उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:43 AM2019-05-24T00:43:44+5:302019-05-24T00:44:15+5:30

औरंगाबाद : समर्थनगर येथील शिवसेना-भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या पडद्यावर निकाल पाहण्यात मग्न कार्यकर्ते... मतमोजणीच्या आकडेवारीवरून सकाळपासूनच प्रत्येक ...

Curiosity, joy and ambition | उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण

उत्सुकता, जल्लोष अन् पुन्हा चिंतेचे वातावरण

googlenewsNext
ठळक मुद्देमहायुतीचे प्रचार कार्यालय : कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल मात्र, पराभवाने तरळले अश्रू


औरंगाबाद : समर्थनगर येथील शिवसेना-भाजप महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या पडद्यावर निकाल पाहण्यात मग्न कार्यकर्ते... मतमोजणीच्या आकडेवारीवरून सकाळपासूनच प्रत्येक कार्यकर्ता चिंतेत...मात्र, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साहेबांनी आघाडी घेतल्याची माहिती येते अन् एकच जल्लोष होतो... आनंदाने कार्यकर्ते गुलालही उधळतात... परंतु हा आनंद क्षणभंगुर ठरतो... साहेब पिछाडीवर असल्याची माहिती येते अन् कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा चिंता पसरते... निकाल स्पष्ट होताच कार्यकर्ते जड पावलांनी कार्यालयातून बाहेर पडतात... असे चित्र महायुतीच्या कार्यालयात दिसून आले.
महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयी होण्याचा विश्वास होता. परंतु मतमोजणीची एक-एक फेरी संपत होती, तशी कार्यकर्त्यांची घालमेल होत होती. मतमोजणीच्या २२ व्या फेरीपर्यंत नेमके काय होईल, याचा विचार प्रत्येक जण करीत होता. महायुतीचे पदाधिकारीही अगदी शांतपणे बसून होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चंद्रकांत खैरे यांनी आघाडी घेतल्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यानंतर एकच जल्लोष अन् जयघोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी आनंदाने गुलालही उधळला. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, प्रदीप जैस्वाल आणि कार्यकर्ते जयघोष करीत कार्यालयातून बाहेर पडले. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सर्व जण पुन्हा प्रचार कार्यालयात दाखल होतात. महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रत्येक जण बोलून दाखवत होता. परंतु त्यानंतर एक-एक फेरी होत गेली आणि कार्यकर्त्यांमधील आनंद विरून गेला. अटीतटीच्या लढतीत पराजय जवळ दिसू लागल्याने अनेक कार्यकर्ते कार्यालयातून बाहेर पडले. अनेक कार्यकर्ते पाणावलेल्या डोळ्यांनी कार्यालयात उभे होते. रात्री आठ वाजता चंद्रकांत खैरे हे प्रचार कार्यालयात दाखल झाले. यावेळी आ. संजय शिरसाट, अतुल सावे, नंदकुमार घोडेले आदींसह पदाधिकारी होते. यावेळी खैरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कोणकोणत्या भागातून कसे मतदान झाले, मतमोजणीची प्रक्रिया आणि तेथे झालेल्या प्रकारांविषयी खैरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोरील रस्त्यावरून दुचाकीवरून घोषणा देत युवकांची ये-जा होत होती. वारंवार होणाºया या प्रकाराने रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास संतप्त झालेल्या प्रचार कार्यालयातील कार्यकर्ते धावत रस्त्यावर उतरले. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यानंतर परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

Web Title: Curiosity, joy and ambition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.