गझलची गोमंतकीय धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:45 AM2018-05-13T06:45:10+5:302018-05-13T06:45:10+5:30

Ghazal Gomantic axle | गझलची गोमंतकीय धुरा

गझलची गोमंतकीय धुरा

अरुण म्हात्रे

गोव्याचा असा तरतरीत तरुण चेहरा जो कविता, गाणी, नाट्यसंगीत, सामाजिक कार्य, छंदवृत्ताची शिबिरे, कवितेच्या कार्यशाळा आणि अनेक सर्वसामान्यांच्या लोकहिताच्या उपक्रमांमध्ये व्यस्त असतो. या अर्थाने सामाजिक कार्यकर्ताच आहे, मात्र गझल हे त्याच्या अंतरंगाचे मर्म होते; तर कधी त्याच्या मनातल्या सामाजिक उद्रेकाला वाट देणारे विरेचन होते... साहित्य, नाट्य आणि संगीत या तिन्ही विद्यांमध्ये एकाचवेळी धडपडणाऱ्या या तरुणाचं नाव आहे, दत्तप्रसाद दत्तात्रेय जोग.

गझलच्या बाह्य आकर्षणापेक्षा (प्रसिद्धी, चमकदारपणा, ठोस विचारशैली आणि कशावर तरी कडी केल्याचे समाधान) गझलरचनेच्या गूढ आंतरिक चुंबकत्वाचे काहीतरी गारूड असावे, जे अलीकडच्या कैक हुशार, प्रतिभावान आणि विजिगिषू वृत्तीच्या तरुणांवर पडलेले मी पाहतो आहे. त्यातला एक म्हणजे दत्तप्रसाद दत्तात्रेय जोग.
गझल परिवारात तो ‘प्रसाद’ जोग या नावाने प्रसिद्ध आहे. गझलकारांच्या तरुण जत्थ्यात तो लाडका आहे, याचे कारण त्याचा सहकार्याचा आणि काहीतरी करत राहण्याचा निर्मम स्वभाव. त्याचा परिचयच भारी आहे.
शिक्षण : कृषीविज्ञान शाखा पदवीधर. नोकरी : कृषी संचालनालय गोवा सरकार. कवितासंग्रह : अंदाज. नाट्यगीतसंग्रह : नाट्यमधुरा. बा.भ. बोरकर स्मृती पुरस्कार २०१७ गोवा राज्यस्तरीय यशवंत पुरस्कार २०१७. गोमंतकात मराठी कवितेचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी काही सांगीतिक कार्यक्रमांची निर्मिती त्यासाठी गीतलेखन. नाट्यगीते, भावगीते व गझल अशा एकूण ७० रचना संगीतबद्ध...
आता इतकी प्रतिभा, परिचय असलेल्या माणसाने गझलध्यासाने गोव्याच्या सीमा ओलांडून अवघा महाराष्ट्र पालथा घालण्याचे स्वप्न पाहावे, हे कसले द्योतक? मराठी गझलची गोमंतक प्रांताची ध्वजा सतत फडकावत ठेवण्याचे व्रत प्रसादने घेतले आहे की काय, असे वाटावे, अशी ही परिस्थिती आहे. प्रसादची ही गझल पाहा...
हे निमित्त की नालायक शेजार मिळाला आहे
हा देश खिळखिळा माझा आतूनच झाला आहे...
वाजते मनाच्या दारी ती परकी चाहुल नाही
माझाच गुन्हा कुठलासा भेटाया आला आहे...
जाणीव पेरण्यासाठी मी मने नांगरा म्हणतो
रुजते की सडते नंतर... अंदाज कुणाला आहे?
तू मला भेटल्यानंतर जा दृष्ट तुझी काढून घे
माझाही माझ्यावरचा विश्वास उडाला आहे...
मी इथे आयते मोती मिळवाया आलो नाही
बुडलो तर पर्वा नाही भिडणार तळाला आहे
ना कधी मुहुर्ताला मी विनवणी कराया जातो
तो हात धरून इच्छेचा येईन म्हणाला आहे...
प्रसादची गझल वाचताना मराठी गझलने घेतलेले हे गोमंतकीय वळण वाटते... गोव्यात असलेल्या राधा भावे काय किंवा प्रसाद जोग काय यांच्या लिखाणातली तरलता आणि कोवळेपण खास गोमंतकीय वाटते. बोरकरांचे सौंदर्यासक्त लालित्य याचा एक अदृश्य प्रभाव गोव्यातील कवी टाळू शकत नाही...
गझलच्या कडक समीक्षकांना हे कोवळेपण कदाचित खटकतही असेल, पण ‘हिरवळ आणि पाणी, तेथे सुचती मजला गाणी’ म्हणणाºया बाकीबाब यांच्या गोव्यातल्या कवींना या लालित्यापासून आपण दूर करू शकत नाही. आता ही गझल पाहा...
चकवा वळणावळणांवर
तुझ्यासारखे तुझे शहर...
पडली बहुधा तिची नजर
निवडुंगावर दिसे बहर...
गुदमरणाºया आत्म्यावर
आठवणींचे लाखो थर...
फक्त एकदा नक्की कर...
किती आणखी पिऊ जहर?
तुला यायला जमेल तर...
चल स्वप्नांची करू सफर...
गझलमध्ये खूपदा काही नवी शब्दवाणी अवतरते, तेव्हा जुन्या मराठीप्रेमी मंडळींना बावचळून जायला होते; पण काळ काही कोणासाठी थांबत नाही. प्रसादच्या गझलेमधले प्रेमप्रतारणेचे शेर मला खूप भावतात. एखाद्या भावकवीला सुचावे, असे त्याचे वर्मी घाव असतात.
अद्याप तुझे आयुष्या हे खेळ समजलो नाही,
शत्रूंना कळलो मी पण मित्रांना कळलो नाही...
ती भेट तिची निशिगंधी नि:श्वास तिचे ते अत्तर
भेटून कुणाला केव्हा इतका दरवळलो नाही...
सरणाशी केली सलगी ते आठव होता वैरी
पण कोण करंटे आम्ही तेथेही जळलो नाही
नतमस्तक व्हावे मी त्या पाऊलखुणाही नव्हत्या
(त्या मळल्या वाटांवरती यासाठी वळलो नाही)
ही चूक तुझी ना माझी दैवाचे चुकले थोडे
विस्कटलो जितके आपण...
तितके उलगडलो नाही!
त्या दूर नभांच्या गावी हे जाणवते का तुजला?
मी अपुल्या दोघांमधले मी काहीच विसरलो नाही
असे जिव्हारी शेर लिहिण्यात प्रसाद माहीर आहे. कदाचित, म्हणूनच तो तरुणांचा लाडका गझलकार आहे.. पण, कधीकधी सामाजिकतेवर प्रहार करणारे रोखठोक शेरही प्रसाद लिहितो आणि त्याची सामाजिक जाणीव दृगोचर होते...
ना श्वासांवरती मित्रा ना जगण्यावरती मित्रा
तू जिवंत असणे ठरते धडपडण्यावरती मित्रा...
रस्त्यात अर्धमेलासा ओलांडून गेलो माणूस
मी निवांत लिहिले नंतर तडफडण्यावरती मित्रा...
धनिकांना करता येते स्वप्नांची मोठी यादी
गरिबांचे ठरते सगळे परवडण्यावरती मित्रा...
गझलच्या पॉप्युलर झंझावातात मैफल मारून नेणारे गझलकार अर्थातच लोकप्रिय असतात; मात्र प्रसादच्या सादरीकरणात त्याच्या अभ्यासू निवेदनासोबत त्याचे गझलचे अंत:स्वरूप जाणून ती सादर करण्याचे कसब दिसते, ते फार कमी गझलकारांकडे आहे.
दे मिठी अन् संशयांना पांगळे कर
प्रेम जर करतोस तू तर आंधळे कर...
वापरून सोडून देणे पाठ आहे
(तू जरा याहून काही वेगळे कर!!)
मन तुझे खाणार नाही बिलकुल तुला
जे गुन्हे करतोस ते तू सोवळे कर,
माप छातीचे तुझ्या जाणून घे तू
मग हवी तर फुंकरीतून वादळे कर,
जे जवळ नाहीत त्यांना शापून घे तू
अन् जवळ आले पुन्हा की सोहळे कर,
बघ नवी रुजली पिढीही सावजांची
तू नवे निर्माण आता सापळे कर,
अशीच एक संवादाची गझल...
पाय थोडासा उचल तू चालल्यागत
थांबल्यावर सर्व दिसते थांबल्यागत!
तू नको विक्रीस काढू अंतरात्मा
तू इथे उरशील मग केवळ मढ्यागत..
हिमतीने उंच ही होतात झाडे
कोण रानाची कधी करते मशागत?
झेपला ना मूळ मुद्दा भाषणाचा
बोलला सगळे विषय उष्टावल्यागत,
काय नात्याच्या प्रवाहाला अडकले?
वाटते आहे कशाला साचल्यागत?
चेहरा तरळून गेला झोपताना
वागल्या मग पापण्या भांबावल्यागत!!
आणि अशा संवादाच्या विद्यार्थी गझला हीच प्रसादची ओळख आहे... आता ही गझल पाहा..
वाटले जर तुला रागव मला
योग्य वेळीच पण थांबव मला
दिवस वाया नको माझा तुझा
(फक्त सांजेस तू आठव मला)
भटकलो उत्तरे शोधायला
भेटली सारवासारव मला
शांततेवर नको भाषण तुझे
शांततेचे हवे पदरव मला
दु:ख नांदावया जागा हवी
त्याप्रमाणे जरा वाढव मला
भरवसा पुन्हा मी ठेवेनही
एक माणूस तसा दाखव मला....
प्रत्येक गझलेत एक तडाखेबाज आणि पुन:पुन्हा आठवावस असा शेर असणे ही प्रसादची मराठी गझलला मोठी उपलब्धी आहे, असे मी मानतो.. प्रसाद नाट्यसंगीताचा अभ्यासक आहे. गीतरामायणासारखे काव्य हिंदीत भाषांतरित करणारा एक वेगळा धार्मिक प्रसाद जोग आहे आणि रसिकांना पुन:पुन्हा आपल्या शेरांनी खेचून घेणारा गझलकार दत्तप्रसाद जोगही आहे...
दुनियेशी मी घेईन टक्कर तू असशील ना?
मी जर माझे हरलो संगर तू असशील ना!

असंख्य वाटा तशात अंधुक दिसते आहे
दिशा विसरलो जर मी क्षणभर तू असशील ना?

कधीतरी मी या दुनियेची अडगळ होईन
मला चेहरा नसेल सुंदर तू असशील ना?

घरट्यासाठी तुला ठेवतो दूर सदा मी
घरट्याने टाकले मला तर तू असशील ना?

सुपीक शेतामध्ये मी रमणारा नाही
खडकावरती धरेन नांगर तू असशील ना?

तुला नेहमी दिसेन याची खात्री नाही
तुझ्या भोवती करेन वावर तू असशील ना!!
या अशा आर्त आर्जवांनी प्रसादच्या गझला उजळ झाल्या आहेत. महाराष्ट्रापासून आणि मुख्य मराठी प्रवाहापासून वेगळे राहिल्याचे शल्य जणू प्रसादची गझल गुणगुणते आहे...
येत्या काळात मराठी गझलपर्वात काहीतरी धडाकेबाज देण्याची धमक दत्तप्रसाद जोगमध्ये आहे. त्याला त्यासाठी नवीन ऊर्जा मिळो, अशी महाराष्ट्र-गोवा आंतरिक अतूट नात्याकडे प्रार्थना...

arunakshar@rediffmai.com

Web Title: Ghazal Gomantic axle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.