भारत म्हटला की पहिल्या प्रथम ज्या गोष्टी आपल्या नजरेसमोर उभ्या राहताता त्यामध्ये क्रिकेटचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल. भारतीयांचं क्रिकेटप्रेम अवर्णनीय. क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगणार आहे. फिफाची कुठल्याही स्तरावरची जागतिक स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं पुढचे 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. तसेच यजमान या नात्याने भारतीय फुटबॉल संघ पहिल्यांदाच (ज्युनियर स्तरावर का असेना)  फिफाच्या जागतिक स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा आपल्या देशासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. 
17 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकासाठी एकूण 24 संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. या संघांमध्ये फुटबॉलची पंढरी समजला जाणारा ब्राझील, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, चिली, कोलंबिया असे आघाडीचे संघ खेळणार आहेत. तसेच उत्तर कोरिया, इराण हे आशियाई संघही स्पर्धेत असतील. 23 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 52 सामने खेळवण्यात येतील. हे नवी मुंबई, मडगाव, कोची, कोलकाता, गुवाहाटी आणि नवी दिल्ली अशा सहा शहरातील मैदानांवर खेळवले जातील. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत यजमान भारतीय संघ अमेरिकेविरुद्धच्या सामन्यामधून स्पर्धेतील आपल्या अभियानाला सुरुवात करेल.  
  फुटबॉलच्या दुनियेत अद्याप नवख्या असलेल्या भारतीय संघाकडून या स्पर्घेत फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा नाही. मात्र यजमान म्हणून छाप पाडण्याची संधी निश्चितपणे भारताकडे आहे.  खरंतर सुरुवातीच्या वर्षांमध्ये भारताची फुटबॉलमधील कामगिरी चांगली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच स्वतंत्र देश म्हणून भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. तर 1950 साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पात्र ठरला होता. पण भारतीय फुटबॉल महासंघाने काही कारणाने या स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची भारताची संधी हुकली. त्यानंतर मात्र भारतीय संघ आतापर्यंत फिफाच्या कुठल्याही जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही. 
फुटबॉल जगातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरी क्रिकेटप्रेमींच्या भारतात या खेळाला म्हणावे तसे बस्तान अद्याप बसवता आलेले नाही. क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉलचा विस्तार मात्र गोवा, केरळ, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांपुरताच मर्यादित राहिला. आय लीग, संतोष करंडक आणि अगदी हल्लीच सुरू झालेली इंडियन सुपर लीगसारखी स्पर्धाही फुटबॉलची लोकप्रियता वाढवण्यात म्हणाव्या तशा यशस्वी ठरलेल्या नाहीत. तरीही आपल्या देशात फुटबॉलचा निश्चित चाहता वर्ग आहे. इंग्लिश प्रीमियर लीग, चॅम्पियन्स लीग या युरोपियन लीग लोकप्रिय आहेत. मात्र असे असले तरी फिफा विश्वचषक सोडला तर आपल्या देशात फुटबॉलची सार्वत्रिक चर्चा होत नाही. 
त्यामुळे शुक्रवारपासून सुरू होत असलेली फिफा ज्युनियर विश्वचषक स्पर्धा भारतातील फुटबॉलच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरू शकते. या स्पर्धेची प्रसिद्धी बऱ्यापैकी झाली आहे. सरकारकडूनही या स्पर्धेची आणि फुटबॉलची लोकप्रियता वाढावी यासाठी सकारात्मक प्रयत्न झाले. ही बाब अपेक्षा उंचावणारी आहे. या स्पर्धेमुळे फुटबॉलमधील भविष्यातील स्टार आपल्या घरच्या मैदानांवर खेळताना पाहण्याची संधी भारतीय फुटबॉल प्रेमी आणि भावी फुटबॉलपटूंना मिळाली आहे. या संधीचे सोने व्हावे भारतीय फुटबॉल संघ केवळ ज्युनियर स्पर्धेतच नाही. तर फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पुढच्या काही वर्षांत पात्र ठरावा हीच या स्पर्धेच्या निमित्ताने अपेक्षा. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.