Chimukulas sitting in front of the house crashed | घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीस बसने चिरडले
घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीस बसने चिरडले

परळी : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला रा.प.मच्या बसने धडक दिली. यामध्ये चिमुकली समोरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाली. ही घटना परळीत तालुक्यातील मांडखेल येथे रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध परळी ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्वरा वाव्हुळे (वय ४ वर्ष, रा. मांडखेल ता.परळी) असे मयत चिमुकलीचे नाव आहे. रविवारी चार वाजता स्वरा ही घरासमोरील अंगणात खेळत होती. याच दरम्यान परळी-मोहा (एमएच २० बीएल ००६७) बस घरासमोरुन जात होती. मुलगी खेळत असताना अचानक बससमोर आली. यामध्ये समोरील चाकाखाली चेंगरुन तिचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दरम्यान मुलीचे आजोबा लिंबाजी रामभाऊ वाव्हुळे यांच्या फिर्यादीवरून बसचालक दगडू किरवले (रा. नाथ्रा ता. परळी) विरुद्ध ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी बससह चालकास ताब्यात घेतले आहे. तपास सहायक फौजदार जाधवर हे करीत आहेत.


Web Title: Chimukulas sitting in front of the house crashed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.