विकासाच्या मुद्यावर प्रचारात चर्चा व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:52 AM2018-11-25T11:52:38+5:302018-11-25T11:53:39+5:30

-सुरेश विसपुते  महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून नुकतीच छाननीची प्रक्रिया आटोपली आहे. छाननीअंती ४६६ उमेदवारांचे अर्ज वैध ...

Discussion on development issues should be discussed | विकासाच्या मुद्यावर प्रचारात चर्चा व्हावी

विकासाच्या मुद्यावर प्रचारात चर्चा व्हावी

googlenewsNext

-सुरेश विसपुते 

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू असून नुकतीच छाननीची प्रक्रिया आटोपली आहे. छाननीअंती ४६६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या अपक्ष उमेदवारांची संख्याही तुल्यबळ आहे. प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांनी अधिकृत उमेदवारांची मते खाऊ नयेत, यासाठी राजकीय पक्षांचा भर अपक्षांना माघारीसाठी प्रवृत्त करण्याकडे राहणार आहे. छाननीची प्रक्रिया आटोपताच राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला आहे. माघारीची औपचारिकता पार पडताच निवडणुकीच्या प्रचारातील चुरसही वाढत जाणार आहे. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून विकासाच्या मुद्यावर  चर्चा झालेली नाही. भलतेच मुद्दे चर्चेत येत असून त्यातच ही निवडणूक आटोपते की काय, असे मत व्यक्त केले जाऊ लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात विकासाच्या मुद्यावर चर्चा होणार किंवा नाही, याबाबत राजकीय निरीक्षकांसह सर्वसामान्य नागरिकही साशंक आहेत. शहरातील मूलभूत सोयीसुविधांची झालेली परवड व त्यांची गरज लक्षात घेता या मुद्यावर विविध राजकीय पक्षांची भूमिका काय राहील त्यांचा दृष्टीकोन त्याबाबत कसा आहे, त्यासाठी काही ‘व्हीजन’ आहे का, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती मिळणे गरजेचे आहे. कारण शहराचा विस्तार वाढत चालला आहे.  नुकत्याच झालेल्या हद्दवाढीमुळे त्यात आणखी भर पडणार आहे. सध्या असलेल्या कार्यक्षेत्रातच मूलभूत सेवासुविधा पुरविताना महापालिका प्रशासनाला नाकीनऊ येत आहेत. शहर हद्दीत आलेल्या १० गावांच्या विकासाचे नियोजन कसे असणार, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठीचे नियोजन कसे असेल, मोकळे भूखंड, ज्या कारणासाठी भूखंड आरक्षित असेल तेथे ती कामे कधी होणार, रस्त्यांचे रूंदीकरण होणार का, भुयारी गटारी कधीपर्यंत होणार, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात घोळत आहेत. त्यांना या निवडणुकीत त्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत, एवढी त्यांची अपेक्षा आहे.
 यंदा दुष्काळामुळे येत्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न तीव्र होणार आहे. त्यासाठी आरक्षित केलेले पाणी पुरणार आहे का? हाही प्रश्न आहे. शहरातील ६० टक्के भागाला तापी योजनेवरून तर उर्वरीत ४० भागाला  नकाणे तलावा, हनुमान टेकडी, डेडरगाव आदी ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. 
मात्र लोकसंख्या व शहराचा विस्तार वाढत असल्याने मिळणारे पाणी पुरेनासे झाले आहे. तसेच महापालिकेचे नियोजन नसल्याने काहींना मिळते तर काहींना पाणीच मिळत नाही. अशी विसंगती आढळते. पाणीपुरवठ्याच्या वेळा निश्चित नाही. दिवसभरात तसेच रात्री, पहाटे केव्हाही पाणी सोडले जाते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. भविष्यात यात बदल होऊन निश्चित वेळेला पाणीपुरवठा व्हावा, अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. साक्रीरोडचे रूंदीकरण करण्यात येत आहे. अतिक्रमण काढल्यानंतर रस्त्याच्या कामासाठी खडी आणून टाकण्यात आली. 
मात्र बरेच दिवस हे रूंदीकरणाचे काम रखडले होते. आता ते सुरू झाले आहे. मात्र अर्धे काम होऊन पुन्हा ते रखडले आहे.  शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. रेल्वे स्टेशन ते बसस्थानक हा रस्ता जणू महापालिका कार्यक्षेत्रातच नाही, अशा पद्धतीने त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. याच रस्त्यावर जिल्हा न्यायालय, हिरे भवन, मोठी रूग्णालये, अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुद्धा आहे. एस.टी. बसही याच रस्त्याने जाऊन महामार्गाला लागतात.
 त्या शिवाय जमनागिरी रस्ता, वाडीभोकर रोड, देवपूर परिसरातील जुना आग्रारोड अशा विविध रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. यातील काही रस्ते इतर विभागांकडे असतील. परंतु कार्यक्षेत्रातील असल्यामुळे महापालिकेने त्यासाठी पुढाकार व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यासह अन्य विकासाच्या मुद्यावर या निवडणुकीत सविस्तर चर्चा होईल, राजकीय पक्ष आपले त्याबाबतचे ‘व्हीजन’ स्पष्ट करतील, अशी अपेक्षा आहे. 

Web Title: Discussion on development issues should be discussed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.