जलस्त्रोत आटले; भीषण पाणी टंचाईचे सावट

By admin | Published: May 17, 2017 12:23 AM2017-05-17T00:23:31+5:302017-05-17T00:23:31+5:30

उन्हाळ्याच्या पूर्वार्धात वरठी येथील पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे.

Water sources hit; Extreme water scarcity | जलस्त्रोत आटले; भीषण पाणी टंचाईचे सावट

जलस्त्रोत आटले; भीषण पाणी टंचाईचे सावट

Next

वरठीतील प्रकार : पाणीपुरवठा बंद होणार, पाण्याचा वापर कमी करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : उन्हाळ्याच्या पूर्वार्धात वरठी येथील पाणी पुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या नदी पात्रातील इंटेकवेलचे पाणी आटल्यामुळे येत्या दिवसात नळाद्वारे होणारे पाणी पुरवठा प्रभावित होणार असून नळाला येणारे पाणी कमी येणार आहे. सध्या स्थितीत इंटकवेल कोरडी पडली आहे. त्यामुळे दोन महिने वरठीवासीयांना पाणी टंचाइचा सामना करावा लागणार आहे.
वरठी ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा खमाटा येथील सूर नदीच्या पात्रात आहे. २००२ मध्ये सुरु झालेल्या या योजनेला १५ वर्षे झाली. १५ वर्षात कधीही नैसर्गिक कारणामुळे पाणीटंचाई झाली नाही. मागीलवर्षी पावसाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे २० दिवस पाणी पुरवठा बंद होता.
सनफ्लॅग कंपनीच्या मदतीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळी सनफ्लॅग कंपनीचे इंटकवेल पाणी आटल्यामुळे बंद आहे. सनफ्लॅगचे स्वत:च पाणीपुरवठा बंद असल्यामुळे गावात पाणी पुरवठा होणे शक्य नाही. पाणी टंचाईमुळे धरणाचे पाणी नदीत आल्याशिवाय पर्याय नाही. वरठी येथील लोकसंख्या २० हजाराच्या घरात असून गावातील बहुतांश भागातील लोक ग्राम पंचायतीच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून आहेत. गावात घरोघरी विहिरी असल्या तरी पिण्यासाठी वापर होत नाही. अशा स्थितीत अघोषित काळासाठी पाणीपुरवठा बंद राहिल्यास गावात रोष निर्माण होईल.
नदी पात्रात पाणी आल्याशिवाय वरठीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नाही हे मात्र निश्चित आहे. सद्यस्थितीत ५ ते ६ दिवस पाणीपुरवठा होऊ शकतो किंवा पाणी पातळी अजून खाली गेल्यास दोन दिवसातही पाणी बंद होवू शकतो अशी स्थिती आहे. इंटकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेली आहे. ती उपसल्याशिवाय पाण्याची स्थिती लक्षात येणार नाही. यामुळे पुढील दिवसात पाणी जपून वापरल्याशिवाय पर्याय नाही.
वाढत्या तापमानात पाण्याची टंचाई म्हणजे दोन दशकपूर्वीची टंचाई सदृष्य स्थितीचे चिन्ह दिसत आहेत. दोन दशकापूर्वी वरठी येथे पाण्याची टंचाई म्हणजे दुष्काळी स्थिती होती. पिण्याचे पाणी आणण्यासाठी दोन दोन किमी अंतर जावे लागत होते तर रात्र रात्र जागून विहिरीचे पाणी शोधावे लागत होते.

सार्वजनिक विहिरीवर गर्दी वाढणार
नळाला मुबलक पाणी येत असल्यामुळे गावातील सार्वजनिक विहिरीचा वापर होत नव्हता. आता या विहिरीवर गर्दी वाढणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. गावात २५ सार्वजनिक विहिरी आहेत. यातील केवळ चार विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. गावात २८ बोअरवेल्स असून त्यापैकी ६ बोअरवेल्स बंद आहेत. पाणी टंचाईच्या काळात त्या साधनांचा वापर केल्यास पाणी टंचाईवर मात करता येऊ शकते. बोअरवेल्स पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत शंका आहे. गावातील विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून नादुरुस्त बोअरवेल्स दुरुस्त करण्यात येत आहे.

२१५० नळधारक पाण्यापासून मुकणार
वरठी गावात ग्रामपंचायत ते २१५० नळ धारक आहेत. सरपंच संजय मिरसे यांच्या काळात वाढीव पाईप लाईन टाकून वरठीच्या अनेक भागापर्यंत पाणी पोहचविण्याचे काम करण्यात आले. नळ असूनही पाणी न मिळणाऱ्या घरापर्यंत पाणी नेण्यासाठी उपाययोजना करून घरापर्यंत शुद्ध पाणी पोहचले आहे. दुर्देवाने नैसर्गिक आपत्ती आणि पाण्याचे नियोजन नसल्यामुळे वरठी येथील नळव्यवस्था शोभेची वास्तू ठरणार आहे यात शंका नाही. येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईमुळे नळधारक पाण्यापासून मुकणार आहेत.

वरठी येथे जल शुद्धीकरण यंत्रणा असल्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा होतो. पाणी टंचाई नैसर्गिक असल्यामुळे पाण्याचा कमी वापर आणि पाण्याचा होणारा दुरुपयोग टाळल्यास त्रास कमी होऊ शकतो. सद्यस्थितीत दोन दिवसाआड पाणी मिळायची शक्यता आहे. मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करता येणार नाही. त्यामुळे पुढील दोन महिने नळाच्या पाण्याचा वापर केवळ पिण्याच्या पिण्यासाठी करून उर्वरीत पाण्यासाठी विहिरीचे पाणी वापरावे. पाण्याचा दुरुपयोग होत असल्यामुळे आज बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी संयम ठेवून सर्वांना पाणी मिळेल यासाठी पुढाकार घेऊन पाण्याचा दुरुपयोग टाळावा.
- संजय मिरासे, सरपंच वरठी.

Web Title: Water sources hit; Extreme water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.