बीडच्या जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा छान; मात्र सुरक्षा रक्षकांकडून वागणूक तुच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 04:17 PM2018-12-08T16:17:40+5:302018-12-08T16:18:20+5:30

सेवा चांगली मिळत असली तरी येथे येणाऱ्यांना मात्र सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की व अरेरावी केली जात असल्याचे समोर आले आहे.

Health service in Beed district hospital is good; but the behavior of the security guards is trivial | बीडच्या जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा छान; मात्र सुरक्षा रक्षकांकडून वागणूक तुच्छ

बीडच्या जिल्हा रूग्णालयात आरोग्य सेवा छान; मात्र सुरक्षा रक्षकांकडून वागणूक तुच्छ

googlenewsNext

बीड : सुरक्षा रक्षकांच्या दादागिरीमुळे जिल्हा रूग्णालय पुन्हा एकदा बदनाम झाले आहे. येथे जरी आरोग्य सेवा चांगली मिळत असली तरी येथे येणाऱ्यांना मात्र सुरक्षा रक्षकांकडून धक्काबुक्की व अरेरावी केली जात असल्याचे समोर आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना आणि वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतरही अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मागील काही महिन्यात जिल्हा रूग्णालयातील आरोग्य सेवेतील कारभार सुधारला आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला रूग्ण व नातेवाईकांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले रक्षकच आता त्यांना धक्काबुक्की करू लागले आहेत. वास्तविक पाहता या रक्षकांना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अरेरावी किंंवा धक्का लावण्याचा कसलाच अधिकार नाही, मात्र दादागिरी करीत व सर्वसामान्यांच्या शांततेचा फायदा घेत येथील रक्षक त्यांना धक्काबुक्की करतात. एवढेच नव्हे तर येथील महिला रक्षकही पुरूषांना धक्काबुक्की व अरेरावी करतात. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्यांना अपमान सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे यापूर्वी असे प्रकार घडल्याचे लोकमतने समोर आणले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी यावर कसलीच कारवाई केली नाही. त्यामुळे या रक्षकांचे मनोधैर्य वाढले असून दिवसेंदिवस त्यांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यांच्या या वर्तनुकीमुळे जिल्हा रूग्णालयाची प्रतिमाही मलीन होत चालली आहे. त्यामुळे या रक्षकांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी दुसरे कर्मचारी नियूक्त करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी संपर्क साधण्यात आला, मात्र त्यांनी भ्रमणध्वनी न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही.

पासचे केवळ अश्वासनच
रूग्णालयात पास सुविधा उपलब्ध करून रूग्णाच्या नातेवाईकांना दिली जाणार होती. प्रत्येक रूग्णाजवळ एकच नातेवाईक रहावा आणि गर्दी कमी होऊन उपचारही चांगले करता यावेत, या उद्देशाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी ही संकल्पना सुचविली होती. मात्र त्यांचे हे केवळ अश्वासनच राहीले आहे. महिना उलटूनही अद्याप पासची सुविधा उपलब्ध झालेली नाही. 

ते गरीब आहेत, त्यांना सन्मान द्या..
जिल्हा रूग्णालयात येणारा जवळपास रूग्ण हे गरीब कुटूंबातील असतात. त्यांना जास्त माहिती नसते. त्यामुळे ते आत जाण्याची घाई करतात. मात्र येथील रक्षक त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना धक्काबुक्की करीत बाहेर काढतात. त्यांना कसलीच माहिती देत नाहीत. त्यामुळे या नागरिकांमध्ये रूग्णालयाबद्दल संताप निर्माण होतो. त्यामुळे या रक्षकांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महिला रक्षक उगारतात दंडुका
येथील महिला रक्षकही पुरूषांवर दंडुका उगारतात. त्यांना धक्काबुक्की करतात. प्रसुती विभाग व मुख्य प्रवेशद्वारावर असे प्रकार नेहमी पहावयास मिळतात. दिवसेंदिवस हे प्रकार वाढत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून प्रतीमा मलीन होत चालली आहे.

Web Title: Health service in Beed district hospital is good; but the behavior of the security guards is trivial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.