घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 05:50 PM2018-06-13T17:50:09+5:302018-06-13T17:52:06+5:30

स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

Make donations instead of food in the ghati hospital; Governance appel to social organizations | घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

घाटीत अन्नाऐवजी औषधी दान करा; प्रशासनाचे स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटनांना साकडे

googlenewsNext
ठळक मुद्दे गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे.

औरंगाबाद : घाटीत संपूर्ण मराठवाड्यासह खान्देश व विदर्भाच्या काही भागांतील रुग्ण उपचारार्थ येतात. त्यांच्या समवेत त्यांचे नातेवाईकही सोबत येत असतात. त्यांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने विविध स्वयंसेवी संस्था व संघटना अन्नदान करतात. मात्र, हे अन्नदान घाटी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. काही रुग्णांचे नातेवाईक अन्न न खाता ते कचऱ्यात टाकत असल्याचे प्रकार घडत आहेत. यातून कचऱ्याची समस्या निर्माण होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था व संघटनांनी अन्नदानाऐवजी औषधी दान करण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीत स्वयंसेवी संस्थांसह सामाजिक संघटना अन्नदान करतात. मात्र, रुग्णांचे नातेवाईक संपूर्ण अन्न न खाता ते बहुतांश अन्न कचऱ्यात टाकत असल्याचे आढळून आले आहे. यातून कचऱ्याची नवीनच समस्या निर्माण झाल्याचे घाटी प्रशासनाचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास १५ ट्रक अन्न रुग्णांच्या नातेवाईकांनी कचऱ्याच्या डब्यात टाकले असल्याचे घाटी प्रशासनाने म्हटले आहे. हा कचरा आता रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर घाटी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था आणि संघटनांना विनंती केली आहे. त्यांनी अन्नदानावर होणाऱ्या खर्चातून औषधी खरेदी करावी.गरजू आणि आर्थिक दुर्बल रुग्णांना ती पुरवावी. सलाईन, बँडेजसह इतर कमी खर्चाच्या औषधी रुग्णांना पुरविल्या जाऊ शकतात.

यासाठी या संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे अथवा संस्थांनी अन्नदानाचे साहित्य घाटी रुग्णालयास द्यावे. त्याचे अन्नपदार्थ तयार करून ते रुग्णांना दिले जाईल. घाटी प्रशासनाच्या वाचणाऱ्या पैशांतून गरजू रुग्णांना औषधी दिली जाईल, असाही पर्याय घाटी प्रशासनाने संस्थांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटना काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

औषधींचे दान करावे
घाटी रुग्णालय परिसरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच १५ ट्रक उरलेल्या अन्नाचा कचरा आहे. याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच आहे. म्हणूनच संस्था आणि संघटनांना आम्ही आवाहन केले आहे की, त्यांनी गरजू रुग्णांना औषधींचे दान करावे.
- डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद.

आवाहनावर विचार केला जाईल

सकल जैन समाजाच्या अलर्ट ग्रुपच्या वतीने घाटीत दररोज ३०० ते ४०० रुग्णांच्या नातेवाईकांना एक कडधान्य, वरण भात, चपाती आणि शिरा असलेले भोजन मोफत दिले जाते. यासाठी एक वा दोन दात्यांकडून दररोज ४ हजार १०० रुपये घेतले जातात. यातून अन्नदान केले जाते. घाटीतील अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्याने नातेवाईक आम्ही दिलेले अन्न चवीने खातात, तरीही घाटी प्रशासनाच्या आवाहनावर ग्रुपच्या बैठकीत विचार केला जाईल.
- अभय गांधी, स्वयंसवेक, भगवान महावीर रसोई घर, सकल जैन समाज.

Web Title: Make donations instead of food in the ghati hospital; Governance appel to social organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.