तिढा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 07:09 PM2018-02-17T19:09:00+5:302018-02-17T19:09:22+5:30

लघुकथा : घरातले सगळे लोकं नको म्हणतानाही कोणालाही न जुमानता मोठ्या अन् हौसेनं विमलबाईनं भाच्चीसून केली. वाजत-गाजत घरात आणलं... तिचं कोडकौतुक केलं... माज्या भावाची भारी गुणी लेक म्हणून शेजारच्या चार आया-बायाला सांगू लागली. स्वयंपाक पाण्यात लई सुगरन अन् काम-धंद्यात भारी अट्टल आहे. आळस तर तिला कसल्या कामात नाहीच. सासू-सून, माय-लेकीसारख्या वागू लागल्या.  एकमेकींची जिवापाड काळजी घेऊ लागल्या.  इतकी की शेजारच्या आया- बायाही दोघींचा हेवा करू लागल्या.

knot | तिढा 

तिढा 

googlenewsNext

- प्रदीप पाटील 

अशात सून इंदूचं पोट पिकल्याची बातमी घरात पसरली अन् विमलाबाईच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलाचं लग्न होऊन चार वर्षे झाली होती. तरी गोड कसली बातमी येत नसल्यामुळे विमलाबाईला थोडी धाकधूक वाटत होती. एकतर आपण घरात सगळे नको म्हणत असताना ही भावाची मुलगी सून म्हणून केली. लग्नाला एवढी वर्षे झाली तरी पोरीचं पोट पिकत नव्हतं. घरातली सगळी माणसं मनातल्या मनात पुटपुट करीत होती. एव्हाना त्याचा अर्थही तिला समजत होता; परंतु तिला काही बोलता येत नव्हतं. ती सारखं व्रतवैकल्य करीत देवाच्या धावा करीत होती. 

मनातल्या मनात सूनेचं पोट पिकवण्याची विनवणी करीत होती. इकडे दवाखान्यात चांगल्या डॉक्टरांकडे सल्ला-उपचार चालू होता. शेवटी कोणाचा गुण आला, डॉक्टरची मात्रा लागू पडली का? उपास- तापासाला फळ दिले माहिती नाही. मात्र या बातमीने विमलबाई चांगल्याच सुखावल्या. पूर्वीपेक्षा सून दोन जिवाची म्हणून काळजी घेऊ लागल्या. तिला काय हवं नको ते पाहू लागल्या. आंबट- चिंबट खाऊ वाटते का म्हणून विचारणा करू लागल्या. तशात नऊ महिने नऊ दिवस कधी भरले कळलेच नाही.  

पहिल्या बाळंतपणाला सूनबाई माहेराला गेली. यथावकाश इंदू बाळंत झाली. मुलगी झाली. ‘पहिली बेटी तूप रोटी’ म्हणून तिच्या माहेरच्यांनी आनंदाने जिलेबी वाटली. बाळ- बाळंतीण सुखरूप असल्याचा सांगावा विमलबाईकडे गेला. पहिली मुलगी झाल्याने त्या तशा नाराज झाल्या. मात्र, शेवटी आपल्या सूनेचं पोट तरी पिकलं. म्हणून आहे  त्यात सुख मानत मुलगा न झाल्याचं दु:ख विसरून चिटुकल्या-मिटुकल्या नातीच्या खेळण्या बागडण्यात हरवून गेल्या.  

काही दिवसांनंतर इंदू दुसर्‍यांदा पोटूशी राहिली. गेल्या वेळी जे झालेलं झालं. पहिली वेळ होती.  यावेळी मात्र लिंग तपासणी करूनच बाळाला जन्मास घालायचे. मुलगा असेल तर ठेवायचे नाही तर खाली करायचे. याचा हेका  विमलबाईनं धरला. मात्र ही कल्पनाच इंदूला सहन होत नव्हती. माज्या हाडा-मासापासून आकाराला येत असलेला जीव, मी माज्यापासून अलग करून मी रितीच कशी होऊ? दुसरी  काहीही अपेक्षा माज्याकडे करा; परंतु एवढं सोडून बोला आत्याबाई म्हणून स्फुंदू-स्फुं दू रडू- रडू विनवणी करू लागली. मात्र विमलबाई आपला हेका सोडेना.  

सासू- सूनेच्या वादावादीत दिवस भरून एकवारचे इंदू बाळंतही झाली. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली. अखेर इंदूला दुसरी मुलगीच झाली. त्याने विमलबाईने अजून इतकाच थयथयाट सुरू केला. माझं ऐकली नाही. माझं ऐकलं असतं तर हे  रिकामं करून टाकलं असतं तर बिघडलं असतं कुठं....? हे एकच प्रश्नाचं खूळ डोक्यात घेऊन विमलबाई सुनेशी वादत होती.

लहान-सहान गोष्टीवरून रोज वाद होऊ लागले. ते कमालीचे विकोपाला जाऊ लागले. शब्दाने शब्द वाढू लागला. त्याने दोघीत अजून इतकाच दुरावा निर्माण होऊ लागला. शेवटी दोघीमधील ही लढाई हातघाईवर आली.  एकेदिवशी या घरात एक तर ती राहील नाही तर मी राहीन. काय ते सोक्ष-मोक्ष एकवारच करूनच टाक, असा प्रस्ताव आपला मुलगा गोविंदरावापुढे ठेवला. आईच्या या अनपेक्षित मागणीने गोविंदरावाच्या भोवताल स्वत:चं घर गरगरा फिरू लागलं. गावभर आपण इतरांची घरं वाचवण्याचा प्रयत्न करीत हिंडतो. अन् आपल्या एकाच घरात आता काय होतंय? हे पाहून तो कमालीचा परेशान झाला. आई-बायकोची रोजची धुसफूस कानावर होतीच. बाया- बायाचा मामला आहे. त्यातल्या त्यात त्या आत-भाच्या आहेत.

छोटी-मोठी धुसफूस कोणाच्या घरात नसते?. चालत असतं म्हणून तो या प्रकरणापासून दोन हात दूरच होता. आता या दोघीत एवढं फाटलं होतं की ते आता सांधताही येत नव्हतं. तरीही गोविंदराव आई- बायकोशी चर्चा करून दोघींचाही अंदाज घेतला. आई काही बोलल्या शब्दाला माघार घ्यायला तयार नव्हती. आईचं ऐकून बायकोला घराबाहेर काढावे तर तिचा काय दोष? हा प्रश्न
होताच.  

सगळ्या गावाच्या भानगडी मिटविणार्‍या गोविंदरावाच्या घरातच एक नवीनच तिढा निर्माण झाला  होता. यात तो खचून गेला नाही. दोघीही एकमेकांचं शिजवलेलं अन्न खायचं नाही म्हणून शपथ घेतलेल्या दोघींनाही म्हणाला. ‘तुम्ही दोघीही एकमेकांशी ठरल्याप्रमाणे बोलू नका. अन्न खाऊ नका.  जोपर्यंत तुम्हा दोघींचा राग उतरणार नाही. तोपर्यंत मी स्वत: दोघींनाही माज्या हाताने शिजवून वाढणार. ते तरी खाणार का नाही? दोघीही गोविंदरावाकडे किती तरी वेळ पाहतच राहिल्या.

(patilpradeep495@gmail.com )

Web Title: knot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.