lok sabha election 2019 : मैदानात उतरण्यापूर्वीच राष्ट्रवादीचा ‘सिंह’ घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:54 PM2019-03-19T20:54:01+5:302019-03-19T20:54:09+5:30

सर्वांनी मिळूनच बजरंग सोनवणे यांना लोकसभा उमेदवारीच्या घोड्यावर बसवून स्वत:ची सुटका करून घेतली, या चर्चेला बळ मिळत आहे. 

lok sabha election 2019: Before the lok sabha election NCP's Amarsinha pandit returned | lok sabha election 2019 : मैदानात उतरण्यापूर्वीच राष्ट्रवादीचा ‘सिंह’ घायाळ

lok sabha election 2019 : मैदानात उतरण्यापूर्वीच राष्ट्रवादीचा ‘सिंह’ घायाळ

googlenewsNext

- सतीश जोशी 

बीड : बीड लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात उतरण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘सिंह’ घायाळ झाला. जवळपास महिनाभरापासून लढाईची तयारी करीत असलेल्या अमर‘सिंहा’च्या गर्जनांनी सारा आसमंत दणाणून जात होता. त्यामुळे ही लढाई काट्याचीच होणार, अशी चर्चा सर्वत्र होत होती. ऐनवेळी बजरंग सोनवणे यांची जाहीर झालेली उमेदवारी संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का देणारी आहे.

भाजपाच्या डॉ.प्रीतम मुंडेंना कडवी लढत देणारा उमेदवार म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे बघितले जात होते. लढतीसाठी लागणाऱ्या सर्व काही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. विशेष म्हणजे समर्थक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे पाठबळ तगडे होते. माजी मंत्री सुरेश धसांनी जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या किल्ल्यास भगदाड पाडलेले असतानाही अमरसिंह पंडित यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या साथीने पक्षास सावरण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांचा भाजपाशी वाढणारा घरोबा पक्षकार्यास अडथळा ठरत असतानाही जयदत्त यांचे पुतणे संदीप आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना सोबत घेऊन पक्षबांधणीचा प्रयत्न केला. लोकसभेसारखी मोठी निवडणूक लढविण्यास सकृतदर्शनी तरी त्यांची तयारी दिसत होती. शरद पवारांनी आदेश दिला तर सर्व ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरू अशी गर्जना देखील त्यांनी वेळोवेळी केली होती. मग पवारांनी आदेश का दिला नाही?, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या पारड्यात का उमेदवारी टाकली, असे किती तरी प्रश्न आहेत.

कोणीच तयार नव्हते
जवळपास वर्षभरापासून पंडित बंधूंचा फोकस हा विधानसभेवरच दिसत होता. हीच स्थिती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची परळी विधानसभा मतदारसंघात होती. धनंजय मुंडेंनी तर लोकसभेस स्पष्टच नकार दिला होता. आणखी एक सहकारी नेते प्रकाश सोळंके यापूर्वी भाजपाकडून लोकसभा लढविताना पराभूत झाले होते. राष्ट्रवादीचे एकमेव स्थानिक आमदार जयदत्त क्षीरसागर यांची भूमिका अजूनही तळ्यात-मळ्यात असून ते लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. मग उमेदवार तरी कोणता द्यायचा, हा प्रश्न या सर्वांनाच पडला असावा? थोडक्यात काय, तर सर्वांनी मिळूनच बजरंग सोनवणे यांना लोकसभा उमेदवारीच्या घोड्यावर बसवून स्वत:ची सुटका करून घेतली, या चर्चेला बळ मिळत आहे. 

लोकसभे पाठोपाठ विधानसभा 
लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांतच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होते. अमरसिंह पंडित यांच्या गेवराई विधानसभा मतदारसंघात त्यांचे बंधू तथा बीड जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित हे तयारी करत आहेत. एका लोकसभा निवडणुकीतच सर्वार्थाने एवढी दमछाक होते की, त्यानंतर सहा महिन्यांतच विधानसभेच्या रिंगणात उतरणे त्यांना कदाचित जोखमीचे वाटले असावे. 

Web Title: lok sabha election 2019: Before the lok sabha election NCP's Amarsinha pandit returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.