साध्या कपात कार्यकर्त्यांसोबत बिस्कीट खाणारा नेता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:46 AM2019-01-30T02:46:22+5:302019-01-30T02:46:42+5:30

देशातील कष्टकरी वर्गाच्या प्रगतीसाठी झटणारा, कामगार संघटनांचे नेतृत्व करीत असताना त्यांच्याबाबत आंतरिक चिंता असणारा, कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेऊन काम करणारा नेता अशीच जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख सांगता येईल.

Biscuit leader with simple reduction workers | साध्या कपात कार्यकर्त्यांसोबत बिस्कीट खाणारा नेता

साध्या कपात कार्यकर्त्यांसोबत बिस्कीट खाणारा नेता

googlenewsNext

- ललित रुणवाल

या देशातील कष्टकरी वर्गाच्या प्रगतीसाठी झटणारा, कामगार संघटनांचे नेतृत्व करीत असताना त्यांच्याबाबत आंतरिक चिंता असणारा, कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेऊन काम करणारा नेता अशीच जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख सांगता येईल. अनेक आंदोलने आणि बैठकांच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क आलेले ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते ललित रुणवाल यांनी आपल्या आठवणी ‘लोकमत’ सोबत जागवल्या.

रुणवाल म्हणाले, मी जनता पक्षाची स्थापना होण्यापूर्वी प्रजा समाजवादी पक्षामध्ये (पीएसपी) काम करीत होतो. शिरूरचे तत्कालीन आमदार शामकांत मोरे हे आमचे नेते होते. त्यांच्यासोबत मी नेहमी मुंबईला जात असे. त्या वेळी जॉर्जसोबत माझी भेट व्हायची. आमचा स्नेह बराच वाढला होता. त्यांनी मला अपना बँक, अपना बाजार आदी ठिकाणी स्वत: फिरवून दाखविली होती. त्याची सविस्तर माहिती दिली होती. आमचे पक्ष वेगळे असले तरी विचार एक होते. कारण त्या काळात काँग्रेसच्या शक्तीला टक्कर देण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नव्हता.

नरसिंहराव पंतप्रधान असताना मुंबईला ‘डब्ल्यूटीओ’च्या कराराविरुद्ध आम्ही आंदोलनासाठी जमलो होतो. त्या वेळी मृणालताई गोरे, मधू दंडवते, व्ही. पी. सिंह, जॉर्ज आणि मी एकाच गाडीमधून गेलो होतो. या करारामुळे देशातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील, असे जॉर्जचे म्हणणे होते. आज देशात घडत असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे मूळ डब्ल्यूटीओमध्ये दडलेले आहे.

काँग्रेसविरोध हा जॉर्जच्या कामाचा मूलभूत गाभा होता. कॉंग्रेसने देशाचे नुकसान केले असे ते नेहमी सांगायचे. कॉंग्रेसने लादलेल्या आणीबाणीच्या काळात वेषांतर करुन कार्यकर्त्यांना भेटणारा, कपड्यांना कधीही इस्त्री न करणारा, १९६0 सालच्या फियाट गाडीमध्ये फिरणारा, जनता पक्ष टिकविण्यासाठी धडपडणारा आणि महात्मा गांधींच्या ‘समाजवादी संरक्षण आणि समाजवादी अर्थकारण’ या संकल्पनेचा विचार घेऊन जगणारा जॉर्ज मी जवळून अनुभवल्याचे रुणवाल यांनी सांगितले. जॉर्जसोबत पुण्यातील कार्यकर्ते विठ्ठल तुपे, ज्येष्ठ नेते भाई वैद्य, राम कदम, नाथाभाऊ कोद्रे, नाथाभाऊ वडदे अशा शेकडो समाजवादी कार्यकर्त्यांचा स्नेह होता.

जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर जॉर्ज पुण्यात आले होते. चाकण, सणसवाडी आदी पट्ट्यांमध्ये उद्योग आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझी व त्यांची भेट झाली. मी त्यांना घरी चहाला येण्याचा आग्रह केला. तेव्हा ते घरी आले. मी साधा जिल्हा सरचिटणीस होतो आणि राज्याच्या कार्यकारिणीवर होतो. मात्र, जॉर्ज आले. माझे त्या वेळचे नेते व्ही. पी. सिंह यांच्यामुळे जॉर्ज सोबतचा स्नेह अधिक वृदिंगत झाला. त्याचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले.

Web Title: Biscuit leader with simple reduction workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.