क्लॉक अवर बेसिस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:09 PM2018-04-28T18:09:26+5:302018-04-28T18:10:47+5:30

लघुकथा : प्राचार्य आज अचानक कसे काय सुरू झाले काहीच कळेना. राक्षसमारेंनी एकदा समोर बसलेल्या सर्व ‘हेड’कडे पाहिले अन् एकदा प्राचार्यांकडे. 

Clock hour basis ! | क्लॉक अवर बेसिस !

क्लॉक अवर बेसिस !

googlenewsNext

- हंसराज जाधव

हातातले पुस्तक आणि खडू सावरत प्रा. आजगावकरांनी मनगटावरील घड्याळ पाहिले आणि पुन्हा येरझाऱ्या घालायला सुरुवात केली. बेल वाजून सात-आठ मिनिटं झालीच होती म्हणा!  पण मुद्दा पूर्ण करावा म्हणूनच प्रा. मिलिंद राक्षसमारे घाई करीत होते. प्रा. आजगावकर बाहेर आल्याचे लक्षात येताच ते लगेच वर्गाच्या बाहेर आले.
‘नमस्कार सर!’
‘नमस्कार!’  प्रा. आजगावकरांनी हातातल्या खडूशी चाळा करीत राक्षसमारेंना आपादमस्तक न्याहाळले. पस्तीशीकडं झुकलेला तरुण. इनशर्ट, पॉलिश  केलेला बूट, उजव्या हातात घड्याळ, दोन पुस्तकं, काही नोट्स. फळ्यावर लिहून हात पांढरे झालेले! राक्षसमारेंच्या लक्षात यावं म्हणून आजगावकरांनी परत एकदा घड्याळ पाहिले. ‘स्वॉरी सर, थोडा उशीर झाला!’ राक्षसमारे अपराधीपणे बोलले. ‘चालायचंच राक्षसमारे! नवीन आहात. उत्साही आहात... काय तुमचाच होता ना पिरीयड?’
‘अं... नाही सर, पाटील सरांचा होता. मी एन्गेज केला!’ ‘हां... तरी म्हटलं माझ्याआधी पाटीलचा तास असतो मग तुम्ही कसे? चला ‘हेड’चं ऐकावंच लागते म्हणा... पाटील नाहीत का आज?’
‘आहेत; पण थोडा उशीर होणार होता त्यांना, म्हणून...’ राक्षसमारे. ‘चालायचंच... बाकी काही असो; पण बरेच मग्न दिसलात शिकवण्यात! काय शिकवत होतात?’ आजगावकरांनी विषय लांबवलाच. वर्गातले तीन-चार विद्यार्थी ताटकळत बसले होते. ‘सर, भारतीय राजकीय विचारवंत’ हा पेपर आहे ना थर्डीयरला. त्यातलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं शैक्षणिक धोरण शिकवत होतो.’ राक्षसमारेंनी आजगावकरांच्या चौकशीला थोड्याशा नाखुशीनेच उत्तर दिले.
‘अरे व्वा, छान! बरं, किती मुलं आहेत तुमच्या विषयाला?’ ‘पंधरा-सोळा आहेत. पैकी तीन-चार येतात रेग्युलर!’ ‘चला, हेही नसे थोडके...’ म्हणत प्रा. आजगावकर वर्गात शिरले.
स्टाफरूममध्ये येऊन राक्षसमारेंनी पुस्तके ड्राव्हरमध्ये ठेवली. खडूने पांढरे झालेले हात धुऊन खुर्चीवर थोडे रिलॅक्स झाले. प्रा. राक्षसमारे दोन-तीन वर्षांपासून क्लॉक अवर बेसिस (सी एचबी) वर राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून जॉईन झाले होते. सेट परीक्षा पास झाल्यावर पर्मनंटच्या नादात विद्यापीठातच दोन वर्षे गेले. त्यात मागच्या दोन-तीन वर्षांपासून शासनाने प्राध्यापक भरती बंद केल्यामुळे मोठीच पंचाईत झाली. तालुक्यातील कॉलेज म्हणून राक्षसमारेंनी हे कॉलेज जॉईन केलं. तालुक्यापासून आठ-नऊ किलोमीटरवर गाव असल्यामुळे मोटरसायकलवर अपडाऊन करणं सोईचं पडत होतं. खरंतर राक्षसमारेंना आठवड्यातून पाच-सहा तासच होते. एका तासाला अडीचशे प्रमाणे महिन्याला सहाएक हजार मिळणार होते. त्यातूनच पेट्रोल पाण्याचा खर्च म्हटला तर दीड-दोन हजार त्यात जाणार. परत प्राध्यापक म्हटलं की इस्त्रीचे कपडे, बूटपॉलिश हे सर्व आलंच! तसं पदरात काही पडतच नव्हतं; पण दोन-तीन वर्षांत ‘हेड’ रिटायर्ड झाल्यावर जागा खाली होणार होती. त्या भरोशावरच राक्षसमारेंनी ही सीएचबीची नोकरी धरली होती. राक्षसमारेंची खुर्चीवर बसल्या बसल्या लागलेली तंद्री  शिपायाच्या ‘सर, प्राचार्यांनी  बोलवलंय तुम्हाला!’ या वाक्याबरोबर भंगली. ते खाडकन् जागे झाले. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. जो तो आपल्या कामात मश्गूल होता. दोघं-तिघं पगाराला उशीर झाल्यामुळे होमलोनचे हप्ते कसे थकले अन् त्यामुळं किती नाकीनऊ आलं, याची चर्चा करीत होते. त्यातल्या एकाने मुद्दाम राक्षसमारेंकडे पाहत ‘पगार कधी होईल हो..? च्यायला आधी बरं होतं राव! पाच-सात हजारांत भागायचं सगळं. आता काय सत्तर हजारही पुरंनात! महिन्यातून दोनदा व्हायला पाहिजे राव पगार..!’ असा सूर काढला. राक्षसमारेंनी त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत प्राचार्यांची केबिन गाठली.
‘सर, आत येऊ?’ ‘या राक्षसमारे या..!’
समोर बसलेल्या दोन-तीन ‘हेड’सोबत चाललेल्या गप्पांतून डोकं वर काढत प्राचार्यांनी  परवानगी दिली. कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर टेकल्याबरोबर प्राचार्यांनी सुरुवात केली, ‘हां... काय म्हणतात राक्षसमारे विद्यार्थी? होतात का तास वगैरे?’
‘हो सर,  होतात ना तास!’ राक्षसमारेंनी उत्तर दिले.
‘अहो; पण कम्प्लेंटस् आहेत तुमच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या. सिलाबस पूर्ण होत नाही म्हणे तुमचा. थोडं कॉलेजमध्ये थांबत चला! नेहमी बाहेर... बाहेर... कॉन्फरन्स काय..., कार्यक्रम काय... अहो, पर्मनंट झाल्यावर तेच करायचंय राक्षसमारे तुम्हाला...!’
प्राचार्य आज अचानक कसे काय सुरू झाले काहीच कळेना. राक्षसमारेंनी एकदा समोर बसलेल्या सर्व ‘हेड’कडे पाहिले अन् एकदा प्राचार्यांकडे. काही तरी उत्तर द्यायचं म्हणून ते बोलले, ‘नाही सर, तसं काही नाही. वाटलंच तर पाटील सरांना विचारा! समोरच आहेत ते. मी घेतो माझे सर्व तास व्यवस्थित!’ ‘राक्षसमारे माहीत आहे मला. तुम्ही घेता तुमचे तास... कधी कधी सरांचेही घेता, नाही असं नाही... पण..’
प्राचार्यांनी ‘सरांचेही काही तास घेता’ म्हटल्याबरोबर पाटील सर थोडे वरमले. सावरून बसले. ते काही बोलण्याच्या तयारीत होते; पण प्राचार्यांनी परत सुरुवात केली, ‘हे बघा राक्षसमारे, किती वर्षे झाली तुम्ही काम करताय आमच्याकडे...! दोन-तीन वर्षे तरी झाली असतील? कसं आहे, तुम्हाला फ्युचर आहे इथं राक्षसमारे! चांगलं काम करा. कुठं जायचं असेल कॉन्फरन्सला, इंटरव्ह्यूला तर सरांना सांगून जात जा... हेड आहेत ते तुमचे, कसं..?’ ‘राक्षसमारे सांगून जात नाहीत मला,’ अशी तक्रार केली असणार हेडने. म्हणूनच प्राचार्यांनी अचानक बोलवलंय आज! राक्षसमारेंच्या आताशा कुठं खरी गोम लक्षात आली; पण बोलण्यात अर्थ नव्हता जास्तीचं. प्राचार्यांना ‘हो सर, बरं सर...’ म्हणत राक्षसमारे खुर्चीवरून उठले. बाहेर पडणार; पण काही तरी आठवलं. बोलू का नको म्हणत म्हणत बोलले; पण थोडं चाचरतच,
‘सर, ते पगाराचं?’ ‘हो... हो... आहे माझ्या लक्षात. तुमचा अर्ज आहे माझ्याकडे पडलेला, अ‍ॅडव्हान्ससाठीचा! कसं आहे, तुमचं बिलं तर पाठवलेत चार महिन्यांचे जे.डी. आॅफिसला; पण ते लवकर देतच नाहीत त्याला काय करणार आपण? हां, ते अ‍ॅडव्हान्सचं बघतो मी काय करता येईल ते... किमान दिवाळीला तरी मिळाला पाहिजे तुम्हाला पगार. हो की नाही? कितीचा अर्ज होता तुमचा?’
‘दहा हजारांचा सर!’ राक्षसमारे
‘दहा हजार? दहा हजार तर काही नाही; पण... पाच-एक हजार करू! तुम्ही एकटे नाहीत ना राक्षसमारे. सीएचबीच्या सात-आठ लोकांना पाच पाच हजार म्हटले तरी किती पैसे लागतील..? तरी करतो मी काही तरी. काळजी करू नका, दिवाळीला मिळेल पगार तुम्हाला खर्चायला... ओके?’
प्राचार्यांनी दोन-तीन दिवसांत अ‍ॅडव्हान्स देण्याचं कबूल करताच राक्षसमारे केबिनच्या बाहेर पडले. बाहेर पडल्या पडल्या त्यांच्या डोळ्यापुढं दिवाळीच्या खरेदीची यादी तरळू लागली... कपडे, सुगंधी उटणं, फटाके असं बरंच काही अन् पोरगा लेक्चर झाल्यावर गावात सर्वात उंच आकाशदिवा लावायचा म्हणून कित्येक दिवस वाट बघणाऱ्या माईसाठी एक आकाशदिवा, बस्स...!

( hansvajirgonkar@gmail.com )
 

Web Title: Clock hour basis !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.