कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:33 PM2018-05-22T13:33:13+5:302018-05-22T13:34:43+5:30

शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही.

Garbage Disposal issue @ 9 3: Passing the Way; End of meeting session | कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

कचराकोंडी@९३ : मार्ग निघेना; बैठकांचे सत्र संपेना 

googlenewsNext
ठळक मुद्देकाही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडी ९३ दिवसांपासून फुटत नाहीय. पावसाळा तोंडावर आला असून, बैठकांचे सत्र आणि अधिकाऱ्यांना झापण्यापलीकडे काहीही हाती लागलेले नाही. सोमवारी विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी कचरा समस्या दूर करण्यासाठी आढावा बैठक घेतली. 

काही प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग कमी झालेले दिसत असले तरी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कुठेही कचरा पेटविल्यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. घनकचरा संनियंत्रण समितीतर्फे  सातत्याने आढावा घेऊन संपूर्णत: कचरा प्रक्रिया आणि  विलगीकरणाबाबत महापालिका यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर समितीद्वारे कचरा समस्येबाबत संपूर्ण माहिती, पार पाडलेल्या कार्यवाहीबाबत महापालिका आयुक्त डॉ.विनायक  निपुण यांना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज माहिती दिली.

विभागीय आयुक्त यांच्या दालनात घनकचरा संनियंत्रण समितीची बैठक झाली. कचरा व्यवस्थापन संनियंत्रण समितीने कचरा टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई व्हावी, कचरा समस्या दूर व्हावी यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही समितीने सांगितल्याचे   डॉ.भापकर यांनी आयुक्तांना सांगितले. 

मनपा आयुक्त डॉ. निपुण यांनी कचरा प्रश्न सोडविण्यासाठी राबवीत असलेल्या आराखड्याची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

हा सगळा शोध कागदापुरताच 
चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, कांचनवाडी, नारेगाव, झाल्टा, मिटमिटा आदी ठिकाणच्या जागा निश्चित केल्या. शहरातील साचलेला कचरा उचलून त्यावर योग्य प्रक्रिया पार पाडून आवश्यक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र हे सगळे कागदावरच आहे. एकाही जागेवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक मशिनरी बसविण्यात आलेली नाही. १४८ दिवसांचा अ‍ॅक्शन प्लॅन पालिका १६ फेबु्रवारी रोजी नारेगावातील आंदोलकांना देत होती. त्यातील ९३ दिवस आजवर संपले आहेत. या दिवसांत पालिकेला काहीही करता आलेले नाही. संनियंत्रण समिती बैठका घेण्याशिवाय काहीही करू शकत नसल्यामुळे शहरातील कचरा समस्या तशीच आहे. 

 

Web Title: Garbage Disposal issue @ 9 3: Passing the Way; End of meeting session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.