Teachers Day 2018 : नमन कुलगुरूंच्या गुरुजनांना : ...वो सब टीचर ही हमारे भगवान थे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 11:52 AM2018-09-05T11:52:35+5:302018-09-05T12:07:20+5:30

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यभरातील कुलगुरूंनी त्यांच्या गुरूजनांना केलेले नमन त्यांच्याच शब्दांत...

Teachers Day: Naman To the Gurujans of VC: ... all those teachers were our Gods! | Teachers Day 2018 : नमन कुलगुरूंच्या गुरुजनांना : ...वो सब टीचर ही हमारे भगवान थे !

Teachers Day 2018 : नमन कुलगुरूंच्या गुरुजनांना : ...वो सब टीचर ही हमारे भगवान थे !

googlenewsNext

आपला विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्चपदी विराजमान झाल्यानंतर शिक्षकाला होणारा आनंद शब्दांत मावणारा कसा असेल?  दररोज वर्गात न चुकता ‘एक साथ नमस्ते’ म्हणत हसतमुखाने स्वागत करणारा आणि ‘अबकड’ गिरविणारा आपला विद्यार्थी कुलगुरू झाल्याचे पाहून अशीच काहीशी अवस्था त्यांच्या शिक्षकांची झाली असणार.  भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर रोजी जन्म दिन. 'शिक्षक दिन' म्हणून तो साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्यभरातील १२ कुलगुरूंनी त्यांच्या गुरूजनांना केलेले नमन त्यांच्याच शब्दांत...

जीवन शिक्षणाची पायाभरणी शाळेतच झाली 

- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेला. वडिलांकडे तुटपुंजी शेती. त्यावरच गुजराण होत असे. पाच वर्षांचा झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील साळशिरंबे या जन्मगावी जि.प.च्या जीवन शिक्षण प्राथमिक विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतला. येथेच जीवन जगण्याच्या शिक्षणाची पायाभरणी झाली. मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांचे गणितात प्रभुत्व होते. त्यांच्यामुळेच आयुष्यात कधीही बेसिक कच्चे असल्याचा फिल आला नाही. रामचंद्र दादाजी थोरात, हेसुद्धा व्यासंगी शिक्षक. त्यांच्यामुळे इंग्रजी उत्तम झाली. सातवीत इंग्रजीमध्ये मला १०० पैकी ९९ मार्क पडले होते. तेव्हा थोरात सरांचे शब्द होते, ‘ह्या बाळू चोपडे एवढा अभ्यास कोणीही करणार नाही.’ या वाक्यामुळे मला माझ्यातील क्षमता कळली.  दामोदर शंकर माने. ते राष्ट्रभाषा पंडित होते. संगीताची त्यांना उत्तम जाण होती. सर्वाधिक काळ त्यांच्या सहवासातच घालवला. सातवीत मी जिल्ह्यात पहिला आलो होतो. तेव्हा त्यांनी घरी येऊन वडिलांना सांगितले की, मुलगा खूप हुशार आहे. तुमची गरिबी असली तरी मी त्याला पुढील शिक्षणासाठी घेऊन जात आहे. कराडजवळ दहा किलोमीटर अंतरावर काल्हे येथे रयत शिक्षणसंस्थेची पहिली बोर्डिंग शाळा सुरू झाली होती. त्यात मला प्रवेश मिळवून दिला. हा क्षण माझ्या जीवनात परिवर्तन करणारा ठरला. आज जो काही आहे तो केवळ प्राथमिक शिक्षकांनी दिलेल्या दिशा, मार्गदर्शनामुळेच. 
 

शिक्षक खूप चोपायचे; तरीही त्यात आनंद होता
- डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

चौथीपर्यंतचे शिक्षक खूप क्वॉलिटीचे होते. सांगली जिल्ह्यातील मिरज येथील नगरपालिकेच्या शाळेत मराठी मीडियमला होतो. आज काही झालं की आई-वडील शिक्षकांना जाब विचारतात. तेव्हा आमचे शिक्षक खूप मारायचे. काम, अभ्यासही करून घ्यायचे. अगदी गणपतीच्या पेंटिंगपासून ते शाळाचा परिसर सारवण्यापर्यंत. हे सगळं प्रेमापोटी चालायचं. माझ्या शिक्षकांत मराठीचे मुनेश्वर गुरुजी, इतिहासाचे बीडकर, हिंदीचे वाडीकर आणि इंग्रजीचे दीक्षित सर आठवतात. आपल्या मुलालाच शिकवतोय, अशा पद्धतीने ते शिकवायचे. यातून पाया पक्का झाला.
पुढे पाचवी ते दहावीपर्यंचे शिक्षण कोल्हापूर येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले. तेथेही शिक्षक अत्यंत चांगले होते. अगदी पालक या नात्यानेच शिकवत. बोलणे, मारणे हे नित्यनियमाचेच होते. भरपूर शिक्षा केली जाई. त्याची कधीही घरी तक्रार केली नाही किंवा आई-वडिलांनी कधी शाळेत येऊन मुलांना का मारता असे विचारले नाही. वडील पीडब्ल्यूडीमध्ये नोकरीला होते. आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण एकत्रित अभ्यास करायचो. आर्थिक परिस्थिती बेताचीच. जे काही मिळाले ते केवळ चांगले शिक्षण हेच होते. यातूनच आम्ही घडलो.

शिक्षक अंत:करणातून ज्ञानदान करायचे
- डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

जालना जिल्ह्यातील वालसावंगी गावात जि. प. च्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. शिक्षक गावातच राहत असत. या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अभ्यास, प्रगतीविषयी तळमळ होती. त्यासाठी ते अंत:करणातून ज्ञानदान करायचे. यातूनच माझ्यासारखे विद्यार्थी घडले.
ग्रामीण भाग असल्यामुळे गावात लाईट आलेली नव्हती. कंदिलाच्या उजेडातच संध्याकाळी अभ्यास करावा लागायचा. शिक्षक प्रत्येक दिवशी गृहपाठ देत असत. कोरडे गुरुजी, कद्रे सर, मयुरे गुरुजी अतिशय शिस्तीचे होते. लोखंडे सरांचा मोठा धाक होता. शिक्षकांसोबत अगदीच घरगुती संबंध होते. माझे वडीलही शिक्षकच होते. मात्र, ते दुसºया गावी होते. त्यामुळे त्यांचाही धाक होता. काही अडचणी आल्या की शिक्षकांना विचारत. ते तात्काळ सोडवत. आम्ही चार जण एकत्रित अभ्यास करीत होतो. आमचा ग्रुप नेहमी अभ्यासात आघाडीवर होता. पहाटे ४ वाजता उठून अभ्यास करायचो. तेव्हा चहा पिण्यासाठी साखर मिळत नव्हती. त्यामुळे गुळाचाच चहा असायचा. सकाळी मंदिराचीही स्वच्छता करीत असू. तेव्हाचे शिक्षणच वेगळे होते. कधीच दांडी मारावीवाटत नव्हती. तेव्हा शिक्षकांनी घडविल्यामुळे आमच्यासारखे अनेक विद्यार्थी प्रगती करू शकले. 

अभ्यास करा असे कोणी सांगितलेच नाही
- डॉ. एम. व्ही. कल्याणकर, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली

अतिशय वेगळ्या परिस्थितीत बालपण गेले. प्राथमिक शाळेत जाताना आपल्याला शिकायचे आहे अन् शिकून नोकरी लागणार आहे, असे काही माहीतच नव्हते. शिकत गेलो. पीएच.डी.च्या मार्गदर्शकांचा अपवाद वगळता आयुष्यात शिका आणि अभ्यास करा, असे कोणी सांगितलेच नाही.
नांदेडजवळील पिंपळगाव महादेव हे माझे गाव. येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण झाले. तेव्हा शाळेतील शिक्षक गावातच राहत होते. शिक्षक विद्यार्थ्यांसोबत समरस झालेले असायचे. दररोज सायंकाळी कोणत्या ना कोणत्या शेतकºयांसोबत गुरुजी शेतात जात असत. मला आठवते शौनक नावाचे गुरुजी होते. त्यांची मुलंबाळं शहरात राहायची; पण ते गावात राहत होते. आमची शाळा फुलटाईम होती. सकाळी दहा ते एक आणि दुपारी दोन ते पाच  होती. शिफ्टमधील शाळा नव्हती. घर, शेतीतील कामे करत-करत प्राथमिक शिक्षण झाले. आमच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ५० मुले होती. त्यातील दहावीपर्यंत शिकून पास होणाºयात केवळ चार जण होती. यातही दोघांनीच पदवीचे शिक्षण घेतले. त्यात मी होतो. आई- वडील अशिक्षित. तीन बहिणी आणि दोन भाऊ, असे सहा भावंडं होतो. हे शिक्षण अज्ञानात आनंद साजरं करणारं होतं. ताणही नव्हता. कटकटी नव्हत्या. स्वच्छंदी शिक्षण होते ते. 

आयुष्यभराचे संस्कार शाळेतच मिळाले
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर

आई-वडील प्राध्यापक असल्यामुळे घरातील वातावरण शिक्षणासाठी अत्यंत अनुकूल होते. अमरावती शहरातील सर्वात चांगल्या शाळेत नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. सर्वच शिक्षक चांगले होते. त्यांनी केलेले संस्कार आतापर्यंत पुरले आहेत. आयुष्यभरातील चांगल्या संस्कारांची शिदोरी शाळेतूनच मिळाली. चौथीनंतर पाचवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण शहरातील सर्वात बेस्ट असलेल्या मनीभाई गुजराती हायस्कूलमध्ये झाले. तेथून पुढचे पदवीस्तरापर्यंतचे शिक्षण शासकीय महाविद्यालयात पूर्ण केले. पदव्युत्तरपासून आजपर्यंतचे शिक्षण आणि अध्यापन नागपुरातच केले. चांगले शिक्षक, शाळा मिळाल्या. या शिक्षणापासून आयुष्यभर संस्कार करणारे शिक्षण मिळाले. सर्व शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनेच शिकविले असल्याचे मूल्यमापन मी करील. या शाळेतील सर्वच विद्यार्थी मोठमोठ्या पदांपर्यंत पोहोचली आहेत. कामगिरी केल्याचे मूल्यमापन आहे. माझे बालमित्र मोठमोठ्या पदांवर आहेत. चार न्यायमूर्ती आहेत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात विधिज्ञ आहेत. काही जण प्रशासकीय अधिकारीसुद्धा आहेत. शाळेत मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर आम्ही मोठे झालो आहोत. दरवर्षी ‘फेंडशिप डे’ला सर्व वर्गमित्र अमरावतीमध्ये एकत्र येतोत. गेट टुगेदर केले जाते. सर्वांसोबत चांगले संबंध आहेत. शाळेतील चांगल्या शिक्षकांच्या शिकवणीमुळेच हे सर्व घडले.

वो सब टीचर ही हमारे भगवान थे !
- डॉ. के.पी. विश्वनाथा, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर

पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील लकवल्ली येथील शासकीय शाळेत झाले. चुलते त्याठिकाणी नोकरीला होते. त्यांच्यासोबतच आम्ही होतो. पुढे पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण बंगळुरू येथील शासकीय माध्यमिक विद्यालयात झाले. या वेळच्या शिक्षणात भेटलेले शिक्षक हे अतिशय नीतिवान, नैतिक मूल्यांची शिकवणूक देणारे होते. या शिक्षकांनी आदर्श व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देत आमच्यापुढे आयडॉल उभे केले. यातूनच आम्ही शिकत गेलो. उच्च माध्यमिकला बंगळुरू शहराजवळील बापा ग्राम हायस्कूलमध्ये शिकत असताना शिक्षक सीताराम यांनी विज्ञानाविषयी गोडी निर्माण केली. भूगर्भातील होणारे बदल, घडलेल्या घटना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितल्या. ही शिकवण आणखीही विसरलो नाही. याच शाळेतील शिक्षिका ललितम्मा, नंजूडैया, रंगराजू हे शिक्षक कायम आठवणीत आहेत.  या शिक्षकांनी जीवन जगण्याची, मोठे होण्याची आणि शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली. यातूनच मी शास्त्रज्ञ बनलो.  या शिक्षकांचा प्रभाव आजही माझ्यावर आहे. ११ वीत तुमकूर जिल्ह्यातील सिद्धगंगा मठ येथे शिक्षण झाले. तेव्हा एस.जी. सुरप्पा हे गांधीवादी शिक्षक होते. त्यांनी आमच्यात आमूलाग्र बदल केले. आम्हाला आदर्शवादी बनविले. नैतिक मूल्ये शिकवली.  ये सब टीचर ही हमारे भगवान थे...

(शब्दांकन : राम शिनगारे )

Web Title: Teachers Day: Naman To the Gurujans of VC: ... all those teachers were our Gods!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.