माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:42 PM2018-02-09T14:42:56+5:302018-02-09T14:43:27+5:30

शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

qustion unsolved about Weekly market place in Majalgaon; Forget the assertions that the leaders fell | माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

माजलगावात आठवडी बाजाराच्या जागेचा प्रश्न अधांतरीच; नेत्यांना पडला आश्वासनांचा विसर 

googlenewsNext

-  पुरूषोत्तम करवा

माजलगाव  (बीड ) : शहरातील आठवडी बाजाराच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नगर परिषदेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला होता. मात्र आता या प्रश्नाचा सर्वच नेत्यांना  विसर पडल्याची स्थिती आहे. यामुळे आठवडी बाजारासाठी येणारे शेतकरी, व्यापारी व शहरवासियांना मोठा त्रास होत असून याचा थेट परिणाम शहराच्या बाजार पेठेवर होत आहे.

शहरात तीस वर्षांपूर्वी हनुमान चौक भागात आठवडी बाजार भरत असे. वाढती नागरी वस्ती व अपुरी जागा यामुळे हा आठवडी बाजार काही राजकीय मंडळींनी गजानन मंदिर रोडवर हलवला. मात्र, या भागातील नागरिकांना बाजाराचा मोठा त्रास होत असल्यामुळे त्यांनी बाजार येथून हलविण्याची नगर पालिकेस विनंती केली. पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी सामाजिक कार्यकर्ते जगदीश साखरे यांनी या विरुद्ध न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने या भागात बाजार भरवू नये असे आदेश दिले. यानंतर मनूर रोड व तेथून बीअँडसी रोड असा बाजाराच्या जागेचा प्रवास झाला आहे. 

बाजार निवडणुकीचा विषय 
आठवडी बाजाराच्या प्रश्नावर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून नगर पालिका निवडणूक लढल्या जात आहेत. मात्र निवडणूक संपताच हा विषय थंड बसत्यात जातो. विधानसभा निवडणुकीत आमदार आर. टी. देशमुख यांनी हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच दीड वर्षापूर्वी पालिका निवडणुकीत देखील विविध राजकीय पक्षांनी या प्रश्नाचे भांडवल केले. मात्र अद्याप कोणीही हा प्रश्न सोडविला नाही. 

अर्धा बाजार झाला स्थलांतरित 
जागेचा प्रश्न सुटत नसल्याने सध्याच्या ठिकाणी निम्मा देखील बाजार भरत नाही. यामुळे अर्धा बाजार तर केसापुरी कॅम्प येथे स्थलांतरित झाला आहे. याचा परिणाम शहराच्या बाजार पेठेवर झाला आहे. आजूबाजूच्या जवळपास 50 खेड्यातील नागरिक बाजारामुळे शहराच्या संपर्कात होते त्यांचे शहरात येणे आता कमी झाले आहे. यामुळे बाजारपेठ बकाल पडत आहे.

जनविकास आघाडीला पडला विसर
बाजाराच्या जागेच्या प्रश्नावरून निवडणुकी आधी मोहन दादा जगताप मित्रमंडळाने आंदोलने केली. यानंतर त्यांनी जनविकास आघाडीतून निवडणूक लढवली. बाजार प्रश्नावरील आंदोलनाचा यात त्यांना फायदा झाला व ते सत्तेत आले. मात्र आता त्यानाही या प्रश्नाचा विसर पडला आहे.

जागेचा शोध सुरु आहे 
शहरातील बाजारासाठी कायमस्वरूपी जागेचा शोध घेतला  जात आहे. लवकरच जागा उपलब्ध होईल.
- सहाल चाऊस, अध्यक्ष, नगर परिषद

Web Title: qustion unsolved about Weekly market place in Majalgaon; Forget the assertions that the leaders fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.