वाचन संस्कृतीचा जागर करण्याची गरज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:18 PM2017-10-15T13:18:43+5:302017-10-15T13:18:58+5:30

प्रासंगिक : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन ‘वाचक प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात निश्चितच खास औचित्य आहे. कलाम हे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेतच. विशेषकरून मिसाइल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान सर्वपरिचित आहे; पण आयुष्याच्या संध्याकाळी ‘डीआरडीओ’मधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी लाखो तरुणांशी, खासकरून विद्यार्थी वर्गाशी प्रत्यक्ष सुसंवाद साधून त्यांना प्रेरित करण्याचे, ध्येयवादी, राष्ट्रवादी चेतना जागविण्याचे जे काम केले ते अधिक महत्त्वाचे. आजच्या युवा पिढीत एक प्रकारचे नैराश्य, मरगळ, भरकटलेपण दिसून येते. त्यांच्या पुढे अनिश्चिततेच्या वातावरणाने भारलेले, धूसर असे भविष्य दिसते. अशा वेळी गरज असते ती प्रेरणेची, उचित दिशा दिग्दर्शनाची, आतला ऊर्जेचा वन्ही चेतविण्याची. कलामांनी त्याच कार्याला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्राधान्य दिले.

Need to wake up reading culture ... | वाचन संस्कृतीचा जागर करण्याची गरज...

वाचन संस्कृतीचा जागर करण्याची गरज...

Next

- डॉ. विजय पांढरीपांडे

गेली अनेक वर्षे मी अक्षरश: हजारो तरुणांचे वेगवेगळ्या पदांसाठी इंटरव्ह्यूज् घेतले आहेत. त्यात प्रामुख्याने जाणवले ते हे की या पिढीचे वाचन जवळपास शून्य आहे. आपल्या अभ्यासाच्या विषयाची उत्तम टेक्स्ट बुक्स तर ते वाचतदेखील, अभ्यासत नाहीतच; पण त्यांचे अवांतर वाचनदेखील नगण्य आहे. आपल्या मातृभाषेतील इतर भाषांतील काव्य, नाट्य, कथा, कादबं-या, चरित्र, आत्मचरित्र अशा कोणत्याही क्षेत्रातील त्यांचे वाचन अक्षरश: केविलवाणे आहे. अनेक विद्यार्थी रोजचे वर्तमानपत्रदेखील वाचत नाहीत. 

अनेक विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक वर्षांत एकही पुस्तक वाचलेले नाही, अशी कबुली दिली. या पार्श्वभूमीवर वाचन संस्कृती जागविण्यासाठी गरज महत्त्वाची ठरते. कलामांनी निवृत्त झाल्यानंतर आपल्या विविध अनुभवांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली. देशात, विदेशात भरपूर प्रवास केला. त्यातून त्यांनी जे अनुभवले, त्यांना जे जाणवले, त्याआधारे भविष्याची गरज ओळखून त्यांनी रोडमॅप तयार केला, असा रोडमॅप प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. स्वत:साठी, कुटुंबासाठी, गावासाठी, शहरासाठी, आपल्या राज्यासाठी अन् पर्यायाने आपल्या देशासाठी.

अवतीभवती अनेक समस्या, अडचणी आहेत अन् त्या असणारच; पण त्या समस्यांची उत्तरे आपली आपल्यालाच शोधायची आहेत. ती उत्तरे आकाशातून पडणारी नाहीत. आपले उद्दिष्ट आपणाच ठरवायचे अन् त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्गदेखील आपला आपणच शोधायचा. वाचन संस्कृती जोपासल्याने हे शक्य आहे. इंग्लंडमध्ये वेल्स प्रांतात ‘हे आॅन वे’ असे ‘पुस्तकांचे गाव’ आहे. आपल्या महाराष्ट्रातही स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणा-या महाबळेश्वर या पर्यटनस्थळी शेजारच्या भिल्लारी या गावी हे पुस्तकांचे गाव नुकतेच वसले आहे. सरकारच्या या प्रकल्पाची स्तुती करायला हवी. नव्या योजनेत अडचणी येणारच; पण त्यातून मार्गदेखील निघतातच. 

या प्रकल्पासाठी भिल्लारी या गावातील प्रत्येकाने संपूर्ण सहकार्य दिले. अशा प्रकल्पासाठी उत्साही, उत्सवी वातावरण निर्मिती महत्त्वाची. लीडरशिपदेखील तितकीच महत्त्वाची. अशा पुस्तकाच्या गावांची संख्या वाढणे गरजेचे आहे. अनेक गावात, शहरात उत्तमोत्तम ग्रंथालये आहेत. त्यात हजारो, लाखो उत्तमोत्तम पुस्तके आहेत; पण वाचणारेच नाहीत. याच वर्षी हैदराबादच्या १२५ वर्षे जुनी परंपरा लाभलेल्या जुन्या शहरातील मराठी ग्रंथालयाला भेट देण्याचा योग आला. अनेक दुर्मिळ पुस्तके तिथे अक्षरश: धूळ खात पडून आहेत. वाचणारेच नाहीत. अशीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात इतरत्र असणार. विद्यापीठातील अमूल्य ग्रंथांचा, नियतकालिकांचा, संशोधन प्रबंधाचा किती विद्यार्थी किती उपयोग करतात. हादेखील संशोधनाचाच विषय ठरू शकतो.

आजच्या तरुण पिढीला मराठी लेखक, कवींची नावेदेखील माहिती नसणार. मग पुस्तकांची नावे दूरच राहिली. ज्याने कथा, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कांदबरी असे काहीही वाचले नाही त्या व्यक्तीला माणूस कसे म्हणायचे, हा मला प्रश्न पडतो. परदेशात लेखक, कवी, नाटककार यांच्याकडे सन्मानाने बघितले जाते. त्यादृष्टीने भिल्लारीच्या पुस्तकांच्या गावाची चळवळ इतरत्र पसरायला हवी. खेळण्यांऐवजी पुस्तके भेट द्यायला हवीत. हार, तुरे, शालीऐवजी मान्यवरांना पुस्तकांची भेट द्यायला हवी सत्कारावेळी.
जाता जाता त्याच संदर्भातील एक कविता-

स्मरणात वाचलेल्या पुस्तकांचे नाव आहे
माझ्या घरीच माझे पुस्तकांचे गाव आहे
वाचुनी अन् वेचुनी जाहलो श्रीमंत मी
त्यामुळे जन मानसी आज मजला भाव आहे
वादळे आली तरीही शब्द होते सोबती
अक्षरांच्या ह्या शिडांनी शांत माझी नाव आहे
कोणता रस्ता पुढे - प्रश्न हा पडला तसे
पुस्तके कानी म्हणाली- शोध जवळी ठाव आहे
 संकटी खचता जीवाला- वाचनाने धैर्य आले
वाचलेल्या लेखकाचे हृदयी माझ्या गाव आहे

(लेखक माजी कुलगुरू आहेत.)

Web Title: Need to wake up reading culture ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.