नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:46 AM2019-06-01T11:46:27+5:302019-06-01T11:47:01+5:30

भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे.

Waste water; The flow released from the project directly goes into the sand pit | नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

नासाडी पाण्याची; प्रकल्पातून सोडलेला प्रवाह जातो थेट रेतीच्या खड्ड्यात

Next
ठळक मुद्देवैनगंगा तीरावरील पाणीपुरवठा विहिरी कोरड्या

मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीपात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरत असल्याने वैनगंगा नदी तीरावरील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींमध्ये ठणठणाट झाला आहे. बावनथडी प्रकल्पाचे २० दलघमी पाणी सोडल्यानंतरही वैनगंगेचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. रेती उत्खननावर कोणतेही निर्बंध नसल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम पाणीपुरवठ्यावर होत आहे.
भंडारा जिल्ह्याची जीवनदायी वैनगंगा नदी तापत्या उन्हामुळे कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी तीरावरील गावात पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला आहे. आंतरराज्यीय प्रकल्प असलेल्या बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी नागरिक करीत होते. त्यावरून २३ एप्रिल ते १० मे पर्यंत बावनथडी प्रकल्पातून २० दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. परंतु या पाण्याचा हवा तसा फायदाच झाला नाही. प्रकल्पातून सोडलेले पाणी वैनगंगेच्या पात्रात सोडलेले पाणी रेती उत्खननासाठी खोदलेल्या खड्ड्यातच जिरले. सध्या नदीपात्र पुन्हा वाळवंट झाले आहे.
कवलेवाडा बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या बॅरेजमधून तिरोडा तालुक्यातील अदानी वीज प्रकल्प आणि सिंचन प्रकल्पाला पाणी देण्यात येते. उन्हाळ्यात बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील गावांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. बावनथडी नदी बपेराजवळ वैनगंगेला येवून मिळते. कोरड्या पडलेल्या नदीपात्रात धरणातून पाणी विसर्ग केल्यानंतर कोरडी नदी पाणी गिळंकृत करीत आहे. रेती उपस्याच्या खड्ड्यात पाणी भरले जात आहे. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचतच नाही. पावसाळा लांबल्यास वैनगंगा नदीतिरावर असलेल्या पाणीपुरवठा योजना बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईला रेती उत्खननही कारणीभूत असल्याचे या प्रकाराने सिद्ध होत आहे. मात्र कुणीही या गंभीर विषयाकडे पहायला तयार नाही.

बावनथडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. २० दलघमी पाणी सोडण्यात आले. परंतु आता बावनथडी प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यानंतर पाण्याचा विसर्ग केला जावू शकत नाही.
-आर. आर. बडोले, अभियंता, बावनथडी प्रकल्प, तुमसर.

Web Title: Waste water; The flow released from the project directly goes into the sand pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.