Cage's Vasudev Shastri judicial custody | केजच्या वासुदेव शास्त्रीला मथुरा येथे न्यायालयीन कोठडी

ठळक मुद्देउत्तरप्रदेशातील वृंदावन (उत्तरप्रेदश) पोलीस ठाण्यात शिष्य म्हणून सोबत घेऊन गेलेल्या दोन महाराष्ट्रीयन तरुणीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी वासुदेव शास्त्रीविरुद्ध गुन्हा . गुरूवारी पीडित दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी मथुरा येथील जिल्हा महिला रुग्णालयात करण्यात आली.नंतर वासुदेव शास्त्री यास मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

केज (जि. बीड) : तालुक्यातील लव्हुरी येथील लालगिरी मठ संस्थानचा मठाधिपती वासुदेव शास्त्री याला गुरूवारी मथुरा येथील मध्यवर्ती जिल्हा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीे. मथुरा येथील जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली असल्याची माहिती उत्तर प्रदेशातील वृंदावन ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांनी शुक्रवारी दिली.

उत्तरप्रदेशातील वृंदावन (उत्तरप्रेदश) पोलीस ठाण्यात शिष्य म्हणून सोबत घेऊन गेलेल्या दोन महाराष्ट्रीयन तरुणीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी वासुदेव शास्त्रीविरुद्ध बुधवारी वृदांवन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. गुरूवारी पीडित दोन्ही तरुणींची वैद्यकीय तपासणी मथुरा येथील जिल्हा महिला रुग्णालयात करण्यात आली. त्यानंतर वासुदेव शास्त्री यास मध्यवर्ती जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. पिडीतेच्या नातेवाईकाचा शुक्रवारी मथुरा न्यायालयात इन कॅमेरा जवाब नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

उत्तर प्रदेशचे पोलीस लव्हुरीला येणार
लव्हुरी येथील लालगिरी मठाची झडती घेण्यासाठी व गावातील काही प्रमुखांचे जवाब नोंदविण्यासाठी उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील एक पोलीस उपनिरीक्षक आणि २ जमादार असे तिघांचे पथक केज तालुक्यातील लव्हुरी येथे लवकरच पाठवणार असल्याची माहिती वृंदावन पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांनी लोकमतशी बोलताना दिली.