संतप्त जमावाने तीन टिप्पर पेटविले

By admin | Published: June 23, 2017 12:18 AM2017-06-23T00:18:12+5:302017-06-23T00:18:12+5:30

शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले.

The angry mob has blazed three tips | संतप्त जमावाने तीन टिप्पर पेटविले

संतप्त जमावाने तीन टिप्पर पेटविले

Next

बोरगाव येथील घटना : भरधाव टिप्परने विद्यार्थिनीला चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी/विरली/आसगाव/पालोरा : शिकवणी वर्ग आटोपून सायकलने घरी परतणाऱ्या एका विद्यार्थिनीला रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. ही घटना लाखांदूर-पवनी मार्गावरील बोरगाव येथे गुरूवारला दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त जमावाने रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर पेटविले. यावेळी पोलीस व्हॅन आणि अग्निशामक दलाच्या वाहनावरही जमावाने दगडफेक करून रोष व्यक्त केला.
प्राची मोतीराम मांडवकर (१६) रा.मांगली (चौ) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती आसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. आसगाव येथून खासगी शिकवणी वर्ग आटोपून ती आपल्या तीन मैत्रिणीसह सायकलने मांगलीला परत येत होती. दरम्यान इटान रेती घाटातून रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने (क्र.एमएच ४० वाय ९५१२) मांगली फाट्यावर तिला चिरडले. यात तिच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. तिचा मेंदू घटनास्थळापासून २५ फूट अंतरावर जावून पडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी दुचाकीचा टिप्परचा पाठलाग करून आसगावजवळ टिप्पर अडविला. त्यानंतर संतप्त जमावाने हा टिप्पर पेटविला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी या मार्गाने रेती वाहतूक करणारे अन्य दोन टिप्पर अडवून त्यांनाही पेटविले. अपघाताची माहिती मिळताच पवनीचे ठाणेदार सुनील ताजने हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी पोलीस वाहनावर दगडफेक करून रोष व्यक्त केला. यावेळी आलेले अग्निशमन दलाचेही वाहन ग्रामस्थांच्या रोषाला बळी पडले. शेवटी पोलिसांची वाढीव कुमक मागवून संतप्त ग्रामस्थांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पवनीचे तहसिलदार कोकार्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिटकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातामुळे लाखांदूर-पवनी मार्गावरील वाहतूक सुमारे ५ तास ठप्प होती. संतप्त ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे घटनास्थळावरून मृतदेह उचलू देण्यासाठी ग्रामस्थांनी नकार दर्शविला होता. सायंकाळी ५.३० पर्यंत घटनास्थळी तणावाची स्थिती होती. आ. रामचंद्र अवसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १ लाख रूपयांचा धनादेश दिला. आणि वैयक्तिक १ लाख रूपये मदत करण्याची घोषणा आ.अवसरे यांनी केली. त्यानंतर माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत मृतदेह उचलण्यात आला.
रेती घाट बंद करा
या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेविरूद्ध तीव्र असंतोष खदखदत होता. ग्रामस्थांनी या परिसरातील इटान, इसापूर, उमरी (चौ.) हे रेती घाट बंद करावे. मृताच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावी आणि पवनीचे तहसीलदार व ठाणेदार यांना निलंबित करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी रास्ता रोको करून मृतकाच्या कुटुंबीयांना २५ लाख रूपये आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

दोन महिन्यांमध्ये पाच बळी
लाखांदूर-पवनी मार्गावर रात्रंदिवस चालणाऱ्या ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर अपघातामुळे आजवर अनेकांचा बळी गेला आहे. तुमसर तालुक्यातील चारगावसह अन्य रोतीघाटांवर रेतीची खुलेआम चोरी सुरू आहे. लिलावादरम्यान घातलेल्या अटी आणि शर्थीचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. महिनाभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील विरली (बुज) येथील सुनिता महावाडे या महिलेचा टिप्परने बळी घेतला. त्यानंतर दोन दिवसातच पवनी-अड्याळ मार्गावर लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांचा टिप्परच्या धडकेने घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आठ दिवसातच सिंदपुरी फाट्यावर कामाक्षीअम्मा रामसागर रा.कोंढा (कोसरा) या महिलेचा टिप्परच्या मागील चाकात दबल्या गेली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातात त्यांचे पती गंभीररीत्या जखमी झाले होते. आणि आज गुरूवारला प्राची मांडवकर या शाळकरी मुलीचा टिप्परने बळी घेतला. मागील दोन महिन्यात रेती वाहतुकीने याच मार्गावर चार बळी घेतले. आतातरी कुणी पुढाकार घेणार की नाही, प्रशासन जागे होणार की नाही, रेतीची ही वाहतूक आणखी किती बळी घेणार? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

Web Title: The angry mob has blazed three tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.