व वास्तव्य यानिमित्ताने गंगाजीबुवांनी उत्सव सुरू केला. या उत्सवाची परंपरा तुकोबारायांचे टाळकरी असलेले गंगाजीबुवांचे वंशज दरवर्षी नित्यनेमाने जपत आहेत. पांडुरंगाचा हा उत्सव माघ शुद्ध दशमी म्हणजे २७ जानेवारीपासून सहा दिवस कडूस ता. राजगुरुनगर जि. पुणे येथे चालणार आहे. या उत्सवाचे यंदा ३७२ वे वर्ष आहे. 
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी पाऊलघडीचा कार्यक्रम होऊन पांडुरंगाला साश्रूनयनांनी निरोप दिला जातो. या उत्सवात पांडुरंग वास्तव्याला असतो, अशी धार्मिक श्रद्धा असल्याने हा उत्सव पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या प्रासादिक मानल्या जाणार्‍या उत्सवात २८ जानेवारी रोजी  माघ शुद्ध एकादशीचे कीर्तन करण्याचा मान यावर्षी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील संत बाळाभाऊ महाराजांचे चौथे वंशज गोपाल महाराज पितळे यांना मिळाला आहे. 

तुकाराम महाराजांनी लावली होती पाच वर्षे हजेरी
पश्‍चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या व गंगाजीबुवा मवाळ यांनी सुरू केलेल्या पांडुरंगाच्या उत्सवाची सुरूवात तुकाराम महाराजांनी करून दिली. त्यानंतर या उत्सवाला वैकुंठगमनापूर्वी स्वत: संत तुकाराम महाराज सतत पाच वर्षे उपस्थित राहिल्याचा दाखला उपलब्ध आहे.  त्यामुळे पांडुरंगाच्या या उत्सावाला धार्मिक इतिहास लाभलेला आहे. 

Web Title: Kirtankar of Buldhana district celebrates Kirtan in Panduranga festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.