भाजपवाले दंगल संपल्यानंतर हजर झाले - चंद्रकांत खैरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 07:35 PM2018-05-17T19:35:50+5:302018-05-17T19:40:38+5:30

११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले.

BJP workers arrived after the conflict - Chandrakant Khaire | भाजपवाले दंगल संपल्यानंतर हजर झाले - चंद्रकांत खैरे 

भाजपवाले दंगल संपल्यानंतर हजर झाले - चंद्रकांत खैरे 

ठळक मुद्देशिवसेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.१६) केले होते. त्यात बोलताना खा. खैरे यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.

औरंगाबाद : ११ व १२ मे रोजी झालेल्या दंगलीमध्ये हिंदूंना वाचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले. शनिवारी सकाळी पोलिसांची अधिक कुमक दाखल झाल्यानंतर भाजपचे आमदार अतुल सावे घटनास्थळी आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका महिलेकडून दंगलीचा आढावा घेतला. तेव्हा त्यांना शिवसैनिकांनी शहर वाचविल्याचे त्या महिलेने सांगितले. यानंतर जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना झापल्यानंतर त्यांनी दोन दिवसांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांनी केला.

शिवसेनेतर्फे तापडिया नाट्यमंदिर येथे शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.१६) केले होते. त्यात बोलताना खा. खैरे यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महापौर नंदकुमार घोडेले, आमदार संजय शिरसाट, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी खा. खैरे म्हणाले, शहरातील दंगलीसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आरोप करीत आहेत. मुळात हेच विखे मुख्यमंत्र्यांशी मिळालेले आहेत. त्यांच्या आरोपांकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. भाजप महापालिकेत, राज्यात सत्तेत आहे. तरीही त्यांचे शहरातील कचरा, पाणीप्रश्नी कोणीही नाव घेत नाही. उलट हे भाजपवालेच शिवसेनेला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचत असल्याचा आरोप खा. खैरे यांनी केला. 

शहरातील हिंदू नागरिकांचे रक्षण करण्यास शिवसेना हा एकमेव पक्ष सक्षम असल्याचा दावाही त्यांनी केला. विनोद घोसाळकर म्हणाले, शिवसेना स्वबळावर लढणार असल्यामुळे शाखाप्रमुखांनी आताच कामाला लागावे. ज्यांना काम करायचे आहे त्यांनीच स्वत:कडे पदे ठेवावीत. अन्यथा पदे सोडून देऊन दुसऱ्यांना काम करण्याची संधी देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. शिरसाट, नरेंद्र त्रिवेदी, प्रदीप जैस्वाल आदींनी मनोगत व्यक्त केले.

...तर पुन्हा दंगलीचा भडका उडेल
शहरात घडलेल्या दंगलीत लच्छू पहिलवान यांना नागरिकांनी बोलावले. त्यांनी हिंदूंना मदत केली. आता त्यांना जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा शहरात दंगलीचा भडका उडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. तसेच हिंदंूच्या रक्षणासाठी आगामी आठवड्यात क्रांतीचौक ते शहागंज, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली.

जंजाळने माझ्या पुतण्याला वाचवले
दंगलीमध्ये एका जैन महिलेला वाचविण्यासाठी माझा पुतण्या सचिन खैरे, प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल, लच्छू पहिलवानचा मुलगा गेले होते. त्या घरावर दगडफेक करण्यात येत होती. या महिलेसह चौघांना वाचविण्यासाठी राजू जंजाळने हवेत काय करायचे ते केले. (यावेळी गोळीबाराचा उल्लेख टाळत बोटाने इशारा केला.) राजूने असे केले नसते तर त्या चौघांचा बळी गेला असता, असा दावाही खा. खैरे यांनी केला.

Web Title: BJP workers arrived after the conflict - Chandrakant Khaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.