विमानांच्या नकाशावर सिंधुदुर्ग -- जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:42 AM2018-09-16T00:42:52+5:302018-09-16T00:45:56+5:30

मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येईल. हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. मात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात...

Sindhudurg - Jagar on the plane map | विमानांच्या नकाशावर सिंधुदुर्ग -- जागर

विमानांच्या नकाशावर सिंधुदुर्ग -- जागर

Next
ठळक मुद्देमात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात...कदाचित हा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनही नावारूपास येऊ शकेल. सी-वर्ल्डचा प्रकल्प रेंगाळला. इतर कोणत्याही आधुनिक सोयींची केंद्रे नाहीत.

- वसंत भोसले

मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येईल. हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. मात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात...

महाराष्ट्राच्या इतिहासात आणखीन एका विमानतळाची गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला भर पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले शहराच्या बाजूला असलेल्या चिपी आणि परुळे गावच्या सीमेवर हे विमानतळ करण्यात आले आहे. हे महाराष्ट्राचे तिसावे विमानतळ आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील दुसरा विमानतळ आहे. कदाचित हा विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणूनही नावारूपास येऊ शकेल. मात्र, सिंधुदुर्ग हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करण्याचा मानस होता. त्याचा विकास झाल्याशिवाय या विमानतळाचा विकास तरी कसा होणार, असा प्रश्न आहे.

या जिल्ह्यात पर्यटन हा एकमेव व्यवसाय विकासाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. त्यासाठीच्या प्रयत्नांचे काय झाले? हा खरा सवाल आहे. विमानतळ उभारणे हा एक घटक होऊ शकतो. मात्र, पर्यटकांसाठी पर्यटन क्षेत्राचा विकास करताच वीस वर्षांच्या (अथक) प्रयत्नांने का होईना, हा विमानतळ पूर्ण झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात कोकणचा तसा दबदबा कमी. मात्र, मुंबईही त्यांची कर्मभूमी असल्याने कोकणातील राजकीय नेत्यांना बळ मिळते. त्यामुळेच कोकणाने आजवर तीन मुख्यमंत्री दिले. (अ. र. अंतुले, मनोहर जोशी आणि नारायण राणे) याशिवाय अनेक केंद्रीय मंत्री होऊन गेले.

त्यापैकी चिंतामणराव देशमुख, प्रा. मधुकर दंडवते, अ. र. अंतुले, जनरल जगन्नाथराव भोसले, सुरेश प्रभू, अनंत गीते, आदींचा समावेश आहे. कोकणाचा माणूस नेहमीच मुंबईच्या दिशेने पाहत असतो. मुंबईची सर्व अर्थाने त्यांना संजीवनी लाभली आहे. पूर्वीच्याकाळी गिरणी कामगारांपासून ते नगरसेवक, सभापती, महापौर, आमदार, खासदारांपर्यंत अनेकांनी मुंबईत जाऊन नशीब अजमावले. त्यांचे भले झालेच, शिवाय कोकणच्या विकासातही त्यांचे प्रतिबिंब उमटले आहे.

आजदेखील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांतून दीड खासदार आणि केवळ आठ आमदार निवडून जात असले तरी राज्याच्या विधिमंडळात जवळपास दोन डझनांवर सदस्य हे कोकणाची पार्श्वभूमी असलेले आहेत. दीड खासदार असले तरी केंद्रीय मंत्रिमंडळातील दोन महत्त्वपूर्ण कॅबिनेट मंत्रिपदे कोकणाकडे आहेत. (अनंत गीते आणि सुरेश प्रभू.)

अशा पार्श्वभूमीवर वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले ते शिरोडा मार्गावरील चिपी, तसेच परुळे गावच्या सीमेवर २७५ एकरांत हे विमानतळ उभे राहिले आहे. याची घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला होता, तेव्हा करण्यात आली होती. एकोणीस वर्षांनी हा विमानतळ पूर्णत्वाकडे गेला आहे. चार दिवसांपूर्वी (१२ सप्टेंबर रोजी) पहिले विमान उतरले आणि सिंधुदुर्ग जिल्हा देशाच्या, तसेच महाराष्ट्राच्या विमान वाहतुकीच्या नकाशावर आला.

महाराष्ट्रात सध्या एकूण ३0 विमानतळे आहेत. नवी मुंबई आणि पुण्याजवळचे पुरंदर ही दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे नियोजित आहेत. सिंधदुर्गच्या विमानतळाच्यानंतर म्हणजे २००७ मध्ये नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला होता. गतवर्षी त्याचे उद्घाटनही झाले. सध्या त्या विमानतळावरून दररोजची वाहतूकही सुरू झाली आहे. लवकरच हा विमानतळ बंगलोर, चेन्नई आणि नवी दिल्लीशी जोडला जाणार आहे. साईबाबांच्या आशीर्वादाचे पाठबळ आहे. ते एक सर्वांत मोठे आणि प्रचंड ये-जा असलेले विमानतळ ठरणार आहे. याचे कारण प्रवाशांची वर्दळ आहे.

महाराष्ट्राने प्रवाशांची गरज, वाढते शहरीकरण, औद्योगिकरण आणि विकासाची दिशा, आदींचा कोणताही विचार न करता केवळ राजकीय नेत्यांच्या हट्टापायी, प्रतिष्ठेसाठी अनेक ठिकाणी विमानतळ बांधली आहेत. त्यावर विमाने येतही नाहीत आणि लोकांची गरजही नाही. महाराष्ट्रातील तीसपैकी केवळ मुंबई, पुणे आणि नागपूर या विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक होते. या तिन्ही शिवाय नांदेड, औरंगाबाद आणि शिर्डी येथेच रात्री विमान उतरण्याची सोय आहे. (नाईट लँडिंग). उर्वरित दोन डझन विमानतळांवर रात्री विमान उतरू शकत नाही किंवा उड्डाणही घेऊ शकत नाही. ही विमानतळे म्हणजे केवळ एक धावपट्ट्या असलेली मैदाने झाली आहेत. त्यात कोल्हापूरच्या विमानतळाचा समावेश आहे.

या विमानतळाचा इतिहास तर १९३९ पासूनचा आहे. महाराष्ट्रात अनेक विमानतळे असताना हा सिंधुदुर्गचा विमानतळ होतो आहे. यादी वाढते आहे, पण त्यातील वापरात आलेली किती आहेत, याचा हिशेब मांडला तर निराशाजनक स्थिती आहे. याचे कारण महाराष्ट्राची सुस्पष्ट विमान वाहतूक योजनाच नाही. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नाशिक, आदी विमानतळांवरून दररोज वाहतूक होऊ शकते. तेथून प्रवाशी मिळू शकतात. मात्र, या ठिकाणांहून प्रवाशी वाहतूक करणाऱ्या विमानांना मुंबई विमानतळावर सामावून घेण्यासाठी सोयीची वेळच मिळत नाही. परिणामी, गैरसोयीच्या वेळेला प्रवास करण्यासाठी लोक तयार होत नाहीत. मुंबईतील आपली विमानतळे प्रचंड वाहतुकीने व्यस्त आहेत. दररोज सरासरी साडेनऊशे विमानांची ये-जा आहे. चोवीस तासांत या विमानांना वेळ देणे अशक्य होते. त्यात महाराष्ट्रातील जिल्हा ठिकाणांहून येणाऱ्या छोट्या विमानांना वेळ कोण देणार? यासाठी महाराष्ट्राच्या तसेच मुंबईच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असलेली नवी मुंबई तसेच पुण्याजवळचे पुरंदर विमानतळ लवकरात लवकर व्हायला हवे आहे. या विमानतळाची युद्धपातळीवर उभारणी करण्याची आवश्यकता होती. त्याशिवाय महाराष्ट्रात विमानतळे उभारून काहीही उपयोग नाही.

चिपीचे विमानतळ आता ह्यसिंधुदुर्ग विमानतळह्ण म्हणून ओळखले जाणार आहे. तसे त्याचे नामाभिकरण करण्यात आले आहे. मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू सध्या नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. त्यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येणार आहे. हा सर्व प्रयत्न अभिनंदनीय आहे, पण विमानतळ उभारणीस सर्व काही मदत केली, तरी प्रवाशी कोठून आणणार आहात. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे लांबुळके आहेत. एका टोकापासून दुसरे टोक दूर आहे. मंडणगड ते बांदा जवळपास साडेतीनशे किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांसाठी म्हणून या विमानतळाचा उपयोग फारसा होणार नाही. शिवाय रत्नागिरी येथील विमानतळ विनावापर पडूनच आहे. सिंधुदुर्ग विमानतळ हा मुख्यत: पर्यटकांसाठी म्हणून उभारण्याचा उद्देश होता.

विमानतळाच्या उभारणीपूर्वीच पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला होता. तेव्हा चर्चा होती की, पर्यटकांसाठी विमानतळ हवे. मात्र, केवळ विमानतळ नाही म्हणून पर्यटक येत नाहीत, असे थोडेच होते का? आलेल्या पर्यटकांना जे हवे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात कितपत निर्माण करण्यात आले आहे? या कोकण किनारपट्टीवर एखादे नवे शहर तयार करावे लागेल. पणजीसारखे शहर हवे असणार आहे. पर्यटकांना निसर्गाबरोबर आधुनिक सुखसोयींनीयुक्त केंद्रे लागणार आहेत. गोव्यात ती सोय असल्याने प्रवाशी तेथे जातात. केवळ विमानतळ झाले म्हणजे पर्यटक येतील, ही आपणच आपली फसवणूक करून घेतल्यासारखी आहे. सी-वर्ल्डचा प्रकल्प रेंगाळला. इतर कोणत्याही आधुनिक सोयींची केंद्रे नाहीत.

पर्यटन जिल्हा म्हणून जे करणे अपेक्षित होते, ते झालेच नाही. या जिल्ह्याची गेल्या दहा-वीस वर्षांतील लोकसंख्या वाढ होत नाही, ती कमीच होते आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा आहे की, ज्याची लोकसंख्या गत जनगणनेद्वारे तपासली तर घटली आहे. अशा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचा विमानतळ झाला, पण तो वापरात येईल कसा? एकतर मुंबईला जाण्याची सोय नाही. आताचे ट्रायल विमानही चेन्नईवरून घेऊन यावे लागले. कारण मुंबई विमानतळावरून ही चैन परवडणारीच नाही, असे अगंतुक विमान उड्डाण करण्यासाठी मुंबई विमानतळाला वेळच नाही.

महाराष्ट्राची नागरी हवाई वाहतुकीची गरज, सध्याच्या त्यासाठीच्या पायाभूत सुविधा, आगामी विकासाची गरज, तसेच दिशा यांचा सर्वांगीण विचार करून एक प्रस्ताव मांडला पाहिजे. त्यातील प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, अन्यथा दोन डझन विमानतळ पडून आहेत त्यात आणखीन एक सिंधुदुर्गची भर पडेल.

Web Title: Sindhudurg - Jagar on the plane map

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.