Completion of 38 lakes; 92 water shades works has been done | १५ गावातील ३८ शेततळे पुर्ण, ९२ बंधाऱ्यांचे खोलीकरण
१५ गावातील ३८ शेततळे पुर्ण, ९२ बंधाऱ्यांचे खोलीकरण

ठळक मुद्देसन २०१६-१७ मध्ये १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करावयाची होती. पैकी १४ गावातील कामे पुर्ण झाली असून ४ गावातील कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

- नानासाहेब कांडलकर
 
जळगाव जामोद :  तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रचंड वेग आला आहे. शेतकरी वर्गाच्या सक्रीय सहभागामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत असणारी शेततळे, सिमेंट नाला बांध, जुन्या सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण या कामांना गती मिळाली आहे. पाणी अडविण्याची व जमिनीत मुरविण्याची प्रक्रिया झाल्याशिवाय शेतीचे भविष्य कठीण आहे. हा विचार सर्व शेतकरी बांधवांना भावल्यामुळे शासनाच्या विविध विभागाअंतर्गत राबविण्यात येणाºया जलयुक्त शिवार कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
सन २०१६-१७ मध्ये १८ गावांमध्ये जलयुक्त शिवारची कामे करावयाची होती. पैकी १४ गावातील कामे पुर्ण झाली असून ४ गावातील कामे प्रगतीपथावर आहे. ही कामे १५ जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कामांवर प्रस्तावित खर्च १७० लक्ष होता. त्यापैकी ११४ लाख खर्च झाले असून ८७ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरीत १८ कामे प्रगतीपथावर असून त्यावर ५५ लाख खर्च होणे अपेक्षित आहे. सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवारसाठी १५ गावांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये भेंडवळ खुर्द, आसलगाव, हनवतखेड, इस्लामपूर, गारपेठ, पिंप्री खोद्री, भुरखेड, करणवाडी, खामखेड, उटी बु., उटी खुर्द, सुलज, इलोरा, सुनगाव व निंभोरा खुर्द या गावांचा समावेश होता.
सुनगाव येथील ४ शेततळे पुर्ण झाली असून १७ पैकी १६ बंधारा खोलीकरणाची कामे भारतीय जैन संघटनेच्या सहयोगातून पूर्ण झाली आहेत. करणवाडीची २३ कामे बीजेएसच्या सहकार्याने पूर्ण करणार असून आसलगावची ६ खोलीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. तीन खोलीकरणाची कामे प्रगतीवर असून १२ शेततळे पूर्ण झाली आहेत. सन २०१७-१८ मध्ये ४१ शेततळ्यांपैकी ३८ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून ३ शेततळे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याकरीता १४८ लाखाचा खर्च प्रस्तावित आहे. सध्या सर्व जेसीबी पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कार्यरत आहेत. २३ मे पासून ही स्पर्धा संपणार असून त्यानंतर भारतीय जैन संघटनेच्या ह्या सर्व जेसीबी जलयुक्त शिवारच्या कामात येणार असून त्यानंतर उर्वरीत खोलीकरणाच्या कामाला आणखी वेग येईल.
सन २०१८-१९ साठी जलयुक्त शिवार अभियानाकरीता तालुक्यातील १५ गावांची निवड करण्यात आली असून या गावातील शिवार फेºया पूर्ण झाल्या आहेत. या गावांचा आराखडा तयार झाल्यानंतर येथील शेततळे व खोलीकरण या कामांना सुरूवात होईल. तसेच या कामासाठी किर्ती खर्च अपेक्षित आहे. याचाही अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे.

 
कृषी विभागाअंतर्गत सर्वाधिक कामे
जलयुक्त शिवारची सर्वाधिक कामे कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून इतर विभागाची कामे सुध्दा छोट्या प्रमाणावर सुरू आहेत. कृषी विभागासोबतच जिल्हा परिषद सिंचन विभाग, लघु पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग व वरिष्ठ भुवैज्ञानिक विभाग यांचीही कामे अल्प प्रमाणात सुरू  आहेत. कारण कृषी विभागाशिवाय अन्य विभागाकडे असणारा निधी व कार्यक्षेत्र कमी असल्याने त्यांची जलयुक्त शिवारची कामे त्या प्रमाणात सुरू आहेत. एकुणच जलयुक्त शिवारचे महत्व शेतकरी, नागरीक, अधिकारी व कमृचारी यांना कळल्याने तालुक्यात या कामांना बºयापैकी वेग आहे. तसेच तालुक्यातील ५६ गावे पाणी फाऊंडेशन वाटर कप स्पर्धेत सहभागी असल्याने त्या गावांमध्येही पाणी अडविण्याची, साठविण्याची व मुरवण्याची मोठी कामे झाली आहे. 


जलयुक्त शिवारची कामे कृषी विभागामार्फत १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काही कामे अपूर्ण राहिल्यास तीन ३० जूनपुर्वी पुर्ण केली जातील.
- संदीप निमकर्डे, प्र.तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद


Web Title: Completion of 38 lakes; 92 water shades works has been done
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.