औरंगाबादच्या पतंगांची परराज्यांतही भरारी; १५० कारागिरांच्या व्यवसायाला हवी 'उद्योगा'ची दोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:18 PM2018-01-12T13:18:19+5:302018-01-12T13:20:05+5:30

बरेलीचा मांजा, हैदराबादची लाकडी चक्री आणि लखनौ व औरंगाबादी पतंगही प्रसिद्ध आहे. कोणत्याही वातावरणात उडतील असे पतंग तयार करण्याचे कौशल्य शहरातील खानदानी कारागिरांनी आत्मसात केले आहे. या वैशिष्ट्यामुळे येथील पतंग महाराष्ट्रच नव्हे तर परराज्यांतील गगनातही भरारी घेत आहेत.

Aurangabad's 150 kites maker want 'industry' rope | औरंगाबादच्या पतंगांची परराज्यांतही भरारी; १५० कारागिरांच्या व्यवसायाला हवी 'उद्योगा'ची दोरी

औरंगाबादच्या पतंगांची परराज्यांतही भरारी; १५० कारागिरांच्या व्यवसायाला हवी 'उद्योगा'ची दोरी

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : बरेलीचा मांजा, हैदराबादची लाकडी चक्री आणि लखनौ व औरंगाबादी पतंगही प्रसिद्ध आहे. कोणत्याही वातावरणात उडतील असे पतंग तयार करण्याचे कौशल्य शहरातील खानदानी कारागिरांनी आत्मसात केले आहे. या वैशिष्ट्यामुळे येथील पतंग महाराष्ट्रच नव्हे तर परराज्यांतील गगनातही भरारी घेत आहेत. आजघडीला लहान-मोठे १५० कारागीर शहरात असून, वर्षाभरात ५० लाख पतंग येथे बनविले जातात. यातील पिढीजात पतंग तयार करणारे ५० कारागीर असून, ते आजही बिकट परिस्थितीतच आपले जीवन व्यथित करीत आहेत. स्टार्टअप इंडिया, मुद्रा लोन अजून या सरकारच्या योजना या कारागिरांपासून कोसो मैल दूरच आहेत. 

संक्रांत सण महिलांचा असल्याचे मानले जाते; पण हा सण पतंगशौकिनांचाही आहे. कारण, वर्षभरात संक्रांतीलाच सर्वाधिक पतंग उडविले जातात. औरंगाबाद शहर कमी दाबाच्या पट्ट्यात येते. येथे जोराची हवा असेल तरच पतंग उंच भरारी घेतात.   हवामानाचा अंदाज घेऊन येथील कारागिरांनी कमी हवेतही उडतील अशा पतंगांची निर्मिती सुरू केली. पतंग जरी शहरात बनत असले तरीही त्यासाठी लागणारी लाकडी कामटी ही तुळसीपूरहून मागविली जाते.

दोर भरलेले दीर्घायुषी पतंग 
पतंगाच्या उभ्या कामटीला ‘तिड्डा’ तर आडव्या कामटीला ‘कमान’ म्हणतात. जाड कामटी असेल तर पतंग उडत नाही. यासाठी येथील खानदानी कारागीर चाकूने ती कामटी सोलून लवचिक करतात. कमी हवेत उडण्यासाठी कामटी किती सोलायची येथेच कारागिराचे कौशल्य पणाला लागते. दुसरे म्हणजे पतंगाच्या खालील दोन्ही बाजंूना काठावरील कागद दुमडून त्यात दोर भरल्या जातो. यामुळे पतंग फाटत नाही. बराच वेळ टिकतो. असे दोर भरलेले पतंगही शहरातच तयार केले जातात; पण या पतंगाची किंमत २५ रुपयांपर्यंत जाते. लहान मुलांना कमी किमतीचे पतंग पाहिजे असल्याने येथील कारागीर मोठ्या प्रमाणात दोर न भरलेले पतंग तयार करून त्याच्या किमती कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. शहरात आजघडीला साडेतीन रुपयांपासून पतंग विकले जात आहेत.

बँका कारागिरांना कर्ज देत नाहीत
यासंदर्भात नवाबपुरा पतंग गल्लीतील रहिवासी व खानदानी पतंग निर्माते दौलतसिंग राजपूत यांनी सांगितले की, दिवसभरात चार कारागीर ४५० ते ५०० पतंग बनवितात. पतंगामागे शेकडा ३० ते ४० रुपयेच कमिशन मिळते. पतंग बनविण्याचे काम वर्षभर चालते. बँका कारागिरांना कर्ज देत नाहीत. नाईलाजाने होलसेल विक्रेत्यांकडून उधारीवर पैसे घ्यावे लागतात. केंद्र सरकारच्या स्टार्टअपमध्ये येथे ‘पतंग क्लस्टर’ला परवानगी देण्यात यावी, यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, मुद्रा लोन फक्त नावालाच आहे. आम्हाला बँका दरवाजातही उभे करीत नाहीत. पतंग व्यवसायाला ‘उद्योगा’चा दर्जा मिळाला तर आमची पत वाढेल, कर्ज मिळेल व आम्ही आणखी जास्त पतंग बनवू. आमचे उत्पन्न वाढवू, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 

मांजा तयार करण्याची परंपरा लोप
शहरात ३० वर्षांपूर्वी मांजा तयार केला जात असे. तेव्हा येथील मांजा एवढा प्रसिद्ध होता की, तो तयार करणार्‍या उस्तादाच्या नावाने ओळखला जात असे. तेव्हा शहरात बच्छवा उत्साद, मियाखाँ, अहमद साहेब, छोटे खाँ, अजीजभाई, मेहमूदभाई तसेच छावणीतील फुप्पा, बाजीराव या उस्तादांनी तयार केलेल्या मांजाला मोठी मागणी असे. उल्लेखनीय म्हणजे, बुढीलाईन येथील गुलाबसिंग राजपूत यांनी तयार केलेला मांजा खरेदीसाठी आगाऊ नोंदणी करावी लागत असे. यासंदर्भात औरंगपुरा येथील ज्येष्ठ पतंग शौकीन जयराज पवार यांनी सांगितले की, त्यावेळी काचेची भुकटी तयार करून दोर्‍याला लावत असत. मात्र, १९९० नंतर उत्तर प्रदेशातील बरेली येथून रेडिमेड मांजा येऊ लागला. काळाच्या ओघात अनेक उस्तादांचे निधन झाले. २००० पासून चीनहून नायलॉनचा मांजा येऊ लागला आणि शहरातील मांजा बनविण्याची परंपरा लोप पावली. 

१ कोटी मीटर विकला जातो मांजा 
ज्येष्ठ विक्रेते, सय्यद अमिनोद्दीन यांनी सांगितले की, एका रीळमध्ये ९०० मीटर मांजा असतो. मोठ्या चक्रीमध्ये ५ हजार मीटर मांजा असतो. १२० ते २०० रुपये प्रति ९०० मीटर मांजा विकला जातो. आमच्या दुकानात सुमारे २०० चक्री विक्री होतात. १० लाख मीटर मांजा आमच्या येथून विकला जातो. शहरात १० ते १५ होलसेल विक्रेते असून, सुमारे १ कोटी मीटर मांजा विकला जातो. वर्षभरात ५० लाख पतंग तयार होतात व त्यापैकी १० लाख पतंग विक्री होतात. 

शहरातही बनते लाकडी चक्री 
प्लास्टिकच्या चक्री मोठ्या प्रमाणात शहरात आल्या आहेत; परंतु अस्सल पतंगबाज पतंग उडविताना लाकडी चक्रीचाच वापर करतात. यासाठी हैदराबाद येथून लाकडी चक्री मागविल्या जातात; पण आता शहरातच कारागिरांनी लाकडी चक्री तयार करण्यास सुरुवात केली आहे. नवाबपुरा येथील साधूसिंग राजपूत हे अवघ्या १५ मिनिटांत एक चक्री तयार करतात. यामुळे आता लाकडाच्या कारागिरांना नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

पतंग व्यवसायाला उभारी देण्यासाठी 
शासनाने पतंग क्लस्टरला परवानगी द्यावी.वेरूळ महोत्सवासोबत पतंग महोत्सव भरवावा.वेरूळ महोत्सवासोबत पतंग महोत्सव भरवावा.पतंग महोत्सवात राज्यातील व्यावसायिक पतंगबाजी करणार्‍या संघटनांना आमंत्रित करावे. व्यापारी महासंघाने पुढाकार घेऊन पतंग कारागीर व विक्रेत्यांची संघटना तयार करावी. 

Web Title: Aurangabad's 150 kites maker want 'industry' rope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.