दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:57 PM2024-01-24T13:57:11+5:302024-01-24T13:58:07+5:30

रामलला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या डोक्यावर ठेवलेला मुकुट आपण पाहिला, यामागील सद्भावना काय ते जाणून घेऊ. 

Why is a crown placed on the head of the devotees as a blessing from the god in the southern temple? Read on! | दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

दक्षिणेतील मंदिरात देवाचा आशीर्वाद म्हणून भक्तांच्या डोक्यावर मुकुट का ठेवला जातो? वाचा!

>>  मकरंद करंदीकर

दत्त संप्रदाय, वैष्णव, गुरुपरंपरा यामध्ये प्रत्यक्ष मूर्तीइतकेच त्या त्या दैवताच्या पदकमलांना, पादुकांना खूप महत्व असते. पुरुषसूक्तात जरी " ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् " अशी उपमा दिली असली तरी जगातील कुठलाही हिंदू हा देवाच्या मुखाला हात लावून नमस्कार करीत नाही. परंतु  " पद्भ्यां शूद्रो अजायत " अशी उपमा दिलेल्या पायांनाच हात लावून, पायांवर डोके ठेवूनच नमस्कार केला जातो. परमेश्वर, गुरु, ज्येष्ठ व्यक्ती, विद्वान, संन्यासी यांनाही पदस्पर्श केला जातो. 

नुकतीच अतिभव्य, एकमेवाद्वितीय अशा सोहोळ्यात अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विष्णू, लक्ष्मी,दत्तात्रेय आणि राम यांच्या भक्तीमध्ये पादुकांना खूप महत्व आहे.  विष्णू, लक्ष्मी पदकमले ही  हिंदूंच्या नित्यपूजेतही आढळतात. रामायणामध्ये वनवासाला गेलेल्या रामाच्या चरण पादुका, भरताने आपल्या डोक्यावरून अयोध्येत आणल्या. त्या पादुका रामाच्या मुकुटावर ठेऊन, त्याच्या नावे राज्य केले. 

भारतामध्ये विशेषतः दक्षिण भारतातील विष्णू आणि रामाच्या कांही मंदिरात तुम्ही दर्शन घेतल्यावर, तेथील पुजारी, तुम्हाला तुळशीपत्र आणि कापूर असलेले तीर्थ देतो. त्यानंतर एका कोरीव तबकात ठेवलेला, तितकाच सुंदर कोरीव मुकुट, स्त्री पुरुष भक्तांच्या डोक्यावर क्षणभर टेकवतो. यामुळे भक्ताला कृतकृत्य वाटते. या मुकुटावर दोन पादुका व आतील बाजूला दोन पदचिह्ने असतात. ती पदचिह्ने बरोबर तुमच्या डोक्याच्या मध्यावर, ( मेंदूच्या वर ) सहस्रधार चक्रावर  येतात. हा मुकुट  चांदी किंवा तांब्यामध्ये केला जातो. आरती, पूजा, अभिषेक अशा विविध वेळी जेव्हा देवासमोर धूप अर्पण केला जातो तेव्हा हा मुकुट त्या धुरावर धरून त्याचे एक प्रकारे निर्जंतुकीकरण केले जाते. दक्षिणेत याला सद्गोपम, सादरी, पादुकलु अशी विविध नावे आहेत.   

सोबतचे सर्व फोटो हे तेलंगणामधील माझे फेसबुक मित्र श्री, वाय.के. मूर्ती यांच्या "वाय के अँटीक होम म्युझियम", त्यांच्या सौजन्याने देत आहे. सध्या सुरु असलेल्या राम दीपावली निमित्त एका वेगळ्या पद्धतीची ही थोडी माहिती ! 

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे। रघुनाथाय नाथाय सीताया: पतये नम:॥

( सदर लेख व फोटो शेअर केल्यास लेखकाच्या नावासह करावी! )

Web Title: Why is a crown placed on the head of the devotees as a blessing from the god in the southern temple? Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.