अखेर चार दिवसांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात! वाकोडी-निंबारीतील गावकऱ्यांना दिलासा

By सदानंद सिरसाट | Published: March 26, 2024 01:48 PM2024-03-26T13:48:55+5:302024-03-26T13:50:17+5:30

तब्बल दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभागाला आले यश

Finally, after four days, the leopard is in the forest department's net! Relief to the villagers of Wakodi-Nimbari | अखेर चार दिवसांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात! वाकोडी-निंबारीतील गावकऱ्यांना दिलासा

अखेर चार दिवसांनी बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात! वाकोडी-निंबारीतील गावकऱ्यांना दिलासा

सदानंद सिरसाट, मलकापूर (बुलढाणा): तालुक्यातील वाकोडी-निंबारी शिवारात गत चार-पाच दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला आरआरयू टीमने २५ मार्च रोजी जेरबंद केले. तब्बल दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभागाला यश आले आहे. यामुळे परिसरातील शेकडो ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील वाकोडी-निंबारी शिवारात नळगंगा नदीकाठच्या भागात जंगल आहे. त्यामुळे झाडीत वाघ असल्याची चर्चा सुरू होती. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते जंगली जनावर आढळल्याची माहिती घाबरलेल्या अवस्थेत शेतमजुरांनी सरपंच शुभम काजळे यांना दिली. त्याअनुषंगाने आधी पोलिस व नंतर वन विभागाची चमू पडताळणीसाठी घटनास्थळी दाखल झाली.

रविवारी सायंकाळी बिबट्या की वाघ यादृष्टीने वन विभागाच्या वतीने शोधाशोध करण्यात आली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. परिणामी, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन एक दिवस पुढे ढकलले. सोमवारी सकाळी ७ वाजता लोकांना बिबट्या आढळून आला. त्यानुसार सहायक वनसंरक्षक ए. एन. ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनरक्षक राजेश शिरसाट, वनपाल ए. एन. सपकाळ, वनसंरक्षक एस. एस. बहुरुपे, संदीप मडावी व बुलढाणा आरआरयू टीम घटनास्थळी दाखल झाली.

तब्बल दोन तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वन विभागाला यश आले. टीमने बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद केले. यादरम्यान बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असंख्य गावकरीदेखील सहभागी झाले होते. अखेर चार दिवसांनी तो बिबट्या वन विभागाच्या जाळ्यात अडकला. त्यामुळे वाकोडी-निंबारी शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

उमाळीत बिबट्याची दहशत!

मलकापूर तालुक्यातील वाकोडी-निंबारी शिवारात बिबट्या जेरबंद झाला. मात्र, दुसरीकडे तालुक्यातील उमाळीत गुलाम हुसेन यांच्या मालकीच्या पाच बकऱ्या व एका गायीचे वासरू जंगली जनावराच्या हल्ल्यात ठार झाले आहे. ही घटना २५ रोजी मार्च उघडकीस आली. ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीप काळे यांनी घटनास्थळी दाखल होत स्थळ पंचनामा केला. त्यामुळे आता बिबट्याच्या माध्यमातून उमाळी शिवार रडारवर आले आहे.

Web Title: Finally, after four days, the leopard is in the forest department's net! Relief to the villagers of Wakodi-Nimbari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.