ठळक मुद्देविविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखाचा ऐवज जप्त केला.कर्जाचे हप्ते परत फेड होईल या आशेपोटी आरोपींकडे मालक ट्रॅक्टर सुर्पूद करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यात विक्री करीत. 

औरंगाबाद : कामासाठी भाडेतत्वावर घेतलेल्या ट्रॅक्टरची परस्पर विक्री करणा-या एका रॅकेटचा ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. रॅकेटमधील दोन जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांनी राज्यातील विविध ठिकाणच्या शेतक-यांना विक्री केलेले १७ ट्रॅक्टर आणि एक कार असा सुमारे ७४ लाखाचा ऐवज जप्त केला.

शेख अन्वर शेख मुसा (रा. हुसेननगर,सातारा)आणि देवीलाल सरदारसिंग राजपूत (रा.पांगरा,ता.कन्नड) अशी अटकेतील आरोपींची  नावे आहेत. अधिक माहिती देताना ग्रामीण गुन्हेशाखेचे निरीक्षक सुभाष भुजंग म्हणाले की,  पिसादेवी येथील रहिवासी भगवान विष्णू वायाळ यांनी चिकलठाणा पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांचे ट्रॅक्टर आरोपी शेख अन्वर आणि शेख इब्राहिम उर्फ शेख ईस्माईल यांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर भाड्याने नेले आणि नंतर ते परस्पर गायब केले. तर अशाच प्रकारची दुसरी तक्रार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात बळीराम साहेबराव राठोड (रा.आंबा तांडा, कन्नड)यांनी नोंदविली होती. यावरुन आरोपी शेख शकील शेख शब्बीर(रा.श्रीराम कॉलनी, कन्नड),देवीलाल सरदारसिंग राजपूत((रा.पांगरा,ता.कन्नड) आणि नासेर शेख रसुल शेख (रा.मोमीनपुरा,कन्नड) यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता.

कन्नड पोलीस आणि ग्रामीण गुन्हेशाखा पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. गुन्हेशाखा पोलिसांनी शेख अन्वर यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत भगवान यांचा ट्रॅक्टर त्याने त्याचा साथीदार देवीलाल राजपूत याने विविध ठिकाणी विक्री केल्याची क बुली दिली. नंतर कन्नड पोलिसांनी देवीलाल यास पकडले. यानंतर दोन्ही पोलिसांनी संयुक्त तपास केला.  या तपासात दोन्ही आरोपींनी  सांगितले की, आरोपी हे स्वत:ला मोठा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगून ट्रॅक्टरमालकाचा विश्वास संपादन करीत. चालक आमचा असेल आणि इंधनही आम्हीच टाकू तुम्ही केवळ ट्रॅक्टर द्या, आम्ही तुम्हाला दरमहा भाडे देत राहू असे सांगून विश्वास संपादन करीत. बहुतेक ट्रॅक्टरवर कर्जाचा बोझा असतो. कर्जाचे हप्ते परत फेड होईल या आशेपोटी आरोपींकडे मालक ट्रॅक्टर सुर्पूद करीत. यानंतर आरोपी ट्रॅक्टरची बनावट कागदपत्रे तयार करून ते विविध जिल्ह्यात विक्री करीत. 

खरेदीदारांचीही फसवणुक
आरोपींनी आतापर्यंत नाशिक, अमरावती, परभणी, हिंगोली, अहमदनगर, पुणे , जिंतूर, वसमत, चाळीसगाव, खेड, पुणे, आळेफाटा आदी ठिकाणी ट्रॅक्टर विक्री केल्याची कबुली दिली. त्यांनी ट्रॅक्टर मालकाचा विश्वासघात करणेसोबतच ट्रॅक्टर खरेदी करणा-यानाही लाखो रुपयांचा गंडा घातला. आरोपींच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू केला.

यांनी केली कामगिरी
या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्वला वनकर, उपअधीक्षक अशोक आमले, निरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक विवेक जाधव, कर्मचारी नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, सागर पाटील, रामेश्वर धापसे, गणेश गांगवे, ,उपनिरीक्षक साळुंके, बेबरे यांनी केली.