Three hours of recovery on recovery | वसुलीवर तीन तास गुºहाळ
वसुलीवर तीन तास गुºहाळ

ठळक मुद्देमनपा सर्वसाधारण सभा : मनपा आयुक्तांच्या खुलाशानंतर चर्चेवर पडदा, अनधिकृत टॉवर, ‘एलईडी’वरून नगरसेवक आक्रमक

औरंगाबाद : मालमत्ता कर वसुलीतील बेजबाबदारपणामुळे महानगरपालिका आर्थिक संकटात सापडली आहे. प्रशासकीय अधिकारी मालमत्ता कर वसुलीत हलगर्जीपणा करतात. त्यामुळे यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करीत नगरसेवकांनी मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले. नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मालमत्ता कर वसुलीवरच तब्बल तीन तास चर्चेचे गुºहाळ रंगले. मनपा आयुक्तांनी खुलासा केल्यानंतरच चर्चेवर पडदा पडला.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी थकीत बिलांच्या मुद्यावरून ठेकेदारांनी ठिय्या आंदोलन केले. यामुळे सभेच्या सुरुवातीलाच महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा मुद्दा उपस्थित झाला. नगरसेवक राजेंद्र जंजाळ, राजू शिंदे, राजगौरव वानखेडे, अंकिता विधाते यांनी मनपाचे मालमत्ता कर उद्दिष्ट, त्याची प्रत्यक्ष होणारी वसुली यासंदर्भात विचारणा केली. यावेळी नगररचना अधिकारी जयंत खरवडकर यांनी मनपाचे ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, त्यापैकी ८८.३९ कोटी रुपयांची म्हणजे १९.६७ टक्के वसुली झाल्याची माहिती दिली. त्यावर जंजाळ यांनी यात चालू आणि गतवर्षीची थकबाकी किती, असा सवाल केला. ज्या वॉर्डांमध्ये चांगली वसुली आहे, तेथेच विकासकामे करण्याचा निर्णय घ्यावा. मनपाच्या लाखो रुपयांच्या मालमत्ता ४० ते ५० रुपये भाड्याने दिल्या आहेत. शहरातील अनधिकृत टॉवरवर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला पाहिजे, असा मुद्दाही त्यांनी मांडला. अनधिकृत टॉवरकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे राजू शिंदे यांनी सांगत नागरिकांचा विरोध असलेल्या भागातील टॉवर काढण्यात यावेत, अशी मागणी केली. १ हजार २३ बांधकाम परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. त्यात केवळ ४४५ जणांनी भोगवटा प्रमाणपत्र घेतल्याचीही माहिती समोर आली. ३१ मार्चपर्यंत अनधिकृत टॉवरवर कडक कारवाईचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले.
शायरी करून आयुक्तांचा खुलासा
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मालमत्ता कर वसुलीसंदर्भात खुलासा करण्यापूर्वी शायरी केली. त्यास नगरसेवकांनी चांगलीच दाद दिली. कर भरणा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक वसुली असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी आतापर्यंत ५८ कोटींची वसुली झाली होती. यंदा ८८ कोटींवर वसुली झाली आहे. पाणीपट्टी वसुलीतही वाढ झाली आहे. मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याबरोबर मनुष्यबळाची अडचणही त्यांनी मांडली. शासन स्तरावरून मनुष्यबळ मिळाले पाहिजे.
ड्रोन सर्वेक्षण, एलईडीच्या तक्रारी
मालमत्तांच्या नोंदीसाठी ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याबरोबर पार्किंग धोरण तयार झाले असून, पुढील सभेत त्यावर निर्णय घेतला जाईल. एलईडी लाईटसंदर्भात तक्रारी येत आहेत. त्याचा सात दिवसांत आढावा घेतला जाईल, असेही डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.
३ हजार अनधिकृत बांधकामे
अनधिकृत नळ जोडण्या नियमित करण्याची मोहीम घेतली जाईल. ३ हजार ५४३ अनधिकृत बांधकामे आढळून आलेली आहेत. यात नोटिसा दिल्या जात आहेत. खर्चाचे प्राधान्यक्रम निश्चित केले पाहिजेत. २८ विभागांच्या सुसूत्रीक रणाचे काम सुरू करण्यात येत असल्याचेही मनपा आयुक्तांनी सांगितले.
सभेत गोंधळाचे वातावरण
वसुलीसंदर्भात नगरसेवकांकडून मुद्दे मांडले जात असताना विरोधी पक्षनेते जमीर कादरी, नासेर सिद्दीकी यांनी केवळ मालमत्ता कराच्या विषयावर चर्चा न करता विषयपत्रिकेतील विषयांकडे लक्ष वेधत होते. यामुळे काही वेळेसाठी सभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सूचना केल्यानंतर पुन्हा मालमत्ता कराच्या मुद्यावर चर्चा सुरू झाली.


Web Title: Three hours of recovery on recovery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.