मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 01:04 PM2017-12-09T13:04:14+5:302017-12-09T13:09:27+5:30

राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे.

In Marathwada University of Law started; What about other organizations? | मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

मराठवाड्यातील विधि विद्यापीठ मार्गी लागले; इतर संस्थाचे काय ?

googlenewsNext
ठळक मुद्देविधी विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा झाली आहे काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

औरंगाबाद : राज्य सरकारने शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेची घोषणा केली. यातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ मार्गी लागले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. मात्र, स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर, आयसीटी आणि गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. ही  घोषणा वास्तवात अद्यापही आलेली नाही.

नऊ वर्षांच्या लढ्यानंतर औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करीत कार्यान्वित केले आहे. या विद्यापीठाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सकाळी वाजता कांचनवाडी परिसरातील कॅम्पसमध्ये झाले.  मराठवाड्याच्या शैक्षणिक अनुशेषातील ही महत्त्वाची संस्था कार्यान्वित होत असल्यामुळे विधि क्षेत्रात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या विविध संस्थांच्या स्थापनेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. या संस्था मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.

स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्था
केंद्र सरकारने महाराष्ट्रात नवीन आयआयएम आणि स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड अर्किटेक्चर संस्था सरू करण्याची घोषणा २०१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती. यातील आयआयएम संस्था औरंगाबादेत स्थापन करण्यासाठी मोठे आंदोलन झाले. तरीही आयआयएम नागपूरला नेण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. तेव्हा २०१४ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात औरंगाबाद येथे स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर संस्था स्थापन करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. 

या घोषणेला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही संस्था स्थापन करण्याविषयी कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. नवी दिल्ली येथील स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर  संस्था आणि केंद्र सरकारच्या नागरविकास मंत्रालयाच्या संयुक्त अहवालानंतर ही संस्था कोठे स्थापन करायची याचा निर्णय मनुष्यबळविकास मंत्रालय घेणार आहे. हा अहवाल अद्याप आलेला नसल्यामुळे या संस्थेचे भवितव्य अधांतरीच आहे.

‘आयसीटी’ला दिली केवळ जमीनच
औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित ‘इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी’ विद्यापीठाचे उपकें द्र जालनाजवळ स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. यासाठी जालना जिल्हाधिका-यांच्या ताब्यातील शिरसवाडा येथील २०० एकर जमीन विद्यापीठाला उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीचे हस्तांतरण जिल्हाधिका-यांकडून तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे आणि तंत्रशिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून ‘आयसीटी’कडे हस्तांतरित झाली आहे. मात्र, केवळ हस्तांतरणाशिवाय पुढे काहीही झाले नाही, हे विशेष.

गोपीनाथ मुंडे संस्थेचा विसर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ‘गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामविकास संशोधन संस्था’ स्थापन केली आहे. या संस्थेच्या उभारणीसाठी राज्य सरकारने ४ आॅक्टोबर २०१६ रोजीच्या औरंगाबादेतील मंत्रिमंडळ बैठकीत १५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. यास वर्ष उलटून गेले तरी अद्याप फुटकी कवडी मिळालेली नाही. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने स्थानिक निधीतून १० कोटी रुपये देत ही संस्था सुरू राहण्याची तरतूद केली आहे. मात्र, राज्य सरकार याविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: In Marathwada University of Law started; What about other organizations?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.