द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:20 AM2018-11-25T00:20:28+5:302018-11-25T00:23:01+5:30

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायाने साश्रू नयनांनी ‘बाबूजी अमर रहे’ च्या घोषणा देत अखेरचा निरोप दिला.

Last message to Lakhia Dwarkadas Lohia | द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Next
ठळक मुद्देसंघर्षाची तोफ थंडावली : इच्छेनुसार करण्यात आला दफनविधी

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायाने साश्रू नयनांनी ‘बाबूजी अमर रहे’ च्या घोषणा देत अखेरचा निरोप दिला.
डॉ. द्वारकादास लोहिया यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ही वार्ता धडकताच अंबाजोगाई शहर व परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्याकुंज कॉलनी परिसरातील निवासस्थानापासून फुलांनी सजवलेल्या वैकुंठ रथातून निघाली. ही अंत्ययात्रा शिवाजी चौक, गुरुवार पेठ, मंडीबाजार, मंगळवारपेठ, बसस्थानक, प्रशांत नगर, सायगाव नाका मार्गे मानवलोकच्या प्रांगणात पोहोचली. ठिकठिकाणी डॉ. लोहिया यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी आपले व्यवहार बंद ठेवले होते. मानवलोकच्या परिसरातही अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. डॉ. लोहिया यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी लोहिया परिवारासह नातेवाईक, मानवलोकचे जुने कार्यकर्ते व राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, परळीचे तहसीलदार शरद झाडके, आ. संगीता ठोंबरे, बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आ. उषा दराडे, माजी आ. प्रा. सुनील धांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अ‍ॅड. अनंतराव जगतकर यांच्यासह विविध स्तरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पिंपळाचे झाड लावा’
डॉ. द्वारकादास लोहिया यांनी आपल्या मृत्यूनंतर माझ्यावर अग्निसंस्कार न करता मातीशी समरस होण्यासाठी दफनविधी करावा व दफनविधी झाला त्या ठिकाणी पिंपळाचे झाड लावावे. असा मनोदय आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त केला होता. त्यांच्या या अंतिम इच्छेनुसार त्यांचा दफन विधी करण्यात आला.
कुटुंबातील मुलींनीही दिला खांदा
डॉ. लोहिया यांचे पार्थिव मानवलोकच्या प्रांगणात आल्यानंतर उपस्थितांसोबत त्यांच्या परिवारातील मुली, सुना व नाती अशा सर्व महिला सदस्यांनी डॉ. लोहिया यांना खांदा देत स्त्री-पुरुष समानतेची त्यांची शिकवण अंगिकारली.

Web Title: Last message to Lakhia Dwarkadas Lohia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.