जायभायवाडी, कोळपिंप्री बनले जलक्रांतीसाठी प्रेरणादायी‘मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 04:36 PM2018-03-08T16:36:54+5:302018-03-08T16:37:52+5:30

वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.

Jhababwadi, Kolpimpri became inspirational 'Model' for water revolution | जायभायवाडी, कोळपिंप्री बनले जलक्रांतीसाठी प्रेरणादायी‘मॉडेल’

जायभायवाडी, कोळपिंप्री बनले जलक्रांतीसाठी प्रेरणादायी‘मॉडेल’

googlenewsNext

- अनिल महाजन 

धारुर ( बीड ): तालूक्यात वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. या दोन पाणीदार झालेल्या गावातील कामे पाहण्यासाठी रोज जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील नागरिकांच्या सहली येत आहेत. या गावातील काम पाहून थक्क होत आपल्या गावात परिवतर्नाची संधी समजून गाव दुष्काळमुक्त व पाणीदार करण्याचा संकल्प करीत आहेत.

धारूर तालुक्याचा समावेश गतवर्षी वॉटर कप स्पर्धेत झाला. तालुक्यातील ४० पेक्षा जास्त गावे स्पर्धेत उतरली व सात ते आठ गावात चांगले काम झाले. जायभायवाडी हे डोंगराच्या कुशीत असलेले गाव. या गावाची ऊसतोड कामगाराचं व दुष्काळी गाव म्हणून ओळख. पाऊस पडल्यावर एक पीक घ्यायचे व पुन्हा सहा महिने घर, गाव सोडून ऊस तोडायला जायचे. अनेक वर्षापासूनची ही दिनचर्या. विकासापासून कोसो दूर अशी अवस्था असणारे दुर्लक्षित गाव .गतवर्षी पाणी फांऊडेशनची वॉटर कप स्पर्धा या भागासाठी आली. ही स्पर्धा परिवर्तनासाठी मोठी संधी ठरली. गावात जलक्रांतीची चळवळ निर्माण झाली. गावकर्‍यांनी एकजुटीने श्रमदान केले तर ज्ञानप्रबोधनी, भारतीय जैन, मानवलोक, तालुका पत्रकार संघ यांनी शहर व परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या गावातील चळवळीला मोठी मदत केली. या गावात थेंबन् थेंब पाणी जमिनीत कसे मुरेल यावर काम झाले.

या गावाला पाणीदार करण्यासाठी पाणी फांऊडेशनचे अविनाश पौळ, शेख इरफान, संतोष शिनगारे, बापू लुंगेकर, नितीन पाटूळे यांचे सातत्याने मिळालेले मार्गदर्शन यामुळे तसेच मानवलोकचे अनिकेत लोहीया, ज्ञानप्रबोधनीचे प्रसाद दादा चिक्षे, अभिजीत जोंधळे  यांचे मिळालेले विशेष सहकार्य, चित्रपट निर्माते संतोष जेव्हीकर, ज्ञानप्रबोध डोंबिवली यांचे मिळालेले आर्थिक सहकार्य यामुळे चळवळीला हजारो हातांची मिळालेली साथ यातून गावाला परिवतर्नाची दिशा मिळाली. या गावाने स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळवत इतिहास रचला. गाव पाणीदार होऊन हा डोंगरपट्टा हिरवागार झाला. या भागाला परिवर्तनाची वाट दाखवण्याचे काम या गावाने केले. 

यावर्षी या गावातील काम पाहण्यासाठी विविध गावांचे नागरिक येत आहेत. डॉ. सुंदर जायभाये यांनी या परिवर्तनाचा इतिहास घडवण्यासाठी व गावाला एकजूट करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे शब्दात वर्णन करता येणार नाही असे आहेत.  माथा ते पायथा केलेले पाणी उपचार पाहण्यासारखे आहेत. डिप सी. सी. टी, सी. सी. टी मातीनाला बांध इ. कामे पाहण्यासारखी आहेत. डोंगरीभागात कसे काम करावे यांचे आदर्श मॉडेल जायभायवाडी आहे, तर सपाटीकरणाच्या गावात कसे काम केले पाहिजे, याचे आदर्श मॉडेल कोळपिंप्री हे गाव आहे. नाला खोलीकरण, बांध बंदिस्ती आदी कामे पाहण्यासारखी आहेत. या गावाने गतवर्षी केलेल्या कामामुळे हे गाव जानेवारी महिन्यात टँकर लावावे लागणारे गाव यावर्षी पाणीदार होऊन टँकरमुक्त झाले आहे. 

गाव पाणीदार  करण्याची मिळते प्रेरणा

यावर्षी वॉटर कपमध्ये सहभागी होणारे जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील नागरिक या दोन्ही गावातील काम पाहण्यासाठी भेटी देऊन झालेल्या कामाची करीत आहेत. आपल्या गावात यापेक्षा जोरदार काम करण्याची प्रेरणा घेऊन जात आहेत. धारुर तालुक्यातील ५८ गावांनी या वर्षी सहभाग घेतला असून दुष्काळमुक्तीची व तालूका पाणीदार करण्याची चळवळ जोर धरत आहे.
 

Web Title: Jhababwadi, Kolpimpri became inspirational 'Model' for water revolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.