ऐन दिवाळीत काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:41 AM2018-11-11T00:41:21+5:302018-11-11T00:41:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद ...

Accidents in the Diwali period | ऐन दिवाळीत काळाचा घाला

ऐन दिवाळीत काळाचा घाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ऐन दिवाळीत तीन अपघातात पाच जण ठार झाले तर बीडमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचा संशयास्पद मृत्यू झाला. गुढी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी या घटना घडल्या.
‘शिवशाही’च्या धडकेत
तरुणाचा मृत्यू />गेवराई : दिवाळी सणासाठी दुचाकीवरून स्वत:च्या गावाकडे निघालेल्या तरुणाचा भरधाव शिवशाही बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री बीड - गेवराई रोडवर पाडळसिंगी येथे झाला. केशव बाबासाहेब नागरे (वय ३३, रा. वाघलखेडा ता. अंबड, जि. जालना) असे मयत तरुणाचे नाव आहे. बारामती येथे एका कंपनीत कामाला असणारे केशव नागरे हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून (एमएच २१ एएम ८६५८) दिवाळी सणासाठी स्वत:च्या गावाकडे निघाले होते.
रात्री १० वाजता बीड - गेवराई मार्गावर पाडळसिंगी जवळ सोमाणी जिनिंगसमोर आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या शिवशाही बसने (एमएच ०६ बीडब्ल्यू १३१८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात केशव नागरे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गेवराई पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सततच्या अपघातांमुळे शिवशाही बससेवा वादाच्या भोव-यात सापडली आहे.
साखरेच्या ट्रकखाली दबून चौघे ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती कारखान्यातून साखरेची पोती घेऊन परभणीकडे जाणार ट्रक पलटी झाला. त्यामुळे साखरेच्या पोत्याखाली दबून दयानंद गणेश सोळंके (४०) संगीता दयानंद सोळंके (३६) राजनंदिनी दयानंद सोळंके (७) पृथ्वीराज दयानंद सोळंके (५) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास शहरापासून ३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील एच.पी. गोडावून जवळ घडली. या प्रकरणी चालक रुपेश फिरताराम यादवला ट्रकसह तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
सोळंके कुटुंब माजलगाव शहरात राहत होते. पाडव्यानिमित्त ते गंगामसला येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन माजलगावला येत होते. शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर एच.पी. गॅस गुडवून जवळ आले असता समोरून साखरेचे पोते घेऊन येणा-या ट्रक चालकाने कट मारला. यामुळे ट्रक (सी.जि.०८ए.सी./३३४१) पलटी झाला. याच ट्रकखाली सोळंके कुटूंब सापडले आणि चौघांचा पोत्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. तर इर्शाद उर्फ बाबु हे या अपघातात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील संत नामदेव नगर भागात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दाम्पत्यासह त्यांच्या चिमुकल्या मुलीचा यामध्ये समावेश आहे. पतीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले असले तरी पत्नी व मुलीच्या मृत्यूचे गुढ कायम असून पोलिसांनी शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवला आहे. तपासानंतर याचे गुढ उलगडणार असून याप्रकरणाची शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गणेश शिंदे (२६), शितल (२३) व श्रावणी (४) अशी मयतांची नावे आहेत. गणेश शिंदे हे आई-वडील, पत्नी व मुलीसह संत नामदेव नगर भागात वास्तव्यास आहेत. बीडमध्ये ते काम करायचे. पाडव्याच्या दिवशी सर्व कुटूंब जेवण करून आपापल्या खोलीत झोपले. सकाळी गणेश यांचे वडील सुर्यभान शिंदे हे उठले. बाजुलाच असलेल्या शेवग्याच्या झाडाजवळ त्यांना गणेश उभा असल्याचे दिसले. जवळ जावून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरड केली. त्यांनी घरात धाव घेत सुन शितलला आवाज दिला. मात्र घरातून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. आत जावून पाहिले असता शितल व नात श्रावणी हे दोघेही पलंगावर मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ परिसरातील लोकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि शिवलाल पुर्भे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. येथे शवविच्छेदन झाले. गणेशने आत्महत्या केल्याचे स्पष्ट असून शितल व श्रावणीचा व्हिसेरा राखीव ठेवला आहे. अहवाल आल्यानंतरच त्यांचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Accidents in the Diwali period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.