औरंगाबाद जिल्ह्यात युतीच्या अपेक्षा उंचावल्या, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 05:34 AM2019-07-13T05:34:44+5:302019-07-13T05:34:55+5:30

समीकरणे बदलली : वंचित बहुजन आघाडी करिश्मा दाखविणार का?, सुजात आंबेडकर यांच्या उमेदवारीची चर्चा

Aurangabad district raised the expectation of bjp yuti, but ... | औरंगाबाद जिल्ह्यात युतीच्या अपेक्षा उंचावल्या, पण...

औरंगाबाद जिल्ह्यात युतीच्या अपेक्षा उंचावल्या, पण...

googlenewsNext

स. सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या पराभवानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. सेना- भाजपचे ठरले असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात भाजपच्या अपेक्षा वाढल्या आहेत. काँग्रेस पूर्णत: कोलमडून पडली आहे. काँग्रेसला योग्य उमेदवार मिळणेही कठीण दिसत आहे. कुणी स्वत:हून उमेदवारी मागायला येईल की नाही, अशीच परिस्थिती आहे.


लोकसभेला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे पराभूत झाले आणि मित्रपक्ष भाजपने औरंगाबाद शहर व जिल्ह्यावर आपली पकड वाढवायला सुरुवात केली. अतुल सावे यांना उद्योग व अल्पसंख्याक राज्यमंत्रीपदाचा दर्जा देऊन भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. शहराच्या पाण्याच्या गंभीर प्रश्नांत अतुल सावे लक्ष घालीत आहेत.


औरंगाबाद मध्य, पूर्व व पश्चिम या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळविले आहे. साहजिकच या तीन मतदारसंघांतून आपण निवडून येऊ असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीचा वाढला आहे. पूर्वसाठी मागच्या वेळी पराभूत झाल्यापासून डॉ. गफ्फार कादरी हे तयारी करीत आहेत. पश्चिममधून अमित भुईगळ हे इच्छुक आहेत. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे ते नजीकचेही मानले जातात. याठिकाणी मागील दोन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे संजय शिरसाट हेच रिपीट होतात की आणखी काही गडबड होते, हे पाहावे लागेल.


‘मध्य’मधून सुजात आंबेडकर?
औरंगाबाद मध्यमधून इम्तियाज जलील आमदार आहेत. पण ते खासदार झाल्याने आता हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीसाठी सुरक्षित मानला जात आहे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांना येथून उमेदवारी देऊन निवडून आणावे व मुस्लिमांनी मते दिली नाहीत ही बाळासाहेबांची नाराजी झाली होती, ती दूर केली जावी, असे काहीसे ठरत असल्याची चर्चा आहे.
भाजपचे तीन, एमआयएमचा एक, दोन शिवसेनेचे, एक राष्टÑवादी काँग्रेसचा आणि दोन अपक्ष आमदार, असे सध्याचे पक्षीय बलाबल आहे. अब्दुल सत्तार हे जिल्ह्यातील सिल्लोडहून निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव आमदार होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील त्यांच्या बंडखोरीमुळे आणि काँग्रेसनेही आता त्यांना पक्षातून काढून टाकल्यामुळे काँग्रेस जिल्ह्यात आणखी वजा झाली.
लोकसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला मताधिक्य मिळाले. त्यामुळे या किंवा वैजापूर मतदारसंघातून चंद्रकांत खैरे हे आपले नशीब अजमावतील, अशी चर्चा आहे. पण कन्नडला शिवसेनेतर्फे उदयसिंग राजपूत हे तिकिटाचे प्रबळ दावेदार मानले जातात. वैजापूरला आर. एम. वाणी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे लढू शकणार नाहीत.


वयोमानानुसार हरिभाऊ बागडे हे निवृत्त होऊ इच्छितात की फुलंब्री लढू इच्छितात, हे आगामी काळातच स्पष्ट होईल. बागडे कुठल्या तरी राज्याचे राज्यपालही होऊ शकतात, त्यांना केले जाऊ शकते, असा तर्क व्यक्त केला जात आहे. फुलंब्रीत काँग्रेसतर्फे डॉ. कल्याण काळे हे तगडी लढत देऊ शकतात. गंगापूरहून प्रशांत बंब हेच भाजपचे उमेदवार असू शकतात. औरंगाबाद पूर्वचा तर आता काही विषयच नाही. कारण आमदार व राज्याचे उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांना आता भाजपअंतर्गतही कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही.
लोकसभेत चंद्रकांत खैरे यांना जेरीस आणलेले हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून अपक्ष लढतील किंवा वेळेवर ते काही तरी वेगळाच करिश्मा निर्माण करतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. जाधव यांच्यासाठी सासरे रावसाहेब दानवे यांचा आशीर्वाद कमी होण्याची सुतराम शक्यता नाही.


काँगे्रस- राष्टÑवादी काँग्रेसची हालत मात्र खूपच खराब झाली आहे. दोघांनी आघाडी तरी ते यशापासून दूरच वाटतात.

Web Title: Aurangabad district raised the expectation of bjp yuti, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.