औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 08:25 PM2019-01-25T20:25:38+5:302019-01-25T20:28:23+5:30

तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

The accident occurred on the Aurangabad-Ahmednagar highway | औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच

googlenewsNext
ठळक मुद्देलाईट बॅरिअरचा आहे अभाव अनेकांना गमवावा लागला प्राण वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी

कायगाव (औरंगाबाद ) : औरंगाबाद-अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरील रस्ता दुभाजकावर असणाऱ्या लाईट बॅरिअरअभावी अपघाताचा धोका वाढला आहे. लाईट बॅरिअर नसल्याने रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरील वाहनांना त्रासदायक ठरत असल्याने अनेकदा यामुळे अपघात होत आहेत. त्यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लाईट बॅरिअर बसवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा राष्ट्रीय मार्ग आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, एमआयडीसीचा पुण्यातील एमआयडीसीशी आद्योगिक संपर्क आहे. त्यामुळे या मार्गावरून जवळपास २४ तास मोठी वाहतूक होते. या मार्गाचे १० वर्षांपूर्वी रुंदीकरण झाले होते. सर्वप्रथम द्विपदरी असणारा हा मार्ग नंतर चौपदरी झाला. तेव्हापासून या रस्त्यावर दुभाजक तयार करण्यात आले. त्यानंतर या मार्गावर दोन्ही बाजूंनी एकेरी वाहतूक सुरू झाली. एकेरी वाहतूक सुरू झाल्याने समोरासमोरच्या वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण कमालीचे घटले. मात्र, एकाच लेनमध्ये चालणाऱ्या वाहनांचे अपघात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. एकेरी वाहतूक असल्याने वाहनांच्या वेगात वाढ  झाली. त्यामुळे ओव्हरटेक करण्याच्या नादात होणारे अपघातही वाढले. तसेच दुसरीकडे रात्रीच्या रहदारीत मोठ्या वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश समोरासमोरच्या वाहनांच्या चालकांना त्रासदायक ठरून अपघात होत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, औरंगाबाद-अहमदनगर या मार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्याचे दोन भाग झाले होते. अहमदनगरहून वडाळा (ता. नेवासा) गावापर्यंत एका ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते, तर वडाळ्याहून वाळूजपर्यंत दुसऱ्या ठेकेदाराला काम दिले गेले. वडाळ्यापासून अहमदनगरपर्यंत रस्ता दुभाजकावर फायबरचे लाईट बॅरिअर बसविण्यात आले होते. मात्र, वाळूजहून वडाळ्यापर्यंत लाईट बॅरिअरऐवजी रस्ता दुभाजकावर लहान लहान झाडे लावण्यात आली. या झाडांचा म्हणावा तसा उपयोग कधीच झाला नाही. उलट हिरव्या झाडांच्या आकर्षणाने रस्त्यावर विविध जनावरांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीला अडथळेच निर्माण झाले. बहुतांश जागेवरून आता ही झाडे नष्ट झाली आहेत. त्यामुळे रस्ता दुभाजक पूर्ण रिकामा झाला आहे. 

औरंगाबाद ते अहमदनगरदरम्यान या राष्ट्रीय मार्गावर लिंबेजळगाव, खडका फाटा आणि शेंडी या तीन ठिकाणी वाहनांकडून टोल वसुली केली जाते. मात्र, असे असूनही वाहनधारकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन तत्काळ या मार्गावरील रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर टाकण्यात यावे, अशी मागणी माार्गवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे. 

लाईट बॅरिअरचे काम काय?
रात्रीच्या वेळेस वाहनांच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने समोरच्या वाहनांच्या चालकांना त्रास होतो. समोरच्या बाजूने येणाऱ्या वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूच्या चालकाच्या डोळ्यांवर पडतो. त्यामुळे समोरासमोर वाहतूक होत असताना वाहनांचा प्रकाश दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रासदायक ठरू नये, यासाठी रस्ता दुभाजकावर लाईट बॅरिअर बसविण्यात येतात. हे बॅरिअर वाहनांच्या हेडलाईटचा प्रकाश अडवितात. त्यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. 

Web Title: The accident occurred on the Aurangabad-Ahmednagar highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.