उपाशी पोटी धडपडणाऱ्या जिवांसाठी उभी राहिली ‘महिला धान्य बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:37 AM2019-06-05T11:37:55+5:302019-06-05T11:41:19+5:30

हजारो लोकांचे पोट भरण्यात यश 

'Women's Grain Bank' stands strongly for the hungers | उपाशी पोटी धडपडणाऱ्या जिवांसाठी उभी राहिली ‘महिला धान्य बँक’

उपाशी पोटी धडपडणाऱ्या जिवांसाठी उभी राहिली ‘महिला धान्य बँक’

googlenewsNext
ठळक मुद्देजालना जिल्ह्यात ‘मैत्र मांदियाळी’चा उपक्रम३५० महिला सदसस्या कार्यरत

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : कुठे पंचपक्वान्नाने भरलेले ताट, तर कुठे उपाशीपोटी झोपणारे जीव, अशी दोन टोके आपल्या अवतीभवती सहज दिसून येतात. खपाटीला गेलेले पोट, कृश बालके, असे विदारक चित्र त्यांना अस्वस्थ करून गेले. कोणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून त्यांनी मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान अंतर्गत महिला धान्य बँक सुरू केली. 

प्रत्येक उपाशी जिवापर्यंत अन्न पोहोचावे, या उद्देशाने जालना येथील मैत्र मांदियाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय किंगरे यांनी ‘धान्य बँक’ या योजनेची संकल्पना मांडली आणि प्रतिष्ठानच्या महिला कार्यकर्त्यांनी झपाटून काम करत अल्पावधीतच जालना जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. या उपक्रमाचा सर्व कारभार महिलांकडून पाहिला जातो, म्हणून ‘महिला धान्य बँक’ म्हणून हा उपक्रम ओळखला जातो. जालना जिल्ह्यात जानेवारी- २०१९ मध्ये या उपक्रमाला सुरुवात झाली असून, आजपर्यंत हजारो लोकांचे पोट भरण्यात सदस्यांना यश मिळाले आहे. या उपक्रमांतर्गत महिला धान्य बँकेच्या सदस्यांकडून आपापल्या परिसरातील किंवा ओळखीच्या महिलांना दर महिन्याला दोन किलो गहू देण्यासाठी आवाहन केले जाते. दोन किलो गव्हाची किंमत साधारणपणे ६० रुपये एवढी गृहीत धरून ज्यांना गहू द्यायचे असतील त्यांनी गहू किंवा ज्यांना पैसे द्यायचे असतील त्यांनी पैसे द्यावेत, असे सुचविले जाते. 

ग्रामीण जनतेनेही घेतली प्रेरणा 
या उपक्रमांतर्गत चालणारे काम पाहून जालना जिल्ह्यातील चंदनहिरा गावातील लोकांनी प्रेरणा घेतली असून, त्यांच्या गावातही धान्य बँकेला सुरुवात केली आहे.

३५० महिला सदसस्या कार्यरत
हा उपक्रम फक्त काही लोकांपुरता मर्यादित राहू नये म्हणून एका महिलेने कमीत कमी पाच महिलांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. सध्या या उपक्रमांतर्गत ३५० महिला सदस्य कार्यरत आहेत. ही संख्या १००० पर्यंत नेण्याचा मानस असल्याचे काही सदस्यांनी सांगितले. ३०० पेक्षाही अनेक कुटुंबे नियमितपणे या उपक्रमाशी जोडल्या गेले आहेत. 

5200 किलो धान्य जमा 
उपक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत धान्य बँकेने ५२०० किलो धान्य जमा केले आहे. यापैकी शांतीवन येथील दुष्काळी छावणीसाठी २१०० किलो तांदूळ पाठविण्यात आला असून, अन्नयज्ञ संस्थेला २५०० किलो धान्य पाठविण्यात आले आहे. गरजू कुटुंबांनाही जवळपास २०० किलो धान्य वाटप करण्यात आले आहे. जालनासोबतच महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधील दानशूर व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या गेल्या असून, अवघ्या महाराष्ट्रातूनच मदतीचा ओघ सुरू आहे. 

सर्वांचा चांगला प्रतिसाद 
मिळालेले गहू किंवा पैसे संकलित करून बँकेत जमा करण्यात येतात आणि नंतर ही मदत जालना येथील अन्नयज्ञ या संस्थेला दिली जाते. ६० रुपये प्रतिमहिना याप्रमाणे ७२० रुपये प्रतिवर्ष एवढी रक्कम देणे अनेकांना सहजशक्य असल्यामुळे या उपक्रमाला सुरुवातीपासूनच अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सदस्यांनी सांगितले. 

Web Title: 'Women's Grain Bank' stands strongly for the hungers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.