बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ ‘शिवशाही’ बस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:04 AM2017-12-05T01:04:37+5:302017-12-05T01:13:47+5:30

बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला  १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या  जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्‍यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे  जिल्ह्यातील  प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे

Buldhana district's 16 'Shivshahi' bus! | बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ ‘शिवशाही’ बस!

बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ ‘शिवशाही’ बस!

googlenewsNext
ठळक मुद्देसातही आगारांची आधुनिकतेकडे वाटचाल 

ब्रह्मनंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  राज्य परिवहन मार्ग महामंडळातर्फे ‘शिवशाही’ ही वातानुकूलित बससेवा  महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत; यात बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला  १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या  जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्‍यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे  जिल्ह्यातील  प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. 
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन  राज्याच्या कानाकोपर्‍यात एसटी बस धावत आहेत.  राज्य परिवहन महामंडळात कालानुरूप एसटीच्या सेवेत बदल करत आहे. नव्या काळात  आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत; तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी साध्या  बसगाड्यांबरोबरच शहर बसगाड्या, निम आराम बसगाड्या, मिनी बसगाड्या, डीलक्स  बसगाड्या, मिडी गाड्या, वातानुकूलित बसगाड्या अशा वेगवेगळ्या बसगाड्यांचा ताफा  वाढविला जात आहे. त्यानंतर आता ‘शिवशाही’ बसेस महाराष्ट्रभर नवनव्या मार्गावर सुरू  करण्यात येत आहेत. एसटी महामंडळाने शिवशाही बस दाखल करण्याची घोषणा जानेवारी  २0१६ मध्ये केली होती; मात्र आतापर्यंंत बुलडाणा जिल्ह्यातील एसटीच्या ताफ्यात एकही  शिवशाही बस दाखल झाली नव्हती. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगाव,  शेगाव, मेहकर, मलकापूर व जळगाव जामोद या सातही आगारांतर्गत सुमारे ४९0 बसफेर्‍या  सोडल्या जातात. या सर्व बसफेर्‍या साध्या असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांसाठी वातानुकूलीत  शिवशाही बसचे आतापर्यंंत स्वप्नच ठरले होते; परंतु जिल्ह्याच्या वाट्यावर १६ शिवशाही  बसगाड्या आल्या असून, वायफाय, सीसी टीव्ही व स्लीपर कोचच्या सुविधा असलेल्या या  शिवशाही बस टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे साध्या बसगाड्याने प्रवास  करणार्‍या जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच वातानुकूलीत शिवशाही बसच्या प्रवासाचा अनुभव घे ता येणार आहे. 

आज होणार पहिलं दर्शन
गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या वायफाय, सीसी टीव्ही आणि स्लीपर कोचच्या  सुविधायुक्त व वातानुकूलीत शिवशाही बसचे पहिले दर्शन ५ डिसेंबर रोजी बुलडाण्यातील  प्रवाशांना होणार आहे. बुलडाणा ते पुणे या बसला ५ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. त्यानंतर  इतर बसफेर्‍या लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दीडपट भाडेवाढ
साध्या बसगाड्यांपेक्षा शिवशाही  बसचे भाडे हे दीडपट वाढलेले असणार आहे. त्यामध्ये  बुलडाणा ते पुणे मार्गावर जाणार्‍या शिवशाही बसचे भाडे ६३0 रुपये राहणार आहे. तर शेगाव- पुणे जाणार्‍या शिवशाही बसचे भाडे ७३२ रुपये राहणार आहे; परंतु शिवशाही बसचे हे भाडे  ट्रॅव्हलपेक्षा कितीतरी पटीने कमी राहणार असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  या बसफेर्‍यांना  मिळणार आहे.
 

Web Title: Buldhana district's 16 'Shivshahi' bus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.