बुलडाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 02:45 PM2018-07-22T14:45:04+5:302018-07-22T14:47:41+5:30

रावेर बोर्डाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही कमी दराने केळीची उचल होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढील संकट आणखीनच गडद होताना दिसते.

Banana grower farmers in Buldana district in trouble | बुलडाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात

बुलडाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी संकटात

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात अनेक दशकांपासून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. रावेर बोर्डाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने केळीची उचल होत असल्याचा आजतागायचा शेतकºयांचा अनुभव. परंतु सध्या निर्धारित दरापेक्षा तब्बल ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल कमी दराने केळीची उचल होत आहे.

- अनिल गवई
खामगाव : केळीसाठी जळगाव खांदेश जिल्हा प्रसिध्द असला, तरी बुलडाणा जिल्ह्यातही अनेक शेतकरी  केळीचे उत्पादन घेतात. इतर पिकांच्या तुलनेत जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून केळीकडे जिल्ह्यातील शेतकरी पाहत असतानाच, सध्या पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे रावेर बोर्डाने निर्धारित केलेल्या दरापेक्षाही कमी दराने केळीची उचल होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांपुढील संकट आणखीनच गडद होताना दिसते.

बुलडाणा जिल्ह्यात अनेक दशकांपासून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या २० वर्षांपुर्वी सगळीकडे पाण्याची उपलब्धता असल्याने जिल्ह्यात सर्वदूर केळीच्या बागा दिसायच्या. कालांतराने निसर्गाने फिरविलेली पाठ, त्यातूनच घटलेला जलस्तर यामुळे केळी उत्पादक शेतकºयांची संख्या कमी झाली. असे असले, तरी उपलब्ध असलेल्या कमी पाण्यावरही योग्य नियोजन करून अनेक शेतकरी आजही केळीचे उत्पादन घेतात. बुलडाणा जिल्ह्यात सध्या  खासकरून खामगाव तालुक्यात वरना, कोंटी, काळेगाव, रोहणा या गावांसह अनेक गावात केळीच्या बागा आहेत. मोताळा तालुक्यात तरोडा, तारापूर, जळगाव जामोद तालुक्यात जामोद, वडगाव पाटण, जळगाव शहरालगतचा परिसर, संग्रामपूर तालुक्यात काकणवाडा, बावनबीर, सोनाळा, टुनकी आदी गावांसह अनेक गावात केळीचे उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी आहे. याप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील इतरही तालुक्यात कमी अधिक प्रमाणाात केळीचे उत्पादन घेतल्या जाते. निसर्ग वारंवार दगा देत असल्याने कोरडवाहू पीक हातचे जाते, त्यामुळे सिंचनाची सोय असलेले शेतकरी जास्त नफा मिळवून देणारे पीक म्हणून केळीकडे पाहतात. यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यां ना फायदा होतोही. यावर्षी सध्या मात्र शेतकºयांची ही आशा फोल ठरताना दिसतेय. केळी उत्पादनाच्या बाबतीत रावेर बोर्ड दर निर्धारित करते. साधारणपणे बोर्डाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने केळीची उचल होत असल्याचा आजतागायचा शेतकºयांचा अनुभव. परंतु सध्या निर्धारित दरापेक्षा तब्बल ४०० ते ५०० रूपये प्रतिक्विंटल कमी दराने केळीची उचल होत आहे. सध्या निर्धारित दर १ हजार रूपये प्रतिक्विंटल असताना, ५०० ते ६०० रूपये प्रतिक्विंटल एवढ्या कमी दराने केळीची उचल होत असल्याचे शेतकरी सांगताहेत.


अधिकमास, निपाह व्हायरसचाही परिणाम 

साधारणपणे कुठल्याही मालाचे भाव मागणी व पुरवठा यातील तफावतीनुसार ठरतात. सध्या केळीची मागणी कमी झाल्याचे अनेकांकडून सांगण्यात येते. याबाबत अधिक मासाचे गणितही जुळविल्या जात आहे. अधिक मास ज्या वर्षी येतो, त्यावर्षी आषाढी एकादशी दरवर्षीच्या मानाने उशीरा येते. आषाढीपर्यंत आंबे खाणे योग्य असल्याचा अनेकांचा समज असल्याने यावर्षी हा कालावधी १५ दिवसांनी वाढला आहे. अर्थातच यामुळे अद्याप केळीपेक्षा आंब्यांकडेच लोकांचा कल आहे. याचाही परिणाम केळीच्या मागणीवर होत आहे. यावर्षी निपाह व्हायरसबाबतही गैरसमज झाला आहे. वटवाघुळ केळीच्या झाडांवर वास्तव्य करते. त्यामुळे केळी खाल्ल्याने आरोग्य धोक्यात येईल, या भीतीनेही यावर्षी अनेकांनी केळी खाणे टाळले आहे. अर्थात आपल्याकडे हा धोका नसतानाही, केळीच्या मागणीवर परिणाम झाल्याचे केळी उत्पादक, विक्रेते सांगत आहेत.

 
एकट्या वरणा परिसरात ११५  हेक्टरवर केळीचे उत्पादन 

बुलडाणा जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमीअधिक प्रमाणात केळीचे पिक घेतल्या जाते. यातून खामगाव तालुक्यात वरणा, कोंटी, काळेगाव, रोहणा आदी गावात १५० हेक्टरवर केळीचे उत्पादन घेतल्या जाते. विशेष म्हणजे यातील ११५ हेक्टर एवढे क्षेत्र हे एकट्या वरणा गावातच आहे. 

 
मी गेल्या २० वर्षांपासून केळीचे पीक घेतो. दरवर्षी रावेर बोर्डाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा सरासरी २०० रूपये प्रतिक्विंटल  अधिक दर मिळतो. यावर्षी पहिल्यांदाच निर्धारित दरापेक्षा कमी भावाने केळीची उचल होत आहे.
घनश्याम पाटील, केळी उत्पादक शेतकरी, वरणा ता.खामगाव जि.बुलडाणा

Web Title: Banana grower farmers in Buldana district in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.