‘कँडल मार्च’ने ढवळून निघाले औरंगाबाद शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:34 AM2018-04-16T01:34:01+5:302018-04-16T01:34:38+5:30

जम्मू-काश्मिरात आठवर्षीय चिमुरड्या असिफाची बलात्कारानंतर नराधमांनी निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी युवकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत कँडल मार्च काढून असिफाला न्याय देण्याची मागणी केली

Aurangabad city was stirred by 'candle march' | ‘कँडल मार्च’ने ढवळून निघाले औरंगाबाद शहर

‘कँडल मार्च’ने ढवळून निघाले औरंगाबाद शहर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जम्मू-काश्मिरात आठवर्षीय चिमुरड्या असिफाची बलात्कारानंतर नराधमांनी निर्घृण हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी युवकांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत कँडल मार्च काढून असिफाला न्याय देण्याची मागणी केली. या कँडल मार्चमध्ये युवक, युवतींसह चिमुरड्या बालिकाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. असिफाला न्याय देण्याच्या मागणीचे फलक हाती धरून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची आग्रही मागणी करण्यात येत होेती. मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहत ‘जस्टिस फॉर असिफा’, ‘वूई वॉण्ट जस्टिस’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
क्रांतीचौकात विद्यार्थ्यांचा आक्रोश
क्रांतीचौक येथे सायंकाळी विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कँडल मार्च काढला. महिलांवर देशभर होणारे अत्याचार रोखण्यासाठी निर्भया अ‍ॅक्ट आणून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थिनींनी यावेळी केली. ‘इन्साफ दो, इन्साफ दो, असिफा को इन्साफ दो’, ‘जस्टिस फॉर असिफा’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अनेक विद्यार्थिनींच्या हातात न्याय मागणारे फलक होते. विद्यार्थी घोषणाबाजी करीत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात दोन महिलांनी मार्गदर्शन केले. यात त्यांनी समाजातील सर्व पुरुष, युवकांनी महिलांच्या रक्षणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच महिला आत्याचाराविरोधात पुन्हा एकत्र येण्याचा निर्णयही घेतला.
या कँडल मार्चचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मंगल खिंवसरा, डॉ. गौरी फराह नाझ, प्रा. मानसी बाहेती, अ‍ॅड. स्वाती नखाते, दीक्षा पवार, प्रा. बाबा गाडे, अक्षय पाटील आदींनी केले होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय, अभिजित देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेवराव पवार,रवींद्र काळे, बाबा तायडे, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, मयूर सोनवणे, कय्युम शेख, हसन इनामदार, मोनिका घुगे, योगेश खोसरे, अ‍ॅड. अभय टाकसाळ, दत्ता भांगे, शाखेर खान, तय्यब खान, कय्युम अहेमद, नवीन ओबेरॉय, अमोल दांडगे, राष्ट्रवादीचे मराठवाडा अध्यक्ष उमर पटेल, जिल्हाध्यक्ष शाकेर खान, समीर मिर्झा, जावेद खान, मोहंमद जाकेर, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा मेहराज पटेल, मंजूषा पवार, सुवर्णा मोहिते, सलमा बानो, अनिसा खान, शकिला खान, सय्यद सरताज आदींसह शेकडो युवकांची उपस्थिती होती. या कँडल मार्चचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

काँग्रेसतर्फेश्रद्धांजली वाहून कठुआ घटनेचा निषेध
कठुआ येथे अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या असिफाला न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षातर्फे गांधी भवनापासून ते गांधी पुतळ्यापर्यंत मेणबत्ती लावून कँडल मार्च काढण्यात आला. या घटनेचा निषेध करत बलात्कारी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत असिफाला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, माजी आमदार कल्याण काळे, जि. प.उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील, काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष बाबा तायडे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, किरण पाटील डोणगावकर, रवींद्र काळे, महिला शहराध्यक्षा सरोज मसलगे, ग्रामीणच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, प्रदेश सचिव मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, फुलंब्रीचे तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, औरंगाबादचे रामभाऊ शेळके, कन्नडचे बाबासाहेब मोहिते, पैठणचे विनोद तांबे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते मीर हिदायत अली, लियाकत पठाण, डॉ. गफार खान, गजानन मते, मनोज शेजूळ, जि.प. सदस्य किशोर बलांडे, अतिश पितळे आदी उपस्थित होते.
पैठणगेट ते क्रांतीचौक मार्च
शहरातील रोशनगेट, पैठणगेट, नूतन कॉलनी परिसरातील हजारो युवकांनी पैठणगेट येथे एकत्र येत पैठणगेट ते क्रांतीचौक असा लाँग मार्च काढला. यात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग होता. या मोर्चात युवकांनी ‘जस्टिस फॉर असिफा’, ‘वूई वॉंट जस्टिस’, ‘धर्माचे राजकारण बंद करा’, ‘मेरा भारत महान’, नराधमांना फाशी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या धोरणाचा निषेधही केला.

Web Title: Aurangabad city was stirred by 'candle march'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.