गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 09:45 PM2018-04-22T21:45:31+5:302018-04-22T21:45:31+5:30

अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, ....

Release of Gobarwahi Water Supply Scheme | गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

गोबरवाही पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

Next
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : डिसेंबरपासून कृषीपंपाला ९ ते ५ दरम्यान वीजपुरवठा करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अनेक प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व गावातील नळ योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे अडचणीत येतात. यावर उपाय म्हणून शासनाने सौर ऊर्जेचा पर्याय शोधला असून भंडारा जिल्ह्यातील सर्व नळ योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नळ योजना सौर ऊर्जेवर आणल्यामुळे ग्रामपंचायतला वीज देयक अदा करण्याची गरज राहणार नाही व परिणामी नळ योजना सुरळीतपणे सुरू राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत आलेसूर येथे आयोजित गोबरवाही व २१ गावे पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. चरण वाघमारे होते. गोबरवाही पाणीपुरवठा योजनेचे पालकमंत्री यांचे हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले.
यावेळी तुमसर पंचायत समिती सभापती रोशनाताई नारनवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, जिल्हा परिषद सदस्य संगिता सोनवणे, शुभांगी रहांगडाले, संदीप टाले, संगिता मुंगूसमारे, पंचायत समितीचे सदस्य गुरुदेव भोंडे, सरिता गऊपाले, शेखर कोटपल्लीवार, मुन्ना पुंडे, जितेंद्र मरकाम, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, साधना चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, आलेसुर सरपंच गोपिका मेहेर, व विविध ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
रोंघा, पिटेसूर, गोंडीटोला, चिखली, देवणारा, गर्रा (बघेडा), पाथरी, चिंचोली, पवनार, पवणारखारी (हमेशा), गोबरवाही, आलेसूर, सितासावंगी, चिखला, डोंगरी (बु), राजापूर, नाकाडोंगरी, गोवारीटोला, बाजारटोला, लोहारा (स्वतंत्र) व लोभी (स्वतंत्र) या गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
गोबरवाही पाणीपुरवठा योजना २३.५५ कोटींची असून या कामास आॅगस्ट १९९८ मध्ये मंजुरी मिळाली होती. ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे गोबरवाही सह २१ गावे व ६ वाड्यांची पाण्याची समस्या मार्गी लागली आहे. बंद पडलेली गोबरवाही पाणीपुरवठा योजना आमदार चरण वाघमारे यांच्यामुळे सुरू झाल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. गावकऱ्यांनी ही योजना चांगल्या प्रकारे टीकवावी, असे ते म्हणाले. गोबरवाही सह सर्व योजना सौर ऊर्जेवर आणण्यात येतील. ग्रामपंचायतला वीज देयकाचा भार सहन करावा लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एक शेतकरी एक रोहित्र’ ही योजना आणली असून यामुळे शेतीच्या विजेचा प्रश्न सुटणार आहे. तसेच डिसेंबरपासून शेती पंपाला सकाळी ९ सायंकाळी ५ या दरम्यान वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वीज जोडणीसाठी सौभाग्य योजना आणली असून एकही घर वीज कनेक्शन वाचून राहता कामा नये असे ते म्हणाले.
महिलांची कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून यासाठी आधुनिक यंत्र सामुग्री पुरविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. या भागातील झुडपी जंगलाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९९८ ला या योजनेचे भूमीपूजन झाले होते तेव्हापासून या योजनेकडे दूर्लक्ष होते. आपण यासाठी सतत पाठपुरावा केला, बैठका घेतल्या. पालकमंत्री यांनी यात लक्ष घातले आणि या कामाला दिशा मिळाली. आज लोकार्पण होत आहे ही बाब या भागाच्या विकासाला गती देणारी असल्याचे चरण वाघमारे यांनी सांगितले. बावनथडीच्या पाण्यापासून १२ गाव वंचीत आहेत. हा प्रश्न मार्गी लागल्यास या गावांना मोठा दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. लाखो शेतकºयांना न्याय दिला असेही ते म्हणाले. पालकमंत्री दर शनिवारी जिल्ह्यात येतात, बैठका घेतात, प्रश्न मार्गी लावतात ही विकासाला गती देणारी बाब आहे.या भागातील वीजेच्या समस्या आहेत, त्या सोडवाव्यात अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यकारी अभियंता चंद्रिकापूरे यांनी केले. संचालन डॉ. शांतीलाल लुंगे यांनी केले. या कार्यक्रमास परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Release of Gobarwahi Water Supply Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.