वाहतुकीची पाठशाळा, आपले रस्ते, आपले नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 10:28 AM2020-01-17T10:28:58+5:302020-01-17T10:30:20+5:30

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे.

Traffic school, your roads, your rules | वाहतुकीची पाठशाळा, आपले रस्ते, आपले नियम

वाहतुकीची पाठशाळा, आपले रस्ते, आपले नियम

googlenewsNext
ठळक मुद्देवाहतुकीची पाठशाळाआपले रस्ते, आपले नियम

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे.

रस्ते अपघातांच्या कारणांमध्ये वेगाने वाहन चालवणे, बेदरकारपणे वाहन हाकने, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा एक ना अनेक कारणांचा समावेश आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन हे महत्वाचे आहे. याच वाहतूक नियमांविषयीची माहिती तुमच्या पर्यंत पोहचवणे हा या लेखाचा उद्देश आहे.

वाहन चालवताना रस्त्याचा वापर आपल्यासोबतच इतर अनेक जण करत असतात याचे भान ठेवणे महत्वाचे आहे. आपल्यामुळे रस्त्यावरील इतरांना कोणताही धोका होणार नाही याची खबरदारी घेणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. हे भान आले की वाहतुक नियमांचे पालन आपोआप होत जाते.

पादचाऱ्यांसाठीच्या सूचना
 पादचाऱ्यांनी फुटपाथचा वापर करावा, जेथे फुटपाथ नसेल त्याठिकाणी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे म्हणजे समोरून येणारे वाहन तुम्हाला दिसेल. देशात रस्ते वाहतूक ही रस्त्याच्या डाव्या बाजून होते. पण, रस्त्यावर चालताना मात्र सुरक्षेच्या दृष्टीने उजव्या बाजूने चालावे, जेथे फुटपाथ असेल तेथे त्याचा वापर आवर्जून करावा, आपण चालत असताना वाहतूकीस कोणताही अडथळा होणार नाही अशा पद्धतीने चालावे, रस्ता ओलांडताना कोठूनही न ओलांडता झेब्राक्रॉसिंगचा वापर करावा, प्रथम उजवी कडे व नंतर डावीकडे पाहून कोणतेही वाहन येत नाही याची खात्री करून मगच रस्ता ओलांडावा, रस्ता ओलांडत असताना अचानक वाहन आल्यास गडबडून न जाता जागेवरच थांबा, त्यामुळे वाहन चालकास वेग कमी करून कोणत्याबाजून जाण्यास वाट आहे हे लक्षात येईल.

रस्ता ओलांडत असताना दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांच्या नजरेत सहज येईल अशा ठिकाणीच रस्ता ओलांडावा, फुटपाथ व रस्त्याच्या मधे लावलेल्या रेलिंग्जवरून उडीमारून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न कधीही करू नये, थांबलेल्या वाहनाच्या पुढुन व मागून कधीही रस्ता ओलांडू नये, लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, दिव्यांग यांना रस्ता ओलांडताना मदत करा. हे साधे सोपे नियम पाळल्यास आपले जीवन सुरक्षित राहिल.

सायकल स्वारांनी पाळावयाचे नियम -

सायकल चालवताना नेहमी डाव्या बाजूने चालवा, वळण्यापूर्वी योग्य इशारा करा, दोन किंवा अधिक सायकली समांतर चालवू नये, सायकल थांबवताना दोन्ही ब्रेकचा वापर एकदम करावा, वाहतुकीचे नियम सायकलस्वारांनीही पाळणे गरजेचे आहे, कोणत्याही मालवाहू वाहनाच्या साखळीस किंवा रिक्षाला धरून सायकल चालवू नका, त्यामुळे तुमच्या जीवास धोका होऊ शकतो.

दुचाकी चालवणताना घ्यावयाची काळजी

 दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेटचा वापर करा, हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे. तुमच्या सुरक्षेसाठी हेल्मेट हे कायम आयएसआय मार्क असलेलेच घ्या. असे हेल्मेट बजबूत आणि सुरक्षेच्या सर्व चाचण्यांमध्ये पास झालेले असते. लक्षात असू द्या हेल्मेटची सक्ती ही दंड आकारण्यासाठी नसून तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. हेल्मेट हे हलक्या व चमकदार रंगाचे असावे व त्याच्या मागील बाजूस रेडियम पट्टी असावे, दर चार ते पाच वर्षांनी नवीन हेल्मेट घ्यावे कारण हेल्मेटचे आयुष्य चार ते पाच वर्ष असते.

त्यानंतर त्याचा कठीणपणा कमी होत जातो. हेल्मेट मुळे अपघातात डोक्यास इजा होत नाही. मेंदूपर्यंत इजा पोहचण्याची शक्यता कमीत कमी असते. तसेच धडक बसल्यानंतर प्राणहानी होण्याची टळण्याची शक्यता शतपटीने वाढते.

चार चाकी वाहन चालवताना

नेहमी सीट बेल्टचा वापर करावा, वाहनाचा वेग मर्यादीत ठेवावा,गाडी सोडून जाताना इंजिन बंद करा व हॅन्ड ब्रेक लावा, गाडीची नियमीत देखभाल दुरुस्ती करा, सिटबेल्टचा वापर केल्यामुळे धडक झाल्यास डोके स्टेअरिंगवर आदळत नाही, बेल्टमुळे आपणवाहनात स्थिर राहतो व वाहनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. सिटबेल्टमुळे अपघातात वाचण्याची शक्यता वाढते.

मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे तुमचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबीत होऊ शकतो. तसेच न्यायालयीन कार्यवाहीही होऊ शकते. घाटात वाहन चालवत असताना खालच्या गिअरमध्ये चालवावे, घाट चढणाऱ्या वाहनास प्राधान्य द्यावे, पावसाळ्यामध्ये वाहनाच्या टायर्स सुस्थितीत असल्याची खात्री करा, वायपर चालू असल्याची खात्री करा, ब्रेक व्यवस्थित असल्याचे तपासा, पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नसेल तर वाहन पाण्यातून नेऊ नका.

असे टाळता येतील अपघात

दुचाकी चालवताना पुढील वाहनांपासून सुरक्षीत अंतर ठेवावे व हेच अंतर रात्री, धुक्यात व पावसाळ्यात हे अंतर जास्त असावे, वाहनाचा वेग नियंत्रीत ठेवावा, जास्त वेग असल्यास वाहन थांबवण्यास जास्त वेळ लागतो, ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूने करावा, पुढुन तसेच मागून येणारे वाहन व्यवस्थित दिसत असेल अशाच ठिकाणी ओव्हरटेक करावा, चौकात, वळणावर, पुढील रस्ता दिसत नसेल तेंव्हा ओव्हरटेक करू नये, वाहन थांबवताना ते सरळ रेषेतच असावे व दोन्ही ब्रेक्सचा वापर करून वाहन थांबवावे तसेच वाहन थांबवण्याचा योग्य तो इशारा द्यावा, वळणावर ब्रेक्सचा वापर टाळावा, रात्री वाहन चालवताना महामार्गावर लांबचा प्रकाश झोत (अप्पर) वापरावा, ओव्हरटेक करताना, वाहन वळवताना व वाहनाच्या मागे असताना जवळचा प्रकाश झोत (डिप्पर ) वापरावा, स्त्रियांनी दुचाकीवर बसताना ओढणीचा गाठ मारावी, साडीचा पदर निट खोचावा, ज्यायोगे तो गाडीच्या चाकात अडकून अपघात होणार नाही. लेनची शिस्त पाळा, पाणी, वाळू, तेल सांडलेल्या रस्त्यावर वाहन सावकाश हाका या सोप्या उपायांमधून आपण अपघातांचे प्रमाण कमी करू शकतो.

लक्षात अशू द्या रस्ते वाहतुकीचे नियम हे तुमच्या आमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. हे नियम पाळून गाडी चालवणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आज वाढते नागरीकरण, जीवनाचा वाढलेला वेग यामुळे प्रत्येकाकडे एक तरी वाहन असतेच. वाहन हे आपल्या सोयी साठी असते. ते चालवताना काळजी घेणे ही जबाबदारी आहे. आपले घरी कोणीतरी वाट पाहत आहे हे विसरू नका.
 

  • हेमंतकुमार चव्हाण

माहिती सहाय्यक, जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग

Web Title: Traffic school, your roads, your rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.