Crop insurance | पीक विमा

- महेश मोरे

सोनबाला हे सगळं बघून हातपाय गळाल्यावनी झालं. आपली अन् नेत्याची जमीन सारखीच. काय, काळंबेरं केलं असल? सोनबा याच इचारात पडला. आता या नेत्याची साखरपट्टीत चाळीस एकर जमीन. सात लाख रुपये मंजूर झालेले. काय केलं असल बरं? कोणता लग्गा लावला असल. त्याला एक-दोनदा ओल्या पार्ट्या केल्या. नेत्याला सगळे मार्ग ठावं हातं. आपलं कोणीच न्हाई, राम भरोसे. सोनबाला पाणी कोठं मुरायलं, काहीच कळत नव्हतं. बरं आपून त्याच्याशी कितीही गोड राहा. मुकादावा करणारच. काई बोलाय जावं, तर हुमरीतुमरी. कव्हा झोपत गोटा घालील याचा नेम न्हाई. सोनबा इचार करू लागला. या घोड्याच्या पुढून जावं, तर अंगावर सुटतं. मागून जावं, तर लाथ मारतं. तसं पाहावं तर पहिल्यावनी नेता राहिला न्हाई. दरसाल टॅक्टरनं नांगरते. बख्खळ धुरा फोडला. आपून धुर्‍याजवळ लिंबाची झाडं लावली. त्यानं धुरा फोडत. फोडत. नेला की कोठोर. आता ती लिंबाची झाडं त्याचीच झाली. मायला दोन-तीन मुरडनं तरी त्यानं घुसखोरी केली...

सोनबा रांगत थांबलेला. रांग काही पुढं सरकत नव्हती.मध्यवर्ती बँकत गर्दीच गर्दी. काळ्या पहाटपासून लाईन लागली होती. पीक विमा भरण्यासाठी गावोगावची माणसं आली व्हती. सोनबाच्या मागं ग्यानबा होता. तो हातानं खुणवत म्हणाला,
‘ते बघ हार्‍या-नार्‍या नेत्याचा विमा भरून निघाले बाहेर.’ ‘आरबा! त्याचा सातबारा... त्याचं आधारकार्ड... हाताचे ठसे-त्यानं कोठायं... ’’
‘तेकाय ते मागच्या दारानं नेता चालला बघ.’
‘मायला याची कोठंबी घुसखोरी. मोठ्याचा आला गाडा अन् गरिबाचा संसार मोडा. मायला आपलं काहीच खरं न्हाई...’
तू बस आता इथंच माळ जपत. तुव्हा शेजारी. निदान, तुव्हा तरी नंबर लावावं की बरं.’
‘त्याचं त्यालाच पल्ड, त्यानं आपल्या कव्हा पतरवाळीत टाकलं.’ ‘इच्या मायला याच्या कोठंबी बिसलरी अन् थम्सब हायेच.’ ‘म्हंजी.’
‘बघानं ते हार्‍या-नार्‍यावनी माणसं जागोजागी.’
‘आता आपल्या गावातलं ननगं पोरगं तं हार्‍या-नार्‍याला बिसलरी म्हणते अन् नेत्याच्या लईच जवळ राहणार्‍याला थम्सब.’
‘तरी मव्हा नातू म्हणू लागला माघं आली बिसलरी... आली बिसलरी... मला काई कळालंच न्हाई. मला वाटलं लहान पोरायचा खेळ असल...’
‘जाऊ दे आपला कव्हा नंबर लागल.’
‘आपल्याला मधी बँकत काय चाललं काहीच माईत न्हाई... मायला हे बँकतले सायब काय डंगर्‍या बैलावानी काम करायलेत... हळूच चल नंद्या अन् आजचं होईल उंद्या.’
‘बघूत गड्या जिथं उजडलं तिथं उजडलं, लाईन काई सोडायची न्हाई...’
‘म्या म्हणतो, कालच्यावनी आजचा दिसबी बखाडीचा जाईल.’ सोनबा अन् ग्यानबा बर्‍याच येळपसून बोलू लागले... सोनबाची नदर हातच्या कागुदावर पडली. पांढरे कागूद हातात धरून-धरून काळे झालेले...

सोनबाच्या पायावरती ताण येऊ लागला. उभं ठाकून-ठाकून पाय दुखू लागले... अंगात अवसान राह्यलं नव्हतं. जीव गळाटून गेलेला. जरा-जरा लाईन म्होरं सरकू लागली. ग्यानबाला हुकी आली. म्हणाला, ‘मायला पाऊस कव्हा पडतो की, नावन्याय कापसं, सोयाबीन सुकायलं आपल्या मराठवाड्यात अन् विदर्भात कुणबी आत्महत्या करायला.’ ‘पाऊस पडल्यावर या सरकारच्या दारात कहाला आलो आस्तो आपून. आज्याच्या, पंजोबाच्या काळात पाऊस पडत व्हता. माकूल माल व्हायाचा, खंड्याशी ज्वारी, तूर व्हयाची... कोणीच आत्महत्या करीत नव्हतं. आता तर आत्महत्याचं पीक जोमात वाढलंय...’

उलुसी लाईन संपलेली... सोनबाला वाटलं आपून बरंच पुढं आलो. सगळीच माणसं वैतागून गेली. इतक्यात सायबालाच काय दया आली देव जाणो. चपराशाच्या हाती सगळ्यायची कागदपत्रं जमा केली. त्यानं पटकन म्हणाला, ‘मी नाव पुकारणार मग तुम्ही या’ तव्हा सोनबानं बूड टेकवलं. बँकच्या म्होरं बसल्या-बसल्या सोनबा म्हणाला, ‘म्या गोविंदाला म्हणलं लायनीत उभा राहाय. पणिक काचा ऐकते. मने मला जिल्ह्याला काम हाये. जरा दाबून बोलाय गेलो, तर म्हणे मह्या नावाची कोठं जमीन केली.’ ग्यानबा म्हणाला, ‘मव्ह पोरगं तसंच करायलं. तरीबी मह्या चार एकर त्याच्या नावाची केली. मह्या नावी दोनच एकर. आज काय तालुक्याला, उद्या जिल्ह्याला फिरण्यावरच हाये. जव्हा तव्हा म्हणते म्या कुक्कुटपालन करणार. कव्हा करते की, पैसे तर बोंब उधळायलं..’ संध्याकाळचे पाच वाजले. दिस माळवतीला आला. सोनबाचं नाव काही पुकारल्या जात नव्हतं. बरं आजचा विमा भरण्याचा आखरी दिस, पहाटपसून पोटात काही न्हाई. सोनबाला चक्कर येयाल्यावनी होऊ लागलं. रात्री ८ वाजता सोनबाचं नाव पुकारलं... सोनबाला बक्षीस मिळाल्यावनी झालं. त्यानं साहेबापुढं उभा ठाकला अन् अचानक पीक विम्याचं सर्व्हरच गेलं... धाडकन चक्कर येऊन सोनबा बँकतच पडला.

( maheshmore1969@gmail.com )


Web Title: Crop insurance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.