ठळक मुद्देऔरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे.

औरंगाबाद : कमी कालावधीत जास्तीचा मोबदला देण्याचे अमिष दाखवून हजारो गुंतवणुकदारांना गंडविल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसांकडे तीन वर्षापूर्वी प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपास आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला. नाशिकच्या धर्तीवर येथील गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळावे,यासाठी पोलिसांक डून प्रयत्न केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मैत्रेयच्या संचालिका वर्षा सतपाळकरवर अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाशिक येथील मैत्रेय कंपनीने लाखो लोकांना त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवायला लावून त्यांना कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे अमिष दाखविले. मल्टी लेवल मार्केटींग पद्धतीने काम करणा-या या कंपनीने हजारो एजंट नियुक्त केले. या एजंटांना वाढिव कमिशन आणि वरिष्ठ पद देण्याचे अमिष दाखवून जास्तीत जास्त  लोकांना गुंतवणुक करायला लावण्याचे टार्गेट दिले जात. एजंटांनीही जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना मैत्रेय मध्ये गुंतवणुक करायला लावले. या कंपनीकडे गुंतवणुक करणा-याच्या विविध प्लॅन होते. विशेष म्हणजे मासिक तत्वावरही कंपनीकडून गुंतवणुक स्विकारली जात. प्रत्येक गुंतवणुकदाराला त्याची पावती आणि एक बॉण्ड मिळत. कंपनीचे उस्मानपुरा परिसरात एक अलिशान कार्यालय आहे. या कार्यालयात मोठा  कर्मचारी वर्गही होता. तीन वर्षापूर्वी हजारो गुंतवणुकदारांना मुदतीनंतरही त्यांचे पैसे मिळत नसल्याने पोलिसांत धाव घेतली. 

उस्मानपुरा पोलीस ठाण्यात सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी तक्रारअर्ज नोंदविलेले आहेत. अशाचप्रकारच्या तक्रारी नाशिक, परभणी, पूर्णा आणि राज्यातील विविध ठिकाणी पोलिसांना प्राप्त झाल्या. नाशिक  पोलिसांनी मैत्रेयच्या संचालिका सतपाळकर यांना अटक केली होती. तेव्हा त्यांनी गुंतवणुकदारांचे सर्व पैसे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली परत देण्याची तयारी न्यायालयासमोर दर्शविली होती. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाने संयुक्त खाते उघडण्यात आले होते. अशाचप्रकारची कार्यवाही औरंगाबादेत करून गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.

सुमारे ३५ हजार गुंतवणुकदार
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबाद येथील कार्यालयामार्फत सुमारे ३५ हजार गुंतवणुकदारांनी मैत्रेमध्ये गुंतवणुक केली. यातील शेकडो गुंतवणुकदार असे आहेत की, मुदतीनंतर एजंटांच्या सांगण्यावरुन त्यांनी त्यांना मिळणारी सर्व रक्कम पुन्हा कंपनीत गुंतवली. अशा सर्व लोकांनी पोलिसांत धाव घेतलेली आहे. आर्थिक गुन्हेशाखेकडे या केसची कागदपत्रे  अद्याप आलेली नाही.