बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:53 PM2019-06-28T13:53:27+5:302019-06-28T13:54:29+5:30

२७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

279 School buses license canceled in Buldhana district! | बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द!

बुलडाणा जिल्ह्यातील २७९ स्कुल बसेसचे परवाने रद्द!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सुरक्षित प्रवासाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात दाखल झालेल्या १६९ स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली, तर २७९ बसेस फेर तपासणीसाठी न आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ज्या स्कूल बसेसचा परवाना रद्द केला आहे, त्या संबंधीत संस्थांना नोटीस पाठविण्यात आली असून त्यांच्यावरही आरटीओची नजर राहणार आहे.
नवीन शैक्षणिक सत्रामध्ये स्कुल बसकडे आरटीओने लक्ष केंद्रीत केले आहे. स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करणे आवश्यक असते. त्यासाठी स्कूल बस मालकांनी स्कूलबस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबिरात प्रपत्र अ नुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी आणि तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिल्या होत्या. जिल्ह्यात ४४८ स्कूल बसेस आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी स्कूल बसेसची तपासणी करण्याची मागणी पालकांनी केली होती. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाचा परवाना निलंबन केला जाईल, असा इशाराही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने दिला होता. त्यानुसार निर्धारित मुदतीत केवळ १६९ स्कूल बस फेरतपासणीसाठी दाखल झाल्या. त्यानुसार फेरतपासणीसाठी न आणलेल्या २७९ स्कूलबसेसचा परवाना रद्द करण्यात आला आहे. परिवहन विभागाव्दारे स्कुल बसेसची तपासणी करून स्कूल बसेसचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, अशा स्कुल बसेसव्दारे अथवा इतर बस मधून विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यात येऊ नये, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

स्कुल बसवर आरटीओची नजर
नवीन शालेय शैक्षणिक सत्र सुरु होत असुन स्कुल बस नियमावली २०११ अन्वये शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बसव्दारे करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी वाहतुक ही स्कूल बसव्दारेच व्हावी. तसेच इतर कुठल्याही वाहनांव्दारे विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही. याची जबाबदारी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापकांची आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास सदरबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, वाहन मालक व शिक्षण विभाग यांची राहील, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दुतोंडे यांनी दिले आहे.
परवाना रद्द झालेले वाहन रस्त्यावर आढळल्यास कारवाई
४फेरतपासणी न झालेल्या २७९ बसेसचा परवाना निलंबीत झाल्याच्या नोटसी नोटीस संबंधित स्कूलबसचे मालक आणि संस्थांना पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, यानंतरही फेर तपासणी न केलेले वाहन रस्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
 

स्कूल बसेसची फेरतपासणी करण्यासाठी निर्धारित मुदतीत आरटीओ कार्यालयात दाखल न झालेल्या स्कूल बसेसचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली आहे. जिल्ह्यातील २७८ स्कूल बसेसचा परवाना रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात आल्या आहेत. परवाना निलंबीत झालेल्या बसेस रस्त्यावर वाहतूक करताना आढळल्या त्या जप्त करून कारवई केल्या जाईल.
- जयश्री दुतोंडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलडाणा.

Web Title: 279 School buses license canceled in Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.